सहा सोनेरी पाने
आपल्या भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या उष:कालाचा आरंभ न्यूनत: पाच सहस्र वर्षांपासून दहा सहस्र वर्षांपर्यंत तरी आजच्या संशोधनानुसार प्राचीन आहे. चीन, बाबिलोन, ग्रीस प्रभृती कोणत्याही प्राचीन राष्ट्राच्या जीवनवृत्तान्ताप्रमाणे हा आपला प्राचीन राष्ट्रीय वृत्तान्तही पुराणकालात मोडतो. म्हणजे त्यात असलेल्या इतिहासावर दंतकथेची, दैवीकरणाची आणि लाक्षणिक वर्णनाची पुटेच पुटे चढलेली आहेत. तरीही ही आपली जुनी 'पुराणे' आपल्या प्राचीन इतिहासाचे आधारस्तंभच आहेत हे विसरता कामा नये. हे प्रचंड 'पुराण-वाङ्मय' आपल्या साहित्याचे, ज्ञानाचे, कर्तृत्वाचे नि ऐश्वर्याचेही जसे एक भव्य भांडार आहे तसेच ते आपल्या प्राचीन जीवनवृत्तान्तांचेही असंगत, अस्ताव्यस्त नि संदिग्ध असले तरी एक अमार्यंद संग्रहालय आहे.
परंतु आपली 'पुराणे' म्हणजे निर्भेळ 'इतिहास' नव्हे.
यास्तव मी त्या पुराणकालाचा विचार या प्रसंगापुरता बाजूस ठेवणार आहे. कारण मी ज्या सोनेरी पानांचा निर्देश करणार आहे ती सोनेरी पाने भारताच्या 'पुराणातील' नसून 'इतिहासातील' आहेत.
भारतीय इतिहासाचा आरंभ
इतिहासाचे मुख्य लक्षण म्हणजे त्यातील वर्णनांतील नि घटनांतील स्थल नि काल ही जवळजवळ निश्चितीने तरी सांगता आली पाहिजेत आणि त्यातील घटनांना परकीय वा स्वकीय अवांतर पुराव्यांचे शक्यतो पाठबळ मिळत असले पाहिजे.
अशा कसोटीस बहुतांशी उतरणारा आपला प्राचीन काळचा वृत्तान्त हा बुध्द कालापासून मोजता येतो. यास्तव अनेक भारतीय नि पाश्चात्त्य प्राच्यविद्यावेत्ते आपल्या भारताच्या 'इतिहासा'चा आरंभ ह्या बुध्दकालापासून सध्या समजत आहेत. ह्या प्राच्यविद्यावेत्त्यांच्या सतत चालणार्या परिश्रमामुळे आज आपण ज्याला पौराणिक काल म्हणतो त्यातलाही काही भाग नवीन संशोधन झाल्यास ह्या इतिहासकालात समावेशता येईल. पण तोपर्यंत तरी बुध्दकाल हाच आपल्या 'इतिहासा'चा आरंभ म्हणून समजणे भाग आहे.
त्यातही कोणत्याही प्राचीन राष्ट्राचा निर्भेळ इतिहास निश्चितपणे ठरविण्याच्या कामी तत्कालीन जगातील तदितर राष्ट्रांच्या साहित्यादिक लिखाणांत सापडलेल्या अपोद्बलक उल्लेखांचा फार उपयोग होतो. आज उपलब्ध असलेल्या आणि निश्चितार्थ ठरलेल्या जगातील ऐतिहासिक साधनांमध्ये भारताच्या ज्या प्राचीन कालखंडाला असा भारतेतर राष्ट्रांच्या सुनिश्चित साधनांचा पाठिंबा मिळतो तो आपल्या इतिहासांचा कालखंड सम्राट चंद्रगुप्ताच्या काळाच्या आगेमागेच चालू होतो. कारण अलेक्झांडरची स्वारी भारतावर जेव्हा झाली तेव्हापासूनच्या ग्रीक इतिहासकाराच्या नि पुढे पुढे चीन देशातील प्रवाशांच्या प्रवासवर्णनांच्या लेखांतून भारतातील त्या त्या पुढील घटनांचे ऐतिहासिक कसोटीस बव्हंशी उतरणारे असे अनेक उल्लेख सापडतात.
सोनेरी पान कोणते ?
ह्या आपल्या ऐतिहासिक कालातील ज्या सोनेरी पानांविषयी मी चर्चा करणार आहे तीच पाने काय ती सोनेरी म्हणून निवडण्यासाठी मी कोणती कसोटी वापरीत आहे ? तसे पाहता आपल्या ह्या ऐतिहासिक कालात काव्य, संगती, प्राबल्य, ऐश्वर्य, अध्यात्म प्रभृती अवांतर कसोटींना उतरणारी शतावधी गौरवार्ह पाने सापडतात. परंतु कोणत्याही राष्ट्रावर पारतंत्र्यासारखे प्राणसंकट जेव्हा गुदरते, आक्रमक परशत्रूच्या प्रबळ टाचेखाली ते स्वराष्ट्र जेव्हा पिचून गेलेले असते किंवा जाऊ लागते तेव्हा तेव्हा त्या प्रबळ शत्रूचा पाडाव करून नि पराक्रमाची पराकाष्ठा करून स्वराष्ट्रास त्या पारतंत्र्यातून मुक्त करणारी, त्या पारतंत्र्यातून सोडविणारी आणि आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे आणि स्वराज्याचे पुनरुज्जीवन करणारी जी झुंजार पिढी, तिच्या नि तिला झुंजविणारे जे धुरंधरवीर नि विजयी पुरुष त्यांच्या त्या स्वातंत्र्ययुध्दाच्या वृत्तान्ताचे जे पान त्या पानास मी येथे सोनेरी पान म्हणून संबोधीत आहे. कोणत्याही राष्ट्रात त्याच्या अशा परंजयी स्वातंत्र्ययुध्दाची ऐतिहासिक पाने अशीच गौरविली जातात. अगदी अमेरिकेचेच उदाहरण पहा. रणांगणात इंग्लंडला चीत करून ज्या समयी अमेरिकेने आपले स्वातंत्र्य छिनावून घेतले त्या विजयी दिवसालाच अमेरिकेच्या इतिहासातील सोनेरी दिवस म्हणून सणासारखे गौरविले जाते आणि त्या युध्दाच्या इतिहासाचे पान हे अमेरिकेच्या इतिहासातील सोनेरी पान गणले जाते.
प्रत्येक मोठ्या नि प्राचीन राष्ट्रावर पारतंत्र्याचे संकट केव्हातरी कोसळलेलेच असते
त्यातही अमेरिकेच्या राष्ट्राचा जन्मच मुळी कालचा ! म्हणून त्याच्या टीचभर इतिहासात त्यांच्यावर एकच काय ते प्राणसंकट गुदरावे आणि ते निवारणारे एकच काय ते सोनेरी पान असावे ह्यात काही विशेष नाही. परंतु चीन, बाबिलोनियन, पर्शियन, इजिप्शियन, प्राचीन पेरु, प्राचीन मेक्सिको, ग्रीस, रोमन प्रभृती जी पुरातन राष्ट्रे सहस्रावधी वर्षे नांदत राहिली त्यांच्या त्या विस्तृत राष्ट्रीय जीवनात प्रबलतर परकीयांच्या आक्रमणाखाली चेचले जाण्याचे अनेक प्रसंग त्यांच्यावर साहजिकपणेच येऊन गेले. तशा प्राणसंकटातून त्यातील काही राष्ट्रांनी आपल्या पराक्रमाने पुन्हा पुन्हा सुटकाही करून घेतली आणि त्यांच्या त्या त्या परशत्रूंना दाती तृण धरावयास लावले. सहस्रावधी वर्षे आपले राष्ट्रीय अस्तित्व नि प्राबल्य टिकवून धरणार्या अशा राष्ट्रांचा इतिहासात वेळोवेळी पुन:पुन्हा स्वातंत्र्यसंपादनार्थ केलेल्या रणांगणांची नि त्यात मिळविलेल्या विजयाची एकाहून अधिक अशी सोनेरी पाने सन्मानिली गेलेली आहेत. भारताचा इतिहास तर त्या प्राचीनतम कालापासून आजपर्यंत अखंडपणे चालत आलेला ! त्याच्या प्राचीन काळात भरभराट असलेली वरील बहुतेक राष्ट्रे नि राज्ये आज नामशेषसुध्दा होऊन गेलेली आहेत. एक चीनचे महान राष्ट्र तेवढे भारताच्या महनीयतेचे पुरातन साक्षी म्हणून आज उरलेले आहे.
चीन आणि भारत ही दोन्हीही राष्ट्रे अतिविस्तृत असल्यामुळे आणि अतिप्राचीन कालापासून सततपणे आजपर्यंत आपले स्वातंत्र्य आणि सामर्थ्य टिकवून नांदत आलेली असल्यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा इतर अल्पजीवी राष्ट्रांपेक्षा अधिक प्रसंगी परदास्याची प्राणसंकटे कोसळलेली आढळतात यात काही आश्चर्य नाही. चक्रनेमिक्रमाचा अटळ नियम त्यांनाही होताच. हिंदुस्थानावर ज्याप्रमाणे शक, हूण, मोगलादिकांच्या अनेक चढाया झाल्या त्याचप्रमाणे चीनवरही त्या आणि इतर परराष्ट्रांच्या अनेक चढाया झालेल्या आहेत. हूणांच्या प्रलयापासून बचाव करण्यासाठी तर चीनने त्यांच्या राष्ट्राभोवती ती जगप्रसिध्द तटबंदी, ती Chinese Wall बांधली होती. पण तिलाही वळसे घालून किंवा उल्लंघून चीनच्या शत्रूंनी त्याला पादाक्रान्त करावयास सोडले नाही. बहुधा अंशत: परंतु काही वेळा तर संपूर्णत: चीनही परकीय राजसत्तेच्या जोखडाखाली संत्रस्त होऊन पडलेला होता. तथापि त्या त्या वेळी ते महान् राष्ट्र पुन:पुन्हा नवतेजाने नि चैतन्याने अनुप्राणित होऊन त्या परकीय सत्तेला उलथून पाडू शकले, आपले जीवित, सत्त्व नि स्वातंत्र्य राखू शकले आणि आजही पुन्हा एक स्वतंत्र नि सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून नांदत राहिले आहे. हेच खरे ऐतिहासिक आश्चर्य होय ! भारताच्या इतिहासाचे मूल्यमापन करताना या प्रकरणी तोच मानदंड वापरला पाहिजे. परंतु विशेषत: इंग्रजांच्या परकीय सत्तेखाली जेव्हा हिंदुस्थान दबला होता तेव्हा अनेक इंग्रजांनी भारताचा इतिहास अशा विकृत पध्दतीने लिहिला आणि त्यांनी काढलेल्या शाळामहाशाळांतून तरुणांच्या दोनतीन पिढयांकडून त्या विकृत इतिहासाची इतकी पारायणे करून घेतली की, जगाचाच नव्हे, तर आपल्या स्वत:च्या लोकांचाही त्या प्रकरणी बुध्दिभ्रंशच व्हावा. हिंदुस्थानचे राष्ट्र हे सतत ह्या वा त्या परसत्तेखालीच दडपलेले होते; हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे हिंदूंच्या पराभवामागून पराभवांचीच काय ती एक जंत्री आहे. अशी धडधडीत असत्य, उपमर्दकारक आणि दुष्ट हेतूंनी केलेली विधाने चलनी नाण्यासारखी परकीयांकडूनच नव्हे, तर काही स्वकीयांकडूनही बेखटक व्यवहारिली जात आहेत. त्यांचा प्रतिकार करणे हे स्वराष्ट्राभिमानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहे. ह्या कार्यी जे काही प्रयत्न अन्य इतिहासज्ञांकडून होत आले आहेत, त्यात ह्या प्रसंगानिमित्ते प्रचाराची शक्यतो अधिक भर घालणे हे एक कर्तव्यच आहे. यासाठी ज्या ज्या परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर स्वार्या केल्या किंवा राज्यसत्ता गाजविली त्या त्या परकीयांचा अंती धुव्वा उडवून देऊन आपल्या हिंदुराष्ट्रास ज्यांनी ज्यांनी विमुक्त केले त्या त्या हिंदुराष्ट्रविमोचक पिढयांचे आणि त्यांचे प्रतीक म्हणून त्या त्या संग्रामातील काही युगप्रवर्तक वीरवरांचे ऐतिहासिक शब्दचित्रण करण्याचे मी येथे योजिले आहे.