पहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास
रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टिकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, रँडच्या खुनाचा संबंध टिळकांशी जोडण्यात अपयश आल्यानंतरही ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. या दोन लेखांमध्ये भवानी तलवार या टोपणनावाखाली लिहिलेली दृष्टांतरूपी कविता व शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध योग्य होता असे मत मांडणार्या टिळकांच्या वक्तव्यावरील वृत्त यांचा समावेश होता. या खटल्याची सुरुवात सप्टेंबर ८ , १८९७ रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात झाली. एकूण नऊ पंचांमध्ये सहा युरोपीय पंच व तीन भारतीय पंच होते. टिळकांच्या बचावासाठी पूर्ण देशभरातून जवळपास ४०,००० रूपये इतका निधी गोळा करण्यात आला. यामध्ये डब्ल्यू.सी. बॅनर्जी, मोतीलाल घोष (अमर बाझार पत्रिकाचे संपादक) व रविंद्रनाथ टागोर या बंगालच्या नेत्यांचा तसेच जनतेचा वाटा उल्लेखनीय होता. यासोबतच बंगालमधून टिळकांची बाजू मांडण्यासाठी वकीलसुद्धा पाठविण्यात आले. हा खटला सहा दिवस चालला व खटल्याच्या शेवटी तीन भारतीय पंचांनी टिळकांकडून निकाल दिला तर सहा युरोपीय पंचांनी टिळकांविरुद्ध. न्यायाधीश जस्टिस स्ट्रॅची यांनी बहुमतानुसार टिळकांना दोषी घोषित केले व १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. निकालादरम्यान "Disaffection" (सरकारबद्द्ल अप्रीती) म्हणजे "want of affection" (प्रीतीचा अभाव) या न्यायाधीशांनी केलेल्या व्याख्येवर भारतात तसेच इंग्लंडमध्ये अनेक कायदा-अभ्यासकांनी प्रखर टिका केली टि़ळकांना तीन महिन्यासाठी डोंगरी तुरूंगात ठेवण्यात आले व नंतर भायखळ्याच्या तुरूंगात हलविण्यात आले. तुरूंगवासादरम्यान टिळकांना राजकीय कैद्याप्रमाणे न वागवता सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे. याचा संस्कृत विद्वान व टिळकांचे परिचित मॅक्स म्यूलर यांनी तसेच इंग्लंडमधील काही नेत्यांनी विरोध केला. याचा परिणाम म्हणजे सरकारने टिळकांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलविले तसेच त्यांना तुरूंगात काही काळ वाचनाची व लिखाणाची मुभा दिली. तुरूंगवासादरम्यान टिळकांनी आर्क्टिक होम ऑफ वेदाज या त्यांच्या पुस्तकासाठी टिपणे बनविली. जेव्हा बारा महिन्याच्या तुरूंगवासानंतर सप्टेंबर ७, १८९८ रोजी टिळकांची सुटका करण्यात आली तेव्हा त्यांचे शारिरिक स्वास्थ्य खूप ढासळले होते.