Get it on Google Play
Download on the App Store

नात्यांचा गोतावळा

नात्यांचा  गोतावळा

आज भाऊंनी सकाळी सकाळीच सुनबाईंना सांगितल, संध्याकाळी गोडाचा बेत करा. आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. आणि भाऊ त्यांच्या कामात गुंतून गेले. जनावरांच खाणं पिणं, दूध काढणे,याव्यतिरीक्त शेतीची कामे गडयांना कामे सांगून दिवसभराचे कामे बैजवार करून भाऊ गावात फेरफटका मारण्यास निघून गेले.
         भाऊंच कुटूंब तस एकत्रित कुटूंब पद्धतीतल चार मुली, दोन मुल, सर्व मुलींना चांगल्या कुटूंबात नांदतात, दोन्ही मुल सुद्धा नोकरीस, शेतीचे, दुधाचे, मिळून घरात सधनता नांदत होती. आणि सर्व मुलांचे मिळून पंधरा नातवंडे, मोठा गोतावळा त्यामुळे कुटूंबाचा डोलारा आणि डामडौल परिसरात परिचीत.
        सुनबाईना सकाळीच दिलेल्या सुचनेप्रमाणे भाऊ पाहुण्यांच्या स्वागताच्या, आणि पाहुणचाराच्या तयारीला लागले. सूनबाईनी छान पैकी पुरणपोळयांचा आणि सार भाताचा बेत आखला. आणि त्यावर अमंलबजावणी दोघी जावा जावांनी सुरू केली. सोबत लुटूपटूची मदत करायला बालगोपाळ सुद्धा होते . भाऊ त्यांची सर्व कामे आटोपून दुपारच्या प्रहरी घरी परतले.पाहूण्यांच्या स्वागतांला केलेली तयारी पाहून भाऊ सुखावले.
       काशीबाई भाऊंच्या सौभाग्यवती अतिशय साध्या, सालस आणि मनमिळावू स्वभावाच्या. त्यांच्या स्वभावामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मनात काशीबाई बद्दल आदरयुक्त भाव. आणि सर्व कुटूंबात अविरत मायेचा, प्रेमाचा, आणि वात्सल्याचा झरा म्हणजे काशीबाई. सर्व रितीरीवाज, मानपान, मुलांचे संगोपन, आणि भाऊंची यथायोग्य साथ काशीबाईंनी दिलेली असल्याने दोघांचा संसार अतिशय दृष्ट लागण्या योगा चालू होता .
           दुपारच्या वेळी भाऊ घरी आले तेव्हा सर्व तयारी उत्तमरित्या चाललेली पाहून भाऊ सुखावले, जनावरांना पाणी पाजुन, चारा घालुन भाऊ घराच्या पढवीत येवून बसले, आणि भाऊंची चाहूल लागताच धाकल्या सुनबाईनी भाऊंना जेवणाचे ताट वाढले, सोबत काशीबाई सुद्धा आणि नातवंडे जेवणास बसली, जेवतांना काशीबाईनी भाऊंना विचारले, आज कोणत्या पाहुण्यासाठी गोडा धोडाचा बेत करायला सांगितले आहे, कोण येणार आहे, काय विशेष याबद्द्ल विचारणा केली. तेंव्हा भाऊंनी फक्त एवढेच सांगितले संध्याकाळी सगळे आल्यावर कळेलच तुला. ते इंग्रजीत काय म्हणत्यात, ते काय सरप्राईज न्हव का? अंग तस
         दोनही मुल त्यांच्या कामानिमित सकाळीच गेलेले ते सुद्धा संध्याकाळी घरी परतनार होते. त्यामुळे भाऊंच सरप्राईज, याविषयी काशीबाई, आणि सुनांची उत्सुकता आणखी काही काळ वाढणार होती. दुपारच्या जेवनानंतर, पढवीतच लोळत भाऊ विचारात गढून गेले. आणि विचारांच्या तंद्रीत केंव्हा डोळा लागला हे भाऊंना सुद्धा समजला नाही. त्यांची वामकुक्षी भंग पावली ते लहान बाळाच्या रडण्याच्या आवाजाने आणि ते लहान, गोंडस, निरागस बाळ होत भाऊंच्या धाकटया मुलीचे. ज्याला कदाचित नविन चेहरे दिसत असतील किंवा भाऊच्या नातवांनी त्याची उचलून घेण्यासाठी चाललेल्या शर्यतीमुळे बिचार रडत होतं .
          त्या केविलवाण्या आवाजाने भाऊ जागे झाले तेंव्हा त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. कारण लेक जावई आले होते.परंतु लेकीच्या आणि जावयाच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव दिसत होते की भाऊंनी असे अचानक का बोलावले असेल?मग इकडच्या तिकडच्या गप्पा,ख्याली खुशाली विचारुन होते न होते तोच भाऊंचे दुसरे जावई सहकुंटूब उपस्थित झाले, आणि मग पुन्हा चहापान गप्पागोष्टी सुरू झाल्या.पिक पाणी, शेती विषयक चर्चा सुरू झाल्या दोघे जावई सासऱ्या बरोबर बोलत असताना भाऊच्या धाकट्या मुलाचे आगमन झाले त्याच्या चेहऱ्यावर आनदंछटा सूर्यकिरणांप्रमाणे स्पष्ट दिसत होत्या. मग लाडके मेव्हणे बॉ आल्यावर पाहूणे मोकळ्या पणे गप्पांमध्ये रंगुन गेले.
         साधारण संध्याकाळचे सहा वाजले असतील तेंव्हा भाऊंच्या घरातील स्वयंपाक घरात कुजबूज चालू झाली होती. नेमकं काय सरप्राईज असेल, तीथं मायलेकी ,सुनांच आणि काशीबाईच उत्सुकतेन बोलन चालू असतांनाच भाऊंचे थोरले जावई आणि तीन नंबर चे जावई उपस्थित झाले. मग काय सर्व जावई ,मुली एकत्र आल्यामुळे भाऊंच्या घराला अलौकीक अशी झळाळी प्राप्त झाली होती. आणि तेंव्हा भाऊंचे थोरले चिरंजीव ही उपस्थित झाले. आणि मग एकमेकांची चेष्टा मस्करी, विनोद यात सर्व पूरुष मंडळी गर्क होवून गेली. तिकडं स्वयंपाक घरातुन तळणाचा, आमटीचा, भाताचा सुवास सगळ्यांच्या पोटातील जठराग्नी भडकावत होता. सोबत चारही मुली, सुना यांच्याबरोबर काशीबाई सुद्धा रंगुन गेल्या होत्या.एवढया आनंदमय प्रसंगी सुद्धा भाऊंच्या चेहऱ्यावर किंचीत काळजीची आणि चिंतेची लकेर स्पष्ट दिसत होती. आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न भाऊंनी आज अचानक का बरं आपल्याला बोलावल असेल याविषयी उत्सुकता.
         आता संध्याकाळच्या जेवणाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. तेच थोरल्या सुनबाईनी भाऊंना जेवणाची ताटं वाढायची का याबाबत विचारणा केली. परंतू अजून कोणीतरी यायच राहिलय या जाणिवेनं भाऊंनी सुनबार्ईना वाईस थांबण्याचा इशारा केला. तश्या सुनबाई स्वयंपाक घरात गेल्या आणि आत जाऊन सर्वांना सांगितले. तसे सर्वांच्या चेहऱ्यावर अधिक च उत्सुकतेचे भाव उमटले.ईकडे जावई मंडळी आणि मेव्हणे यांच्यात विनोद आणि चेष्टामस्करीचे फवारे उडत होते. त्याच वेळी घराकडे येणाऱ्या वाटेवरुन दोन -चार मोटारसायकली येतांना भाऊंनी पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आणि ठरवलेले काम पूर्णत्वास जाणार याची खात्री भाऊंना दिसत होती .
           त्या सर्व मोटारसायकली दारात येवुन थांबल्या आणि त्यावरुन भाऊंची नातवंडे पाय ऊतार झाली. तसे भाऊंचे मुल  आणि जावई आश्चर्यचकीत झाले की ही सगळी पोर इतक्या उशीरा का आली आणि आपण निघतांना आपल्या सोबतच का नाही आली ? . आणि ही वार्ता स्वयंपाक घरात पोहचली तशी, त्या सर्व महिलाही बाहेरच्या पढवीत उपस्थित झाल्या. मुल त्या सगळ्यांकडे आश्चर्याने पाहतच घरात आली. आणि मुलांनी सोबत आणलेले साहित्य, बॉक्स व्यवस्थित ठेवुन त्यांच्यावर होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोर जात होते . आणि एकंदरीत वातावरण पाहता भाऊंनी सगळ्यांना शांत केले. आणि नातवांना  खुणावले.
        त्याच क्षणी सर्व नातवांनी आजीच्या म्हणजेच काशीबाईच्या चरणावर स्पर्श करत शुभाशिर्वाद आणि आजीला लडिक मिठी मारत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आले आजचे खासमखास सरप्राईज. आणि मग सगळ्या जावयांनी, मुलीनी, सुनानी, मुलांनी , आणि शेवटी भाऊंनी काशीबाईंना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. व सगळयांचे चितांतुर मन आनंदाच्या झुळूकीवर विहार करु लागले. आजतागत एकदाही वाढदिवस साजरा नं केलेल्या कशीबाईना या क्षणाचा मात्र फार हेवा वाटला आणि इतक्या वर्षाच्या संसारात सदैव खंबीरपणे येईल त्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या भाऊंबद्दल अधिक अभिमान वाटू लागला.
                        आणि भाऊंना काल कागदपत्रे शोधताना सापडलेला काशीबाईंचा दाखला आठवला आणि आजच्या ह्या गोड प्रसंगामागे घडत असलेल्या "नात्यांच्या गुंताव्याचे" भाऊंना प्रत्यक्ष दाखले मिळतांना पाहून भाऊंनाही भरून आल्यासारखे झाले.आणि एवढा डोलारा उभारून सावरताना काशीबाईंचा त्याग,अन कष्ट आणि सोबत याची जाणीव झाली.आणि आपल्या संस्कारांना,शिकवणीला  आपल्या मुलांनी दिलेली यथार्थ सोबत यामुळे खऱ्या अर्थाने हा नात्यांचा गुंतवा घट्ट विणल्याचा,आणि त्याच्या उबेचा सार्थ अभिमान काशीबाईंच्या रूपाने पूर्ण झाल्याचा दाखला मिळाला.
          मग मुलांनी सोबत आणलेल्या साहित्याने सजावट केली, काशीबाईंचा नाव असलेला केक आणि त्यावर ६१ अंक यावरून काशीबाईची एकसष्ट वी सर्वांच्या उपस्थितीत, हक्काच्या गोतावळ्यात, नातवांच्या गोडव्यात , जावयांच्या लेकींच्या तृप्त डोळ्यादेखत, मुलांच्या समाधानात आणि भाऊंच्या भक्कम आधारात साजरी झाली. आणि खऱ्या अर्थाने नात्यांचा  गुंतावा , त्यातली ओढ, माया आणि प्रेम काशीबाईसाठी अविस्मरणीय भेट देवुन गेला .
          

नात्यांचा गोतावळा

अमोल सोनवणे
Chapters
नात्यांचा गोतावळा