Get it on Google Play
Download on the App Store

कर्ण एपिसोड

कर्ण एपिसोड सुरू होतो:


कृष्ण दुर्योधनाच्या बाजूला उभा राहून कर्णाच्या चितेला आग देतो. मागे अर्जुन उभा असतो.


नंतर अर्जुन कृष्णाला विचारतो: "तुम्ही त्याच्या चितेला आग का दिली?"


कृष्ण: "कर्ण चांगला व्यक्ती होता जरी तो तुझ्या शत्रू पक्षाकडून लढला. तसे पाहिले तर युधिष्ठिरने त्याला अग्नी द्यायला हवा होता."


अर्जुन: "काय?"


कृष्ण: "हो. कर्ण कुंतीपुत्र होता. तुझा भाऊ!"


मग चित्रगुप्तच्या दरबारात (धर्मक्षेत्र) -


चित्रगुप्त येतात. त्यांना सगळे अभिवादन करून बसतात. कर्णाला अंगराज आणि सुर्यपूत्र या नावाने संबोधून दरबारात बोलावण्यात येतं.


कर्ण (आरोपीच्या पिंजऱ्यात): "अरे वा, चित्रगुप्त! बरे झाले कुंतीपूत्र नाही म्हणालात ते!"


चित्रगुप्त: "कुंतीकडून आम्हाला कळलं की तुला कुंतीपूत्र म्हटलेलं चालत नाही!"


नंतर ते एका जाड पुस्तकामधून आरोप वाचतात.


चित्रगुप्त: "तुझ्यावर पहिला आरोप. तू जिवंत असेपर्यंत पृथ्वीवर तुझे कोणतेच कर्तव्य नीट पर पाडले नाहीस!"


(दुर्योधन आक्षेप घेतो. चित्रगुप्त त्याला खाली बसवतात.)


कर्ण या आरोपामुळे गोंधळलेल्या स्थितीत.


चित्रगुप्त: "आरोप नीट समजला नसेल तर मी काही उदाहरणे देतो. तुला जेव्हा कळलं की तू राधेय नसून कौंतेय आहेस तेव्हा तू काय केलेस?"


कर्णाला आठवतं जेव्हा कुंती त्याला भेटायला आली होती.


(युद्धादरम्यान एका रात्रीची वेळ. कर्णाच्या तंबूत कुंती)


कुंती: "आता तुला कळलं की तू माझा पुत्र आहेस. तेव्हा चल आता माझ्यासोबत. तुझ्या भावांसोबत!"


कर्ण: "नाही. आता वेळ निघून गेली आहे. उशीर झाला आहे. तुम्ही मला ज्यांचेजवळ सोडून गेलात त्यांनी मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुरक्षित ठेवलं. आता तुम्ही म्हणता म्हणून मी त्यांना सोडून देऊ? दुर्योधनासोबत मैत्री आणि त्याचा विश्वास मी नाही तोडू शकत! तुम्ही तुमच्या पुत्रांच्या शत्रूंच्या शिबिरातून जा आता!!"


पुन्हा चित्रगुप्तच्या दरबारात -


चित्रगुप्त: "तुला तू कुंतीपूत्र असल्याचे माहीत पडल्यावर सुध्दा तू तुझ्या भावांकडे जायला नाकारलेस? म्हणजे कर्तव्यापासून दूर जाणे नव्हे का?"


कर्ण कुत्सितपणे हसायला लागतो.


कर्ण: "चित्रगुप्त जी, तुम्हाला वाटतं की मी पुत्र कर्तव्य निभवलं नाही आणि मला वाटतं की कुंतीने माता कर्तव्य पार पडलं नाही. सापेक्ष आहे हे सगळं! नाही का?"


चित्रगुप्त: "हे बघ कर्ण. हे आरोप म्हणजे कोडे नाहीयेत, सोडवायला आणि शब्दच्छल करायला! लक्षात घे. काही कर्म असे असतात जे करणारा आणि न करणारा सारखाच दोषी असतो!"


कर्ण: "मी कर्तव्य पार पाडलं नाही असं तुम्ही म्हणता पण मी ज्या सारथीकडे लहानाचा मोठा झालो त्या घरातील आई वडील आणि माझा भाऊ शोण याचे प्रती माझे जे काही कर्तव्य होते ते मी पार पाडलेच की! त्यामुळे कर्तव्य पार न पडल्याचा तुमचा आरोप चूक आहे!"


युधिष्ठिर: "पण तुला जेव्हा कळलं की आम्ही तुझे भाऊ आहोत तेव्हा तुझे कर्तव्य आमच्याशी जोडले गेले. मग ते तू का नाही निभवलेस?"


कर्ण: "धर्मराज तुम्हाला धर्माचे ज्ञान आहे पण जी एक व्यावहारिक समज असावी लागते ती नाही आहे तुमच्यात! आता मी चित्रगुप्त यांना विचारतो की जेथे कर्तव्य असते तेथे अधिकार असतो की नाही, सांगा बरे?"


चित्रगुप्त: "नक्कीच. अधिकाराने कर्तव्याला बांधलेले असते!"


कर्ण: "तेच म्हणतो मी! हे बघा युधिष्ठिरजी, मी आणि कुंती यांच्यात एक बंध आहे असे तुम्हाला वाटत होते असे तुम्ही एकदा कबूल केले होते, तेव्हा तुम्ही कुंतीला का विचारले नाही माझ्याबद्दल? माझ्याबद्दल जाणून घेण्याचा थोडा प्रयत्न का केला नाहीत? तुम्हाला जीवनात मोठ्या भावाची कमतरता वाटे तेव्हा तुम्ही कुंतीला एका शब्दाने विचारले का नाही? सोडा ते आता. जाउद्या! मी एकच कर्तव्य जाणतो. ते म्हणजे माझा मित्र दुर्योधन याचे प्रती असलेले माझे कर्तव्य!!"


भीष्म: "तू जे काही दुर्योधनासोबत निभावले ते काही कर्तव्य बिर्तव्य नव्हतं. फक्त मैत्री निभवलीस तू! परतफेड या नात्याने!!"


कर्ण: "का निभावू नको? दुर्योधन यानेच माझ्या जीवनाला नवीन दिशा दिली. मला अंग देशाचा राजा बनवलं!!"


भीष्म: "दुर्योधन कोण लागून गेला तुला अंग देशाचा राजा बनवणारा? तो एक युवराज होता, राजा नाही. त्याला कोणी अधिकार दिला तुला अंग देश देऊन त्याचा राजा बनवण्याचा?"


मग दुर्योधनावर भीष्म आरोप करतात की त्याने कर्णाशी मैत्री फक्त यासाठी केली की त्याला एक असा योद्धा हवा होता जो अर्जुनाला हरवू शकेल. म्हणजे स्वार्थासाठी मैत्री! आणि कर्णाचे दुर्योधनाप्रती काही कर्तव्य आहे असे म्हणता येत नाही कारण त्यांची मैत्रीच मुळात स्वार्थावर आधारित होती...


मध्येच दुर्योधन त्यांना तोडून खंडन करतो पण..


चित्रगुप्त दोघांना मध्येच थांबवून म्हणतात की, कर्णावर याआधी जो आरोप होता तो आधी पाहू! त्याने आपली आई आणि पाच भाऊ यांचेप्रती जे त्याचे कर्तव्य होते ते पाळले नाही, पण जर का पांडव कुंती यांनीच त्याला जाणूनबुजून त्यांच्यापासून दूर ठेवले होते तर मग कर्णाचे त्यांचेप्रती काही कर्तव्य उरत नाही...


म्हणून त्या आरोपाचे खंडन करून तो आरोप चूक आहे असे चित्रगुप्त जाहीर करतात.


पुढे चित्रगुप्त सांगतात: "आता पाहू कर्णाचे दुर्योधनाप्रती असलेले कर्तव्य! भीष्माचार्यच्या म्हणण्यानुसार कर्णाचे दुर्योधनाप्रती काही कर्तव्य नव्हतेच कारण कर्णाला अंग देशाचा राजा त्याला बनवण्याची प्रक्रियाच मुळात चूक होती तर मग कर्ण दुर्योधचे उपकार फेडण्यासाठी जे कर्तव्य करत होता त्याला काहीही अर्थ नाही! आता कर्ण अंगराज असो की नसो पण प्रश्न हा आहे की कर्णाने दुर्योधनासोबत मैत्री काय फक्त स्वार्थासाठी केली? हाच पुढचा आरोप आहे कर्णावर की त्याने दुर्योधनाशी मैत्री फक्त अर्जुनाला पराजित करण्यासाठी केली!"


कर्ण: "महाराज, हे असत्य आहे!"


भीम: "कर्ण, हे सत्य आहे. आमच्या दिक्षांत समारंभात तू ज्या पद्धतीने अर्जुनाला आव्हान दिले होतेस त्यावरून हे स्पष्ट होते की तुझ्या आयुष्याचा उद्देश फक्त अर्जुनाला हरवणे हाच होता!"


दुर्योधन: "भीमा, तुला हजारदा सांगितले आहे की माझ्या आणि कर्णाच्या मैत्रीचा उपहास करण्याचा तुला काहीही अधिकार नाही!"


गांधारी: "पुत्र, भीम योग्य तेच सांगतोय!"


दुर्योधन: "माते, हे काय सांगते आहेस तू?"


गांधारी: "हो दुर्योधन मी बरोबर सांगते आहे, कर्ण, तू एक दुर्योधनाचा चांगला मित्र असल्याची बतावणी करतोस ना? मग एक सांग, युद्ध झाल्यावर दुर्योधनाला नुकसान होईल तसेच कृष्ण ज्या पक्षात आहेत त्याचाच विजय होईल, हे तुला माहीत होते ना? मग तू दुर्योधनाला परावृत्त का नाही केलेस युद्धापासून?"


कर्ण शांत... निरुत्तर नाही पण भावनावश होतो... म्हणून शब्द निघत नाहीत...


सगळे म्हणतात की तू शांत राहिलास याचा अर्थ तुला हा आरोप मान्य आहे!!


मग चिडून कर्ण म्हणतो: "चित्रगुप्त महाराज, मी दुर्योधनाला युद्धपासून परावृत्त केले नाही कारण मी त्याला गमावू इच्छित नव्हतो महाराज! मला सांगा इथे बसलेले सगळेजण जन्मापासून जाणतात की ते कोण आहेत? पण मला मात्र तरुण होईपर्यंत मी कोण आहे मला माहित नव्हते. नेहमी वाटायचे की मी जर सूतपुत्र आहे तर माझ्यात क्षत्रिय गुण का? मग कळले की कुणीतरी मला जन्म दिला आणि त्यागले. हे लक्षात घ्या की, दिक्षांत समारंभात मी फक्त माझे क्षत्रिय गुण लोकांना दाखवण्यासाठी गेलो होतो. पण गुरू द्रोण आणि कृपाचार्य यांनी मला स्पर्धेत भाग घेऊ दिला नाही. कुंतीनंतर पुन्हा एकदा कुणीतरी मला स्विकारू शकत नव्हते. तशातच माझा मित्र दुर्योधन माझे भाग्य बनून आला. माझ्यासारख्या अनाथाला घर मिळाले दुर्योधनाच्या हृदयात!"


भीम: "मिळालं का उत्तर आता भीष्म महाराज?"


भीष्म चूप आणि निरुत्तर!!


मग कर्ण एक जुना प्रसंग सांगतो....


दुर्योधन, दु:शासन आणि कर्ण बोलत असतात.


दु:शासनला दुर्योधनाने विचारल्यावर तो युद्ध नक्की करण्याचा सल्ला भावाला देतो, नंतर मग दुर्योधन कर्णाला विचारतो...


दुर्योधन: "मित्र कर्ण! कृष्णाचा संधीचा प्रस्ताव मी नाकारला आहे पण सगळेच म्हणतात की युद्ध करू नकोस. सगळे म्हणत आहेत तर ते योग्यच असेल पण कर्ण तू सांग युद्ध करू की नको? तू सांग कर्णा, माझ्या जागी असतास तर काय केले असतेस?"


कर्ण: "आतापर्यंत तू जे नाही करायला हवे होते, तेही केलेस आणि आता युद्धाच्या वेळेस विचारतोस की युद्ध करू का? मग मी सांगतो की नको करुस! भाऊ भावाशी लढून काय मिळणार आपल्याला? नको करुस युद्ध!"


दुर्योधन: "पण युद्ध जर झाले नाही तर तुला अर्जुनाशी लढायला पण मिळणार नाही मित्रा! तुझी धनुर्विद्या तुला जगासमोर सिद्ध करायला मिळणार नाही, लक्षात ठेव!"


कर्ण: "दुर्योधन, माझ्या धनुष्यापेक्षा मला माझा मित्र म्हणजे तू प्रिय आहेस. तुला युध्दाबद्दल आणि आपल्या विजयाबद्दल शंका असेल तर नकोच ते युद्ध! आणि राहिली गोष्ट माझी धनुर्विद्या सिद्ध करण्याची! तर, मला माहिती आहे की मी नक्कीच अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे, त्यासाठी मला सिद्ध करायची गरज नाही!"


दुर्योधन: "पण मित्रा युद्ध टाळून पांडवांना आपल्यासोबत उठता बसता समोर बघून तसेच त्यांना आपल्यावर राज्य करताना बघून आपले उर्वरित आयुष्य घालवण्यापेक्षा तर युद्ध केलेलं परवडलं रे!"


कर्ण: "तू मला सल्ला मागितलास आणि मी दिला! पण मित्रा, शेवटी तू जे म्हणशील ते! तुला वाटतंय ना युद्ध करावसं? मग करूया आपण युद्ध!! मी सदैव तुझ्याच सोबत राहीन!"


जुना प्रसंग संपतो...!


चित्रगुप्त: "या एकंदरीत स्पष्टीकरणावरून आणि चर्चेवरून दिसून येते की कर्णावरचा हा आरोप आता चुकीचा सिद्ध झाला की त्याने दुर्योधनाशी स्वार्थासाठी मैत्री केली! उलट त्याने दुर्योधनाप्रती असलेले मित्रत्वावचे कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडले!"


चित्रगुप्त कर्णावर पुढचा आरोप लावण्याकरता धृतराष्ट्रला बोलायला सांगणार तेवढ्यात दुर्योधन धृतराष्ट्रवर दबाव आणतो. चित्रगुप्त त्याला थांबवतो.


चित्रगुप्त: "कर्णाने युद्धात दुर्योधनचा विश्वासघात केला आणि हा आरोप आहे खुद्द धृतराष्ट्राचा! कर्णावर!"


दुर्योधन: "हा आरोप असत्य आहे. माझ्या वडिलांना काय माहिती युद्धात काय झालं आणि काय नाही?"


चित्रगुप्त: "दुर्योधन, तू विसरलास का संजयला? ज्याने तुझ्या वडिलांना युद्धाचा सगळा वृत्तांत दिला?"


धृतराष्ट्र: "युद्धात कर्णाने काहीच कामगिरी केली नाही दुर्योधना! छोट्या मोठ्या सैनिकांना मारायला म्हणून आपण कर्णाला युद्धात थोडेच घेतले होते? जर नुसते सैनिकांना मारायचे असते तर त्यासाठी गुरु द्रोणाचार्य सुद्धा पुरेसे होते."


धृतराष्ट्र आणि संजय यांचा युद्धाच्या वेळेस होत असलेल्या संवादाचा भाग सुरु होतो:


संजय: "युद्धात आता कर्ण आणि सहदेव समोरासमोर आलेत."


धृतराष्ट्र: "अरे वा!"


संजय: "कर्णाने सहदेवचे सगळे शस्त्र तोडले."


धृतराष्ट्र: "अरे वा! आता काय चालले आहे? सहदेवने हार पत्करली का? कर्णाने त्याला मारले का?"


संजय: "नाही! अचानक कर्ण सहदेवला काहीही न करता निघून गेला.."


धृतराष्ट्र: "निघून गेला?"


संजय: "हो! निघून गेला! आणि जाण्यापूर्वी तो सहदेवला काहीतरी म्हणाला."


धृतराष्ट्र: "काय? कदाचित कर्णाने त्याला एक अबोध बालक म्हणून सोडून दिले असेल. एखाद्या अबोध बालकाचा कशासाठी म्हणून वध करायचा बरे?"


संजय: "कदाचित तसे असेल!"


धृतराष्ट्र: "आता सांग भीमाचे काय चालले आहे?"


संजय: "आता कर्ण आणि भीम धनुर्युद्ध खेळत आहेत!"


धृतराष्ट्र: "काय? भीमाला धनुष्यबाण चालवता येतो?"


संजय: "माहित नाही. पण भीम जवळपास हरण्याच्या बेतात आहे. भीमाचे धनुष्य कर्णाने एका बाणाने तोडून दूर फेकले."


धृतराष्ट्र: "वा! मग तर भीम गेलाच म्हणून समजा!"


संजय: "महाराज! समोर एक अनपेक्षित घडतंय. भिमाशी अचानक युद्ध करायचे थांबवून कर्ण पुढे निघाला. जाण्यापूर्वी तो भीमाला काहीतरी म्हणाला."


धृतराष्ट्र: "अरे? या कर्णाला आज झालंय तरी काय संजया?"


संजय: "माहित नाही. पण आता कर्ण युधिष्ठिरच्या समोर आला आहे."


धृतराष्ट्र: "कळलं आता. त्या दोघांना कर्णाने यासाठी सोडलं असावं की त्याला सरळ सरळ युधिष्ठिरलाच मारायचे असावे."


संजय: "कर्ण तेथूनही निघून गेला आणि जातांना युधिष्ठिरला म्हणाला - माझ्यापुढे तुम्ही कुणी टिकू शकत नाहीत पण तरीही तुम्हाला मी सोडतो आहे आणि त्यासाठी तुझ्या आईला धन्यवाद जरूर दे!"


धृतराष्ट्र आणि संजय यांचा संवादाचा भाग समाप्त होतो.


धर्मक्षेत्राच्या दरबारात:


धृतराष्ट्र: "मला हे नंतर माहित पडलं होतं की कर्ण कुंतीपुत्र होता. पण कर्णाने जे केलं तो दुर्योधनाचा एक प्रकारे विश्वासघात नाही का?"


कुंती: "तो विश्वासघात नसून बलिदान होतं!"


धृतराष्ट्र: "ते कसं काय?"


अर्जुन: "हे काय माते? कर्ण माझ्या जीवावर उठला होता आणि तुम्ही त्याला चांगले म्हणता? बलिदान म्हणता त्याच्या या कृत्यांना?"


कुंती: "त्याने त्याच्या मंत्राने भारलेल्या विशिष्ट पाच बाणांवर पाचही पांडवांची नावं लिहूनही टाकली होती. ते बाण असे होते की नावं लिहिली की त्या व्यक्तीचा ते वेध घेणारच. पण नेमकं त्याच वेळेस मी त्याला त्याच्या जीवनाचं रहस्य सांगितलं. मग मी त्याला पांडवांना न मारण्याचं वाचन मागितलं."


गांधारी: "हे कुंतीचे षडयंत्र होते. पण मला हे सांगा, कर्णाजवळ इंद्रास्त्र होते आणि इंद्र अर्जुनाचे वडील पण अर्जुन कर्णाचा शत्रू! मला सांगा इंद्राचे अस्त्र सूर्यपुत्राजवळ कसे काय आले? सांग कर्ण? हे अस्त्र तुझ्याजवळ कसे आले? आणि अजून एक प्रश्न! तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या कानात कुंडल होते, शरीरावर एक कवच होते! सत्य आहे ना कुंती? काय विशिष्ट शक्ती होती त्या कवचामध्ये? सांग जरा!"


कर्ण: "कवच अभेद्य होते."


गांधारी: "कवच अभेद्य होते आणि तरीही तू युद्ध हरलासच कसा? कुठे गेले ते कवच? बोल ना? ते जर तुझ्याकडे असते तर तुला कुणीही पराजित करू शकले नसते."


कर्ण निरुत्तर होतो, भावनाविवश होतो.


गांधारी: "मी सांगते ना! तू ते अर्जुनाच्या वडलांना दिले. आणि त्यांचेकडून इंद्रास्त्र घेतले. बरोबर?"


कर्ण मागचा प्रसंग आठवतो/सांगतो:


इंद्र वेश बदलून सकाळी सकाळी कर्णाला म्हणतो, "मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे. देतोस?"


कर्ण, "दिले!"


याचकाच्या वेशातील इंद्र, "बघ बरं! नीट विचार करून हो म्हण! कारण मी अजून वस्तूचे नांव सांगितले नाही, त्याच्या आधीच तू हो म्हणालास!"


कर्ण, "मी माझ्या दारातून कुणाही याचकाला परत पाठवत नाही. त्याला हवे ते देतो."


याचकाच्या वेशातील इंद्र, "मग मला तुझ्या या सफेद कपड्यांमागे लपलेले ते अभेद्य कवच कुंडले दे!"


कर्णाने ते वचनाप्रमाणे काढून दिले.


इंद्र: "तू आपल्या दानशूर या कीर्तीला सार्थ ठरवलेस! आता मी सुध्दा काही निर्दयी देव नाही. मी त्या बदल्यात तुला अशी शक्ती देतो की तू माझे नाव घेतलेस तर साधा बाणसुध्दा माझे अस्त्र बनेल, इंद्रास्त्र! ज्याचा सामना कुणीही करू शकणार नाही!"


कर्ण: "कुणीही नाही? अर्जुन सुध्दा नाही?"


इंद्र: "नाही, अर्जुन सुध्दा नाही!"


कर्ण: "ठीक आहे, जाण्याआधी एक विनंती आहे तुम्हाला. आपल्यातील ही भेट कुणाला सांगू नका. कारण ज्याप्रमाणे एका दरिद्री ब्राम्हणाचा वेष घेऊन तुम्ही माझ्याशी कपट केले त्याप्रमाणे यापुढे कुणी दानशूर व्यक्ती मग अशा प्रकारच्या याचकावर विश्वास ठेवणार नाही."


ठीक आहे असे म्हणून इंद्रदेव निघून गेले.


(पुन्हा चित्रगुप्तचे धर्मक्षेत्र)


गांधारी: "याला चांगले इंद्रास्त्र मिळाले होते, त्याचा देखील याने उपयोग केला नाही. पण मी म्हणते तू तुझे कवच का दिलेस? नाही दिले असतेस तर काय बिघडले असते?"


कर्ण: "मग माझी दानशूर ही उपाधी काय कामाची? मला माझ्या कीर्तीला जागायचे होते, शब्दाला जागायचे होते!'


गांधारी: "अरे पण तू विचार केलास का जेव्हा तू हे कवच कुंडले दान केले तेव्हा दुर्योधनाच्या मनावर किती आघात झाला?"


मग एक जुना प्रसंग समोर येतो...


युद्ध सुरू असते त्या दरम्यान, दुर्योधनाच्या तंबूत -


दुर्योधन गांधारीला आणि दुःशासनला सांगतो की आज कर्णाने असं काही केलं आहे की तुम्ही हस्तिनापूर सोडूनच निघून जाल.


मग ते दोघे जण विचारतात की नेमकं काय झालं तेव्हा दुर्योधन सांगतो की कर्णाने आपली कवचकुंडले देऊन टाकली तेव्हा गांधारी म्हणते की हे मला माहिती होतं तो तुझ्याशी एकनिष्ठ नाही आणि हा तुझा मित्र काहीच कामाचा नाही.


पण दुर्योधनाला अजूनही कर्णावर विश्वास आहे. तो म्हणतो की मी कर्णाशी मैत्री फक्त तो अजिंक्य आहे यासाठी नव्हती केली. केवळ त्याचेकडे कवच कुंडले आहेत या कारणासाठी मी त्याच्याशी मैत्री केली नव्हती.


पण तरीही गांधारी म्हणते की त्याच्याशी मैत्री तोड. तेव्हा दुर्योधन सांगतो की मग काय त्याला जाऊन सांगू की तू माझ्या काही कामाचा राहिलेला नाही म्हणून मी तुझ्याशी मैत्री तोडतो आहे? ते काही नाही. तो माझा मित्र आहे आणि मित्रच राहणार.


(जुना प्रसंग समाप्त)


चित्रगुप्ताच्या दरबारात मग गांधारी पुढे कर्णाला सांगते की मी एवढे सांगून सुद्धा दुर्योधनाने तुझ्याशी मैत्री तोडली नाही. तुला माफ केलं.


कर्ण म्हणतो, "हो मला माहिती आहे की दुर्योधनाने मला माफ केलं. पण पण आपणा सगळ्यांना हेसुद्धा माहिती आहे किती मी मुद्दाम केले नव्हते तर माझ्याशी कपट करून ती कवच-कुंडले काढली गेली ती माझ्या दानशूरपणाचा फायदा घेऊन! पण मला जन्मभर याचा सल बोचत राहिल की मी माझ्या मित्राच्या उपयोगी पडू शकणार होतं असं काहीतरी दानात देऊन टाकलं. दुर्योधन, मला माहिती आहे की तू मला माफ करून टाकले होते पण आज पुन्हा मी येथे तुझी क्षमा मागतो!"


दुर्योधन म्हणतो, "अरे मैत्रीमध्ये क्षमा मागू नये. अर्जुन आणि त्याच्या वडिलांनी आपल्या सोबत कपट केले आहे. पांडवांना मारू शकतील असे बाण अर्जुनाने मागून घेतले आणि त्याचे वडील इंद्र यांनी तुझी कवच-कुंडले मागून घेतली. हे पांडव आपल्याला घाबरत होते. आपल्या सामर्थ्यालाला घाबरत होते म्हणूनच कपटाचा वापर यांना करावा लागला. आपल्या या जन्मात आपण पांडवांकडून भरपूर काही शिकलो जे आपल्याला पुढच्या जन्मी कामास येईल!"


मग पुढे दुर्योधन चित्रगुप्ताला सांगतो की महाराज माझा मित्र कर्णावर लागलेला हा आरोप असत्य आहे आणि हेसुद्धा सांगतो की माझ्या मित्राने माझ्यासोबत कसलाही विश्वासघात केलेला नाही.


मग चित्रगुप्त फैसला सुनावतात की दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री स्वार्थावर आधारलेली नव्हती आणि कर्णाने दुर्योधनाचा कोणत्याच प्रकारचा विश्वासघात केलेला नव्हता.


मग करण्यावर पुढचा आरोप लावण्यासाठी परशुराम येतात. सगळे उठून उभे राहतात. ते कर्णाला मात्र त्यांचा नमस्कार करण्यास मज्जाव करतात.


परशुराम स्वतःची ओळख करून देतात.


"मी रेणुका आणि जमदग्नीचा पुत्र असून, महादेव शंकराचा शिष्य आहे. तसेच द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचा मी गुरु!"


कर्ण म्हणतो की मी सुद्धा तुमचा शिष्य आहे.


परशुराम म्हणतात की जरी तू माझा शिष्य होतास पण तू असं काहीच केलं नाही की ज्यामुळे मी तुझा परिचय माझा शिष्य म्हणून करून देऊ शकेल.


चित्रगुप्त म्हणतात, "कर्ण आणि परशुराम यांचे संवाद ऐकून एकंदरीत असं वाटतं की या दोन्ही गुरु शिष्यात काहीतरी बेबनाव असावा! ते का हे आपल्याला लवकरच कळेल! आणि पुढचा आरोप कर्णावर हाच आहे की त्याने कपट करून परशुरामांकडून शिक्षण घेतले!"


परशुराम म्हणतात, "माझी प्रतिज्ञा सर्वांना माहीत आहे की मी क्षत्रिय लोकांना शिक्षण देत नाही. कर्णाने स्वतःचे नाव वासू आणि वडील मंदिराचे पुजारी आहे असं खोटं सांगून स्वतः ब्राम्हण आहे असे भासवले. मग शिक्षण घेतले. द्रोणाचार्यनंतर चांगला धनुर्धारी फक्त कर्ण हाच होता. मी कर्णाला ब्रह्मास्त्र सुध्दा शिकवले होते. पण त्याचा उपयोग फक्त क्षत्रिय लोकांच्या विरूद्ध करायचा असे सांगितले होते!'


सगळे विचारतात की मग ते ब्रह्मास्त्र कर्णाने युध्दात वापरले का नाही?


कर्ण सांगतो की परशुराम यांच्या शिकवणीनुसार मी प्राप्त केलेले ते ब्रह्मास्त्र त्यांनी नंतर परत घेतले. त्याचा वेळेवर मला उपयोग होणार नाही असा शाप दिला कारण त्यांना एके दिवशी माहिती पडले की मी क्षत्रिय आहे, ब्राम्हण नाही!


चित्रगुप्त विचारतात, "ते त्यांना कसे माहिती पडले?"


परशुराम, "एके दिवशी मी आराम करतांना कर्णाने माझे डोके त्याच्या मांडीवर घेतले आणि एक विंचू त्याला मांडीला चावायला लागला. पण रक्त येत असतानासुद्धा कर्ण मी झोपेतून उठेपर्यंत तो शांत राहिला. त्याने वेदना सहन केल्या. मला जाग आल्यावर ते रक्त दिसले. एवढी सहनशक्ती नक्की एखाद्या क्षत्रिय व्यक्ती मध्येच असते, एखाद्या ब्राम्हण व्यक्तीत नाही आणि कर्ण ब्राम्हण नाही हे मी ओळखले आणि कर्णाला शाप दिला आणि हाकलून दिले"


मग कर्ण द्रोणाचार्यांना दोष देतो कारण कर्णाला त्यांनी शिक्षण नाकारले आणि त्यांनी त्यांचा शिक्षक धर्म पाळला नाही. कर्ण सुतपुत्र असल्याने त्याला द्रोणकडून शिक्षण नाकारण्यात आले म्हणून कर्णाने प्रतिज्ञा घेतली होती की द्रोणाने नाकारले तर द्रोणाच्या गुरुकडून म्हणजे परशुराम यांचेकडून मी शिकेन. मग खोटं बोलण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता असे तो सांगतो...


"एक गुरु जे फक्त राजकुमारांना शिकवतात तर दुसरे फक्त ब्राम्हणांना, मग मी अशा स्थितींत काय करायचे? शिक्षणाचा अधिकार तर प्रत्येकाला असतो जे मला का नाकारण्यात आलं? तेही माझी चूक नसताना?" असा प्रश्न कर्ण विचारतो. सगळ्यांना ते म्हणणे पटते.


पुढे कर्ण अर्जुनाला म्हणतो, "खरे तर आपण युध्दात समोरासमोर यायला हवे होते. तिथे कुणीच सुर्यपुत्र आणि कुणीच इंद्रपुत्र नसेल फक्त एक योद्धा दुसऱ्या योध्याशी लढला असता आणि समजा मेहनत करून परशुराम यांचेकडून प्राप्त केलेले ब्रह्मास्त्र माझेकडे युद्ध करताना असते आणि कवच कुंडले असती तर सांग अर्जुना कोण जिंकले असते?"


अर्जुन विचारात पडतो आणि म्हणतो, "शिक्षणाचा हक्क प्रत्येकास असतो, कर्ण तू बरोबर म्हणत आहेस! आणि कोण जिंकले असते याला महत्व नाही तर आपण आपल्या सर्व शक्ती आणि सामर्थ्यानिशी लढलो हे मला समजतं! पण शेवटी युध्दात मी जिंकलो असलो तरीसुध्दा..."


द्रोण, "अर्जुन, मी हे सगळं तुझ्यासाठीच केलं रे!"


अर्जुन, "गुरुवर्य मला तुमच्याबद्दल आदर आहे पण मला ही टोचणी सतत बोचत राहील की कर्णाला योग्य शिक्षण नाकारण्यात आलं होतं आणि तो एक शापित होता जे मला आता कळतंय आणि अशा कर्णाशी मी युद्ध जिंकलो हे मला योग्य वाटत नाही!"


पुढे दुर्योधन म्हणतो, "कर्णा मित्रा तू परशुराम यांना माफ कर पण त्यांना ही कल्पना नाही की तुझ्या रूपाने त्यांनी किती चांगला शिष्य गमावला ज्याने आपल्या गुरूची कीर्ती आणखी वाढवली असती!"


चित्रगुप्त मान्य करतात की दोन्ही गुरूंनी कर्णासोबत जे केलं ते योग्य नव्हतं आणि त्यांनी त्यांचा शिक्षक धर्म पाळला नाही. म्हणून कर्णावरचा हा आरोप सुध्दा निराधार आहे!"


चित्रगुप्त कर्णाबद्दल शेवटचा निकाल आणि निर्णय देणार तेवढ्यात कृष्ण त्यांना थांबवत कर्णाला म्हणतो, "कर्ण, तू कोण आहेस नेमका सांगतोस का? कुंतीपुत्र, सुतपुत्र, अंगराज, कर्ण, वासुसेन, दानवीर, नेमका कोण?


कर्ण, "मी समजलो नाही केशवा? मलाच समजतं नाही मी नेमका कोण?"


कृष्ण, "कधीपर्यंत शोध घेशील स्वतःचा? तू आयुष्यभर फक्त स्वतःच्या शोधात राहिलास पण दरवेळेस जी ओळख मिळाली तिचा तू प्रामाणिकपणाने अंगीकार केला नाहीस. तुझा प्रत्येक बाण हा लक्ष्य भेदण्यासाठी न निघता तो एकेक शंका घेऊन निघायचा!"


कर्ण, "मग मी काय करायला हवे होते नेमके?"


कृष्ण, "द्रौपदीचा अपमान थांबवू शकला असतास, अभिमन्यूच्या वधाच्या कटापासून अलिप्त राहू शकला असतास किंवा जेव्हा तुला माहित पडले की तू कुंतिपुत्र आहेस तेव्हा पुन्हा पांडवांकडे परत जाऊ शकला असतास!"


कर्ण, "दुर्योधनाला सोडून धोका देऊन?"


कृष्ण, "त्याने तुला माफ केलं असतं, विचार त्याला!"


कर्ण, "त्याने माफ केलं असतं पण मी स्वतः ला माफ नसतो करू शकलो!"


कृष्ण, "ही तुझी आणखी एक समस्या! तू कुणाला क्षमा नाही करू शकत, ना कुंतीला, ना अर्जुनाला, ना द्रोणाला, ना स्वतःला! करून टाक सगळ्यांना माफ आता... आणि स्वतःला सुध्दा आणि हो मोकळा!"


कर्ण एपिसोड संपतो.