Get it on Google Play
Download on the App Store

सलीम जावेद-एक प्रवास

सलीम जावेद

                                             

इंदोरच्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या सलीमला स्टार व्हायचं होतं. एका लग्नात दिग्दर्शक के अमरनाथ यांनी त्याला हेरलं आणि त्याचं भारदस्त व्यक्तिमत्त्व बघून मुंबईत चारशे रुपये पगाराची नोकरी आणि भूमिका देऊ केली.

किरकोळ छोट्यामोठ्या भूमिका सात वर्ष केल्यानंतर सलीमला पुढं काही भवितव्य दिसेना.त्याच्यात निर्मितीक्षमता खच्चून भरलेली होती पण अभिनय नव्हता-हे समजायला त्याला वेळ लागला नाही.

तिसाव्या वर्षी परत इंदोरला जाणे त्याला अपमानास्पद वाटत होते. सगळेजण आपल्याला हसतील अशी भीती त्याला वाटत होती.तेव्हा त्याने आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला-चित्रपट कथा लेखक बनण्याचा!

जावेद अख्तरला गुरुदत्तला भेटायची महत्वाकांक्षा होती-पण एकोणीसशे चौसष्ट साली मुंबईत ज्या दिवशी त्याने पाऊल ठेवलं त्याच्या पाचव्या दिवशी गुरुदत्तने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती. जान निसार अख्तर यांनी त्याचं जादू हे नाव त्यांच्या निकाच्या दिवशी संध्याकाळी लिहिलेल्या "लमहा लमहा किसी जादू का फसाना होगा"या कवितेतल्या ओळीवरून ठेवलं होतं.पण थोडा मोठा झाल्यावर जादूचं जावेद झालं-शब्दशः "अमर तारा" जे त्यानं नंतर खरंही करून दाखवलं- तसंच असामान्य कर्तृत्व दाखवून!

सरहदी लुटेरा या एस एम सागर यांच्या फ्लॉप चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा एकत्र लेखक म्हणून काम केलं, आणि यकीन,अधिकार अशा काही पडेल चित्रपटांसाठीही एकत्र लेखन केलं.

एस एम सागर यांचा असिस्टंट सुधीर वाही यानं त्यांच्यातलं टॅलेंट अधिकारची कथा पाहून ओळखलं आणि त्यानंच या दोघांना जी पी सिप्पी यांना त्यांच्या खारला नवीन बनत असलेल्याऑफिसला भेटायला सांगितलं. त्यांनी तिथं जाऊन सीप्पीना एक कथा ऐकवली आणि काही आयडिया दिल्या-सीप्पीनी खुश होऊन महिना सातशे पन्नास पगारावर त्यांना ठेवून घेतलं.

सलीमच्या व्यक्तिमत्त्वात आणि लिहिण्यात एक फ्लॅमबॉयन्स-स्फोटकपणा होता तर जावेदकडे आत्मविश्वास खच्चून भरलेला होता आणि त्याचबरोबर त्याची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती.

घोडी रेसमध्ये धावायला नुसती फुरफुरत होती-त्यांना स्वतःची नावं पोस्टरवर छापलेली पहायची आणि हिरोइतकच मानधन घ्यायची महत्वाकांक्षा होती -जे त्या काळात -जेव्हा लेखकाला कमी दर्जाचा समजलं जायचं-जवळजवळ अशक्य होतं.तेव्हाचे ज्येष्ठ लेखक अब्रार अलवी यांनी तर त्यांना या विचाराबद्दल वेड्यात काढलं होतं.

अंदाज हा त्यांचा आणि रमेश सिप्पीचा पहिला हिट चित्रपट. नंतर सीता और गीता पण चांगलाच हिट झाला-पण या दोघांची पोस्टरवर नाव झळकण्याची महत्वाकांक्षा मात्र अजून अपूर्ण होती.रमेशने त्यांना शब्द दिला-पुढच्या चित्रपटात नक्की तुमचं नाव बॅनरवर दिसेल!

त्यांच्या डोक्यात एक चार ओळींची कथा घोळत होती-एका लष्करी अधिकाऱ्याच्या पूर्ण कुटुंबाची हत्या होते,त्यावेळी त्याला कोर्ट मार्शल झालेल्या दोन ज्युनिअर ऑफीसर्सची आठवण येते-जे बदमाश पण धाडसी असतात. तो त्यांना आपल्या बदला घेण्याच्या मोहिमेत सहभागी करून घेतो.

रमेशने ही आयडिया ऐकल्यावर त्यावर संपूर्ण कथा डेव्हलप करण्यासाठी त्या दोघांना सांगितलं!

सलीम जावेदनी शोलेतलं प्रत्येक कॅरेक्टर खऱ्या अनुभवातून घेतलं होतं.

गब्बर या नावाचा एक खुनशी डाकू ग्वाल्हेर परिसरात कुख्यात होता-सलीमच्या पोलीस अधिकारी (डी आय जी) असलेल्या वडिलांनी त्याला त्याचे खतरनाक किस्से सांगितले होते-तो पोलिसांना पकडून त्यांचे नाक आणि कान कापून त्यांना सोडायचा.

त्याची खाकी वर्दीबद्दल इतकी दुष्मनी होती की एकदा त्याने पोस्टमनला पकडून त्याच्या गयावया करण्याकडे दुर्लक्ष करत त्याचं नाक आणि कान कापलं.

वीरू आणि जय ही सलीमच्या कॉलेजमधील मित्रांची नावं होती तर ठाकूर बलदेव सिंग हे त्याच्या सासऱ्यांचं नाव होतं.

"वीरू की शादी" हा प्रसंग सलीम जावेदने त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून लिहिला होता.

जावेद अजूनही स्ट्रगलींग लेखक होता आणि हनी इराणीच्या प्रेमात पडला होता. पेरीन इराणी यांना काही तो आपल्या मुलीसाठी योग्य मॅच वाटत नव्हता.

सलीम थोडा सिनियर असल्याने आणि त्यानं पेरीन यांच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम केलं असल्याने-जावेदने त्याला आपला वशिला त्यांच्याकडे लावायला सांगितला.

पेरीन-लडका कैसा है?

सलीम-हम पार्टनर है और मैं किसी ऐरे गैरे के साथ बिना मेरे कंवीक्शन के काम नहीं करता (सलमानचा -एक बार मैने डीसाईड कर लिया तो फिर अपने आपकी भी नहीं सुनता-आठवलं ना?)

हां मगर दारू बहुत पीता है

पेरीन-क्या ? दारू पीता है???

सलीम-हा लेकीन आजकल एक दो पेगही पीता है और इसमे ऐसी कुछ खराबी नहीं

लेकिन जब दारू पीता है तो कभी कभी रेड लाईट एरिया में भी जाता है

पेरीन -@$%^*@!

फक्त "खानदान का पता चलतेही आपको बता दू़ंँगा "

हा डायलॉग मात्र कपोलकल्पित होता .

                                     

 

#शोले डायरी

©नितीन श्रोत्री, पुणे

 ९०११०६५८६२

सलीम जावेद

Nitin Shrotri नितिन श्रोत्री
Chapters
सलीम जावेद-एक प्रवास