उठि उठि दत्तात्रेया, करुणासिंधु कृपालया
उठि उठि दत्तात्रेया । करुणासिंधु कृपालया ।
उठवि माता अनसूया । प्रेमें टाळ्या पिटूनियां ॥ध्रु.॥
सप्त पंचम अरुणोदय । जाला स्नानाचा समय ।
भानुप्रकाश होऊ पाहे । रविरश्मिा दाटल्या ॥१॥
उठले साधकांचे वृन्द । करिति तव नामाचा छंद ।
हृदयी ध्याती ब्रह्मानंद । प्रेमभावे करुनी ॥२॥
व्यास वाल्मिकि नारदमुनि । आदि करोनि सर्व मुनी ।
उभे राहिले आंगणी । दर्शनासी पातले ॥३॥
गंगा यमुना सरस्वती । तुंगभद्रा भागीरथी ।
मणिकर्णिका भीमरथी । स्नान घालूं पातल्या ॥४॥
इंद्रचंद्रादि सुरगण । आले दर्शनालागून।
करिती स्तोत्र अनुवादन । कीर्ति तुझिया नामाची ॥५॥
ऐकुनि मातेची करुणा । उठला साधकांचा राणा ।
निरंजनाचिये मना । प्रेमानंद दाटला ॥६॥