श्रीशिवलीलामृत – अध्याय नववा
अध्याय नववा
श्रीगणेशाय नमः ॥
जेथे शिवनामघोष निरंतर ॥ तेथे कैचे जन्ममरणसंसार ॥ तिही कळिकाळ जिंकिला समग्र ॥ शिवशिवछंदेकरूनिया ॥१॥
पाप जळावया निश्चिती ॥ शिवनामी आहे ज्याची आसक्ती ॥ त्यासी नाही पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥२॥
जैसे प्राणियाचे चित्त ॥ विषयी गुंतले अत्यंत ॥ तैसे शिवनामी होता रत ॥ तरी बंधन कैचे तया ॥३॥
धन इच्छा धरूनि चित्ती ॥ धनाढ्याची करिती स्तुती ॥ तैसे शिवनामी प्रवर्तती ॥ तरी जन्ममरण कैचे तया ॥४॥
राजभांडारीचे धन ॥ साधावया करिती यत्न ॥ तैसे शिवचरणी जडले मन ॥ तरी संकट विघ्न कैचे तया ॥५॥
धन्य ते शिवध्यानी रत ॥ येचिविषयी कथा अद्भुत ॥ नैमिषारण्यी सांगत ॥ सूत शौनकादिकांप्रती ॥६॥
वामदेव नामे महाज्ञानी ॥ शिवध्यानी रत विचरे काननी ॥ एकाकी निर्माय शांत दांत जनी ॥ त्रिविधभेदरहित जो ॥७॥
दिशा जयाचे अंबर ॥ भस्मचर्चित दिगंबर ॥ निराहार निरंतर ॥ एकलाचि हिंडतसे ॥८॥
काय करावे कोठे जावे ॥ काय घेवोनि काय त्यजावे ॥ विश्व शिवमय आघवे ॥ खेद मोह भेद नाही ॥९॥
अक्रोध वैराग्य इंद्रियदमन ॥ क्षमा दया कृपा समान ॥ निर्लोभ दाता भय शोक मान ॥ काळत्रयी न धरीच ॥१०॥
गृहापत्यदारावर्जित ॥ कोणी एक परिग्रह नाही सत्य ॥ कायावाचामनोदंडयुक्त ॥ मौनी न बोले इतरांसी ॥११॥
ज्ञानचरा शिवस्मरण ॥ त्याविण नेणेचि भाषण ॥ या नाव बोलिजे मौन ॥ भेदाभेदरहित जो ॥१२॥
सर्वांच्या अनुग्रहास्तव ॥ ते स्वरूप धरोनि विचरे शिव ॥ जडजीव तारावया सर्व ॥ विचरे सृष्टी स्वइच्छे ॥१३॥
कार्याकार्य सारूनि कारण ॥ आत्मस्वरूपी पावला समाधान ॥ देहत्रयरहित विधिनिषेधहीन ॥ प्रवृत्तिनिवृत्तिवेगळा ॥१४॥
निरंकुश जो निःसंग ॥ जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग ॥ तयाची रीती अभंग ॥ वेदशास्त्रे वर्णिती ॥१५॥
तो स्वरूपी सदा समाधिस्थ ॥ गगन तेही अंगासी रुतत ॥ म्हणूनि तेही परते सारीत ॥ हेतुदृष्टांतवर्जित जो ॥१६॥
तेणे तेजाचे दाहकत्व जाळिले ॥ उर्वीचे कठिणत्व मोडिले ॥ चंचलत्व हिरोनि घेतले ॥ प्रभंजनाचे तेणे पै ॥१७॥
आर्द्रत्व निरसोन ॥ धुवोनि शुद्ध केले जीवन ॥ एवं पिंडब्रह्मांड जाळून ॥ भस्म अंगी चर्चिले ॥१८॥
ऐसा तो अमूर्तामूर्त ॥ केवळ शुक्र की जडभरत ॥ कौचारण्यी विचरत ॥ सर्वही देखत शिवरूप ॥१९॥
तो एक ब्रह्मराक्षस धावत ॥ महाभयानक शरीर अद्भुत ॥ कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत ॥ भयानक मुखाबाहेरी ॥२०॥
खदिरांगार तैसे नेत्र ॥ बहुत जीव भक्षिले अपरिमित ॥ क्षुधित तृषित पापी कुपात्र ॥ अकस्मात पातला ॥२१॥
महाहिंसक सर्वभक्षक ॥ तेणे वामदेव देखिला पुण्यश्लोक ॥ धावोनिया एकाएक ॥ कंठी घालीत मिठी त्याच्या ॥२२॥
लोह परिसासी झगटता पूर्ण ॥ तत्काळ होय दिव्य सुवर्ण ॥ तेवी त्याच्या अंगस्पर्शेकरून ॥ मति पालटली तयाची ॥२३॥
वामदेवांगीचे भस्म ॥ त्याच्या अंगी लागले उत्तम ॥ सत्त्ववृत्ति झाली परम ॥ असुरभाव पालटला ॥२४॥
आपुल्या अंगी झगटोन ॥ उद्धरिला पिशिताशन ॥ हे त्यासी नाहीच भान ॥ समाधिस्थ सर्वदा ॥२५॥
नेणे सुखदुःख शीतोष्ण ॥ लोक निंदिती की वंदिती पूर्ण ॥ शरीरी भोग की रोग दारुण ॥ हेही नेणे कदा तो ॥२६॥
मी हिंडतो देशी की विदेशी ॥ हेही स्मरण नाही त्यासी ॥ तो ब्रह्मानंद सौख्यराशी ॥ विधिनिषेधी स्पर्शेना ॥२७॥
ऐसा तो योगींद्र निःसीम ॥ त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म ॥ दिव्यरूप होवोनि सप्रेम ॥ चरणी लागला तयाच्या ॥२८॥
सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान ॥ त्यासी आठव झाला संपूर्ण ॥ मानससरोवरी उदकपान ॥ करिता काक हंस होय ॥२९॥
की हाटकनदीतीरी देख ॥ पडता पाषाण काष्ठादिक ॥ दिव्य कार्तस्वर होय सुरेख ॥ तेवी राक्षस पै झाला ॥३०॥
की करिता सुधारसपान ॥ तेथे सहजचि आले देवपण ॥ की शशिकिरणस्पर्शेकरून ॥ द्रवे जैसा चंद्रकांत ॥३१॥
की रवि उगवता निःशेष ॥ निशा सरे प्रगटे प्रकाश ॥ तैसा उद्धरला राक्षस ॥ स्तवन करी तयाचे ॥३२॥
म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण ॥ मी तव दर्शने झालो पावन ॥ तुजसी करिता संभाषण ॥ वाटते पावेन शिवपदा ॥३३॥
मज सहस्त्रजन्मीचे झाले ज्ञान ॥ परी पंचवीस जन्मांपासून ॥ पापे घडली जी दारुण ॥ ती अनुक्रमे सांगतो ॥३४॥
पूर्वी मी राजा दुर्जय ॥ यौवनमदे अति निर्दय ॥ परम दुराचारी होय ॥ ब्राह्मण प्रजा पीडीत ॥३५॥
प्रजेसी नित करी मार ॥ आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार ॥ वेद पुराण शास्त्र ॥ कैसे आहे मी नेणे ॥३६॥
स्वप्नीही नेणे कदा धर्म ॥ ब्रह्महत्यादि पापे केली परम ॥ नारी अपूर्व आणूनि उत्तम ॥ नित्य नूतन भोगी मी ॥३७॥
ऐशा स्त्रिया असंख्य भोगून ॥ बंदी घालूनि केले रक्षण ॥ सर्व देश धुंडोन॥ स्त्रिया नूतन आणवी ॥३८॥
एकदा भोग देऊन ॥ दुसर्याने तिचे न पाहावे वदन ॥ त्या बंदी रडती आक्रंदून ॥ शाप देती मजलागी ॥३९॥
विप्र पळाले राज्यांतून ॥ पट्टणे ग्रामे खेटके जाण ॥ इतुकीही धुंडोन ॥ स्त्रिया धरून आणिल्या ॥४०॥
भोगिल्या तीन शते द्विजनारी ॥ चार शते क्षत्रियकुमारी ॥ वैश्यस्त्रिया सुंदरी ॥ दहा शते भोगिल्या ॥४१॥
शूद्रांच्या सहस्त्र ललना ॥ चांडालनारी चार शते जाणा ॥ त्यावरी अपवित्र मांगकन्या ॥ सहस्त्र एक भोगिल्या ॥४२॥
चर्मककन्या पांच शत ॥ रजकांच्या चार शते गणित ॥ वारांगना असंख्यात ॥ मिती नाही तयाते ॥४३॥
पांच शते महारिणी ॥ तितुक्याच वृषली नितंबिनी ॥ यांवेगळ्या कोण गणी ॥ इतर वर्ण अष्टादश ॥४४॥
इतुक्या कामिनी भोगून ॥ तृप्त नव्हे कदा मन ॥ नित्य करी मद्यपान ॥ अभक्ष्य तितुके भक्षिले ॥४५॥
ऐसे भोगिता पापभोग ॥ मज लागला क्षयरोग ॥ मृत्यु पावलो सवेग ॥ कृतांतदूत धरोनि नेती ॥४६॥
यमपुरीचे दुःख अपार ॥ भोगिले म्यां अति दुस्तर ॥ तप्तताम्रभूमी तीवर ॥ मजलागी चालविले ॥४७॥
लोहस्तंभ तप्त करून ॥ त्यासी नेऊनि देवविती आलिंगन ॥ माझे घोर कर्म जाणून ॥ असिपत्रवनी हिंडविती ॥४८॥
कढईत तेल झाले तप्त ॥ त्यांत नेऊनि बुडवीत ॥ तोंडी घालिती नरक मूत ॥ पाप बहुत जाणोनी ॥४९॥
महाक्षार कटुरस आणोनी ॥ मुखी घालिती पासले पाडोनी ॥ तीक्ष्ण चंचूचे गृध्र येवोनी ॥ नेत्र फोडिती एकसरे ॥५०॥
कुंभीपात्री घालोनि शिजविती कर्णी तप्त लोहदंड दडपिती ॥ अहा तेथींची जाचणी किती ॥ सांगो आतां गुरुवर्या ॥५१॥
तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण ॥ त्यांत पचविती कित्येक दिन ॥ मांस तोडिती सांडसेकरून ॥ वरी शिंपिती क्षारोदक ॥५२॥
जिव्हा नासिक आणि कर्ण ॥ तीक्ष्ण शस्त्रे टाकिती छेदून ॥ हस्त पाद खंडून ॥ पोट फाडिती क्रूर शस्त्रे ॥५३॥
अंगाचा काढिती भाता ॥ तप्त शस्त्रे रोविती माथा ॥ शिश्न छेदून गुदद्वारी अवचिता ॥ तप्त अर्गळा घालिती ॥५४॥
सर्वांगासी टिपर्या लावून ॥ सवेंचि करिती पाशबंधन ॥ पृष्ठीकडे वाकवून ॥ चरणी ग्रीवा बांधिती ॥५५॥
बोटी बोटी सुया रोवून ॥ पाषाणे वृषण करिती चूर्ण ॥ हस्तपायी आणून ॥ पाषाणबेडी घालिती ॥५६॥
सहस्त्र वर्षै न लगे अंत ॥ ऐशिया नरकी बुडवीत ॥ एक येवोनि पाडिती दांत ॥ पाश घालिती ग्रीवेसी ॥५७॥
आपली विष्ठामूत्र ॥ बळेच भक्षविती यमदूत ॥ सवेचि अंगाचे तुकडे पाडीत ॥ दोष अमित जाणोनी ॥५८॥
श्यामशबलश्वान लावून ॥ चरचरा टाकिती फाडून ॥ एक शिरास्थि काढिती ओढून॥ एक मांस उकरिती ॥५९॥
लोहार्गळा उष्ण तीव्र ॥ पृष्ठी ह्रदयी करिती मार ॥ उखळी घालोनि सत्वर ॥ लोहतप्तमुसळे चेचिती ॥६०॥
तीक्श्ण औषधींचे रस आणिती ॥ नासिकद्वारे आत ओतिती ॥ सवेचि वृश्चिककूपी टाकिती ॥ बहुत विपत्ती भोगिल्या ॥६१॥
ज्यांचे विष परम दुर्धर ॥ ऐसे अंगासी डसविती विखार ॥ अग्निशिका लावोनि सत्वर ॥ हे शरीर भाजिले ॥६२॥
अंतरिक्ष असिधारे बैसवून ॥ पायी बांधिती जड पाषाण ॥ सवेंचि पर्वतावरी नेऊन ॥ ढकलूनि देती निर्दयपणे ॥६३॥
आतडी काढून निश्चिती ॥ ज्याची त्याजकडोन भक्षविती ॥ ऊर्ध्व नेवोनि टांगती ॥ आपटिती क्रोधभरे ॥६४॥
लोहकंटकी उभे करून ॥ करिती इंगळांचे आंथरूण ॥ मस्तकी घालूनिया पाषाण ॥ फोडोनि टाकिती मस्तक ॥६५॥
लौहचणक करूनि तप्त ॥ खा खा म्हणोनि दूत मारीत ॥ ओष्ठ धरोनि फाडीत ॥ तप्त सळ्या नाकी खोविती ॥६६॥
उफराटे टांगून ॥ ग्रीवेसी बांधोनि थोर पाषाण ॥ रीसव्याघ्रादिक आणोन ॥ विदारिती त्यांहाती ॥६७॥
गजपदाखाली चूर्ण ॥ करविती तप्तनीरप्राशन ॥ अष्टांगे कर्वतून ॥ वेगळाली टाकिती ॥६८॥
भयानक भूते भेडसाविती ॥ लिंग छेदूनि खा म्हणती ॥ सांधे ठायी ठायी मोडिती ॥ तीक्ष्ण शस्त्रेकरूनिया ॥६९॥
भूमीत रोवोनिया शरीर ॥ करिती बहुत शरमार ॥ सवेंचि शूळ परम तीव्र ॥ त्यावरी पालथे घालिती ॥७०॥
वरी मारिती मुसळघाये ॥ मग पाषाण बांधोनि लवलाहे ॥ नरकवापीत टाकिती पाहे ॥ अंत न लागे उतरता ॥७१॥
काचा शिसे यांचा रस करून ॥ बळेचि करविती प्राशन ॥ तेथे जात नाही कदा प्राण ॥ यातना दारुण भोगिता ॥७२॥
ऐशा तीन सहस्त्र वर्षैपर्यंत ॥ नरकयातना भोगिल्या बहुत ॥ त्यावरी मज ढकलोनि देत ॥ व्याघ्रजन्म पावलो ॥७३॥
दुसरे जन्मी झालो अजगर ॥ तिसरे जन्मी वृक भयंकर ॥ चौथे जन्मी सूकर ॥ सरडा झालो पाचवा ॥७४॥
सहावे जन्मी सारमेय सबळ ॥ सातवे जन्मी श्रृगाल ॥ आठव्याने गवय विशाळ ॥ गुरुवर्या मी झालो ॥७५॥
नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध ॥ दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध ॥ त्यावरी नकुळ मग वायस विविध ॥ तेरावे जन्मी बक झालो ॥७६॥
चौदावे जन्मी वनकुक्कुट ॥ त्यावरी गीध झालो पापिष्ट ॥ मग मार्जारयोनी दुष्ट ॥ मंडूक त्यावरी जाण पा ॥७७॥
अठरावे जन्मी झालो कूर्म ॥ त्यावरी मत्स्य झालो दुर्गम ॥ सवेचि पावलो मूषकजन्म ॥ उलूक त्यावरी झालो मी ॥७८॥
बाविसावे जन्मी वनद्विरद ॥ त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध ॥ मग दुरात्मा निषाद ॥ आतां राक्षस जन्मलो ॥७९॥
सहस्त्रजन्मीचे ज्ञान ॥ झाले स्वामी मज पूर्ण ॥ तव दर्शनाच्या प्रतापेकरून ॥ पावन झालो स्वामिया ॥८०॥
गंगास्नाने जळे पाप ॥ अत्रिनंदन हरि ताप ॥ सुरतरु दैन्य अमूप ॥ हरीत दर्शनेकरूनिया ॥८१॥
पाप ताप आणि दैन्य ॥ संतसमागमे जाय जळून ॥ यावरी वामदेव योगींद्र वचन ॥ बोलता झाला तेधवा ॥८२॥
एक विप्र होता महा अमंगळ ॥ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ ॥ तिच्या भ्रतारे साधूनि वेळ ॥ जीवे मारिले द्विजाते ॥८३॥
ग्रामाबाहेर टाकिले प्रेत ॥ कोणी संस्कार न करीत ॥ तो यमदूती नेला मारीत ॥ जाच बहुत भोगीतसे ॥८४॥
इकडे शिवसदन उत्तम ॥ त्यापुढे पडिले असे भस्म ॥ महाशिवरात्रिदिवशी सप्रेम ॥ भक्त पूजना बैसले ॥८५॥
त्या भस्मात श्वान सवेग ॥ येऊनि बैसले पाहे शिवलिंग ॥ भस्मचर्चित त्याचे अंग ॥ जात मग त्वरेने ॥८६॥
पडिले होते विप्रप्रेत ॥ त्यावरी गेले अकस्मात ॥ कुणपास भस्म लागत ॥ पापरहित झाला तो ॥८७॥
तो यमदूती नरकातूनि काढिला ॥ शिवदूती विमानी वाहिला ॥ कैलासास जावोनि राहिला ॥ संहारिला पापसमूग ॥८८॥
ऐसे हे पवित्र शिवभूषण ॥ त्याचे न वर्णवे महिमान ॥ राक्षस पुसे कर जोडून ॥ भस्ममहिमा सांगा कैसा ॥८९॥
भस्म कोणते उत्तम ॥ शिवभक्ती लावावे कैसा नेम ॥ यावरी वामदेव उत्तम ॥ चरित्र सांगे शिवाचे ॥९०॥
मंदरगिरी परमपवित्र ॥ उंच योजने अकरा सहस्त्र ॥ त्यावरी एकदा त्रिनेत्र ॥ देवासहित पातला ॥९१॥
यक्षगण गंधर्व किन्नर ॥ चारण पिशाच गुह्यक समग्र ॥ देव उपदेव पवित्र ॥ महेशा वेष्टूनि बैसले ॥९२॥
मरुद्गण पितृगण समस्त ॥ एकादश रुद्र द्वादशादित्य ॥ अष्ट वसु अष्ट भैरव सत्य ॥ अष्ट दिक्पाळ पातले ॥९३॥
अठ्ययंशी सहस्त्र ऋषीश्वर ॥ साठ सहस्त्र वालखिल्य ब्रह्मपुत्र ॥ पाताळनाग पृथ्वीचे नृपवर ॥ शंकरा वेष्टित बैसले ॥९४॥
विष्णु विधि पुरंदर ॥ शिवध्यान पाहती समग्र ॥ भूतांचे मेळे अपार ॥ मंदराचळी मिळाले ॥९५॥
सिंधुरवदन वीरभद्रकुमार ॥ साठ कोटी गण समग्र ॥ पुढे विराजे नंदिकेश्वर ॥ दुसरा मांदार शुभ्र दिसे ॥९६॥
तेथे आले सनत्कुमार ॥ साष्टांग करूनि नमस्कार ॥ स्तवन करूनि अपार ॥ विभूतिधारणविधी पुसती ॥९७॥
यावरी बोले जाश्वनीळ ॥ विभूति जाण तेचि निर्मळ ॥ शुद्ध करूनि गोमयगोळ ॥ मृत्तिकाकणविरहित ॥९८॥
ते वाळवूनि उत्तम ॥ मग करावे त्यांचे भस्म ॥ शुद्ध विभूति मग परम ॥ शिवगायत्रीने मंत्रिजे ॥९९॥
आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व ॥ मग मस्तकाभोवते वेष्टिजे शुद्ध ॥ तर्जनी न लाविजे निषिद्ध ॥ कनिष्ठिका वेगळी करी ॥१००॥
दो बोटांनी लाविजे भाळी ॥ अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी ॥ तैसे त्रिपुंड्रधारण चंद्रमौळी ॥ सनत्कुमारा सांगत ॥१॥
तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती ॥ त्रिबोटी लाविजे निश्चिती ॥ येणे महत्पापे भस्म होती ॥ शिवभूषणप्रसादे ॥२॥
अगम्यागमन सुरापान ॥ ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्यभक्षणा ॥ महत्पापांचे पर्वत जाण ॥ भस्मचर्चने भस्म होती ॥३॥
ऐसा भस्माचा महिमा वामदेव ॥ ब्रह्मराक्षसा सांगे सर्व ॥ विमान आले अपूर्व ॥ दिव्यरूप असुर झाला ॥४॥
कैलासाप्रति जाऊन ॥ राहिला शिवरूप होऊन ॥ वामदेव पृथ्वीपर्यटन ॥ स्वेच्छे करीत चालिला ॥५॥
सत्संगाचा महिमा थोर ॥ वामदेवासंगे तरला असुर ॥ भस्मलेपने भाळनेत्र ॥ सदा सुप्रसन्न भक्तांसी ॥६॥
मंत्र तीर्थ द्विज देव ॥ गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व ॥ येथे जैसा धरिती भाव ॥ सिद्धि तैसी तयांसी ॥७॥
पांचाळ देशी नृपनाथ ॥ नाम जयाचे सिंहेकत ॥ जैसा शक्रनंदन की तृतीय सुत ॥ पृथादेवीचा पुरुषार्थी ॥८॥
मृगयेस गेला तो भूपाळ ॥ मागे चालत धुरंधर दळ ॥ शबरांचेही मेळ ॥ बहुसाल निघती तयासवे ॥९॥
वनोवनी हिंडता भूपाळक ॥ शबर एक परम भाविक ॥ भग्न शिवालय एक ॥ गेला त्यात निषाद तो ॥११०॥
उन्मळोनि पडले दिव्य लिंग ॥ पंचसूत्री रमणीय़ अभंग ॥ सिंहकेतरायाते सवेग ॥ दाविता झाला तेधवा ॥११॥
राजा म्हणे लिंग चांगले ॥ परीपाहिजे भावे पूजिले ॥ उगेचि देवार्चन मांडिले ॥ दंभेकरूनि लौकिकी ॥१२॥
लौकिकी मिरवावया थोरपण ॥ प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून ॥ जेवी कांसारे मांडिले दुकान ॥ प्रतिमाविक्रय करावया ॥१३॥
ब्राह्मणवेष घेवोनि शुद्ध ॥ यात्रेत हिंडती जैसे मैंद ॥ की मार्गघ्न वाटेत साधुसिद्ध ॥ वेष धरूनि बैसले ॥१४॥
काळनेमी साधुवेष धरून ॥ वाटेत बैसला करावया विघ्न ॥ एवं भावेविण देवतार्चन ॥ व्यर्थ काय दांभिक ॥१५॥
शबरासी म्हणे नृपसत्तम ॥ तुज हे लिंग सांपडले उत्तम ॥ निषाद म्हणे पूजनक्रम ॥ कैसा आहे सांग पा ॥१६॥
विनोदे बोले नृपवर ॥ पूजेचे आहेत बहुत प्रकार ॥ परी चिताभस्म पवित्र ॥ नित्य नूतन आणावे ॥१७॥
चिताभस्माविण ॥ नैवेद्य करू नये समर्पण ॥ हेचि मुख्य वर्म जाण ॥ शैवलक्षण निष्ठेचे ॥१८॥
नृपवचन मानूनि यथार्थ ॥ शबर लिंग घरा आणीत ॥ शबरीस सांगे वृत्तांत ॥ हर्षभरित ते झाली ॥१९॥
सुमुहूर्तै शिवलिंग स्थापून ॥ दोघे पूजिती एकनिष्ठेकरून ॥ चिताभस्म नित्य नूतन ॥ आणिती मेळवून साक्षेपे ॥१२०॥
एकार्ती होताचि सुंदरी ॥ नैवेद्य आणीत झडकरी ॥ उभयता जोडल्या करी ॥ शिवस्तवनी सादर ॥२१॥
ऐसे नित्य करिता पूजन ॥ लोटले कित्येक दिन ॥ त्यांची निष्ठा पहावया पूर्ण ॥ केले नवल पंचवदने ॥२२॥
ऐसे एकदा घडोनि आले ॥ चिताभस्म कोठे न मिळे ॥ शबरे बहुत शोधिले ॥ अपार क्रमिले भूमंडळ ॥२३॥
परतोनि सदनासी येत ॥ शबरीस सांगे वृत्तांत ॥ तेही झाली चिंताक्रांत ॥ म्हणे पूजन केवी होय ॥२४॥
केले शिवपूजन उत्तम ॥ परी न मिळता चिताभस्म ॥ तो शबर भक्तराज परम ॥ नैवेद्य शिवासी अर्पीना ॥२५॥
शिवदीक्षा परम कठीण ॥ निष्ठा पाहे उमारमण ॥ शबरी म्हणे प्रियालागून ॥ मी आपुले भस्म करिते आता ॥२६॥
पाकसदनी बैसोन ॥ लावोनि घेते आता अग्न ॥ ते चिताभस्म चर्चून ॥ सांबपूजन करावे ॥२७॥
मग शुचिर्भूत होवोनी शबरी ॥ शिवध्यान स्मरण करी ॥ अग्नि लावोनी झडकरी ॥ भस्म करी कलेवर ॥२८॥
शबर घेवोनि ते भस्म ॥ चर्ची सदाशिवासी सप्रेम ॥ परी नैवेद्य आणावया उत्तम ॥ दुसरे कोणी नसेचि ॥२९॥
भोळा चक्रवर्ती उदार ॥ तारावया धैर्य पाहे शंकर ॥ आसन घालोनि शबर ॥ परम सादर शिवार्चनी ॥१३०॥
शबरी उत्तम पाक करून ॥ नित्य येत नैवेद्य घेवोन ॥ शबर एकार्ती करून ॥ पूर्वाभ्यासे बोलावीत ॥३१॥
एकार्ती होतांचि सदाशिवा ॥ त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा ॥ विलंब होता महादेवा ॥ क्षोभ अत्यंत पै होय ॥३२॥
सर्व अन्याय क्षमा करी शंकर ॥ परी नैवेद्यासी होता उशीर ॥ क्षोभोनि जातो श्रीशंकर ॥ उशीर अणुमात्र सोसेना ॥३३॥
शबर आनंदमय शिवार्चनी ॥ स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी ॥ म्हणे ललने नैवेद्य आणी ॥ तव पाठीसी उभी घेवोनिया ॥३४॥
रंभा उर्वशी मेनका सुंदरी ॥ त्यांहूनि दिव्यरूप झाली शबरी ॥ चतुर्विध नैवेद्य करी ॥ देत पतीच्या तेधवा ॥३५॥
नैवेद्य अर्पूनि शबर ॥ पूजा झाली षोडशोपचार ॥ दोघे जोडोनिया कर ॥ स्तवन करी शिवाचे ॥३६॥
जय जय अनंतब्रह्मांडनायका ॥ जय जय शिव मायाचक्रचालका ॥ दुर्जनदमना मदनांदका ॥ भवहारका भवानीपते ॥३७॥
पूजन झाले संपूर्ण ॥ शबर पाहे स्त्री विलोकून ॥ अलंकारमंडित सद्गुण ॥ आपणही शिवरूप जाहला ॥३८॥
एक नीलकंठ वेगळा करून ॥ शिवभक्त शिवसमान ॥ तव आले दिव्य विमान ॥ वाद्ये अपार वाजती ॥३९॥
येत दिव्यसुमनांचे परिमळ ॥ आश्चर्य करी सिंहकेतनृपाळ ॥ विमानी बैसवूनि तत्काळ ॥ शिवपद पावली दोघेही ॥१४०॥
राव म्हणे विनोदेकरून ॥ म्यां सांगितले चिताभस्मपूजन ॥ परी धन्य शबराचे निर्वाण ॥ उद्धारोनि गेला कैलासा ॥४१॥
धन्य ते शबरी कामिनी ॥ देह समर्पिला शिवार्चनी ॥ एवं एकनिष्ठ देखिल्यावांचोनी ॥ पिनाकपाणी प्रसन्न नव्हे ॥४२॥
सिंहकेतासी लागला तोचि छंद ॥ सर्वदा शिवभजनाचा वेध ॥ शिवलीलामृत प्रसिद्ध ॥ श्रवण करी सर्वदा ॥४३॥
शिवरात्री प्रदोष सोमवार ॥ व्रते आचरे प्रीती नृपवर ॥ शिवप्रीत्यर्थ उदार ॥ धने वाटी सत्पात्री ॥४४॥
ऐसे करिता शिवभजन ॥ सिंहकेत शिवरूप होवोन ॥ शिवपदी राहिला जावोन ॥ धन्य भजन निष्ठेचे ॥४५॥
शिवलीलामृतमंडपी सुरवाडली ॥ चढत जात श्रीधरवाग्वल्ली ॥ अहळबहळ पसरली ॥ ब्रह्मानंदेकरूनिया ॥४६॥
ते छाया सघन अत्यंत ॥ तेथे बैसोत शिवभक्त ॥ प्रेमद्राक्षफळे पक्व बहुत ॥ सदा सेवोत आदरे ॥४७॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ मृडानीह्रदयाब्जमिलिंदा ॥ कैवल्यपददायक अभेदा ॥ लीला अगाध बोलवी पुढे ॥४८॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ नवमाध्याय गोड हा ॥१४९॥
इति नवमोऽध्यायः ॥९॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥