जय जय श्रीगजवदना , हे गणर...
जय जय श्रीगजवदना, हे गणराया, गौरिकुमारा हो
करुणाकर सुकुमारा, महारणधीरा, गुण गंभिरा, हो ॥ध्रु०॥
शेंदुरवक्त्र-सुरंगित, अनुपम दोंदिल, रुप साजरें हो
शुंडादंड सुशोभित, सदा मद गंडस्थळिं पाझरे हो
कनक-कटक-मुकुटाच्यावर जडिताचे चमकति हिरे हो
श्रीकृष्णागरु चंदन अंगीं उटि मर्दित केशरें हो
मस्तकिं धरिसी बरवा हिरवा मरवा दुर्वांकुरा हो ॥जय जय० ॥१॥
कसित पितांबर पिवळा, गळां हार पुष्पांचे डोलती हो
तळपति कुंडलें कर्णीं, पंखे कर्णांचे हालती हो
सिद्ध, सरस्वति, ऋद्धि, सिद्धि, बुद्धीनें चालती हो
रुणझुण पैंजण चरणीं, वाणि गीर्वाणी, बोलती हो
वंदिति सुरनर पन्नग, निजगण वारिति शिरिं चामरें हो ॥जय० ॥२॥
सकळ मंगळारंभीं, सकळहि चिंतित चिंतामणी हो
चिंतन करि चतुरानन, गुणगण वर्णी दशशत फणी हो
नामस्मरणें पळती, कोटी विघ्नांच्या त्या श्रेणी हो
उद्धरि भक्त न हलतां, किंचित नेत्राची पापणी हो
त्राता तूं सर्वत्रां, रविशशिइंद्रासह सुरवरां हो ॥जय जय० ॥३॥
शरणांगत मी आलों, तुज फरशांकुश-मोदक-धरा हो
धांवे, पावे, कृपा कर सत्वर, यावें लंबोदरा हो
ओवाळिन आरती उजळुन दीपावळी कर्पूरा हो
वाहुनिया पुष्पांजलि पदयुग वंदिन जोडुन करा हो
विष्णुदास म्हणे, करी पावन वर देउनि किंकरा हो ॥जय जय० ॥४॥