जाणीव
खूपदा काय करावे ? कसे लिहावे ?
काहीच सुचत नाही...
जातो मंदिरात मग,
जोडतो हात, आणि विचारतो देवाला ,
काsss? का असा वागतोस?
जेव्हा शब्द असतात तेव्हा वेळ नसतो,
आणि वेळ असताना शब्द कुंठतात,
भाव असतात तेव्हा भावना नसतात,
आणि भावना असतात
तर जाणिवा नसतात...
लिहायचं म्हटलं तर हात दुखतात,
बोलायचं म्हटलं तर...
शब्द अचानकच गायब होतात,
जणू काही चमत्कारच...
बोलत होते मनीचे गुज,
सांगत होतो व्यथा,
त्या निर्दयी परमेश्वराला..
अचानकच एक आवाज आला,
आत खोलवर जाणवला ,
हृदयाच्या आणि मनाच्या,
भावनांना हात घालणारा...
काळीज हेलावून सोडणारा...
तरी जणू कानातच बोलणारा...
आधीच हरवलो होतो विचारात,
थोडा भानावर आलो,
पुन्हा तोच आवाज आला,
आता मात्र बावचळलो,
इकडे तिकडे बघितले,
कुणीच नव्हतं जवळपास...
वाटले भास झाला असेल,
पण इतका जिवंत भास होतो?
इतका प्रत्यक्ष...?
पुन्हा डोळे मिटले,
केलं पुन्हा चित्त एकाग्र,
तेवढ्यातच परत तोच आवाज,
गोठलेल्या जाणिवा जाग्या करणारा...
एक सुखद संवेदना,
कामरेतून डोक्यापर्यंत,
हळुवार असा प्रेमळ स्पर्श,
शहारले सगळे अंग,
असं वाटलं चिंब भिजलोय...
एक सुखद अशी अनुभूती,
वाटत होतं जागं होऊच नये,
आनंदाच्या लाटांवर लाटा,
सुखाच्या सरींवर सरी
चिंब झालो होतो...
काहीतरी जाणवलं,
सुखाच्याही पलीकडले,
धुंद झालो...
गुंग झालो...
किती वेळ गेला...
किती काळ गेला...
काहीच पत्ता नव्हता...
संवेदना उतरतीला लागलीय,
जाणिवा स्पष्ट होतायत,
दुनियेचा गोंगाट, गाड्यांचे आवाज,
अलगद कानात गुंजारव करतायत,
हा आभास स्पष्ट होत गेला...
कुणीतरी आपल्याला हलवून'
आवाज देऊन,
या दुनियेत बोलवतंय...
जागेपणीची भावना,
मनात एक दुःख,
तो आभास ती संवेदना,
हरवलीय आता कुठेतरी...
डोळे जड झालेत...
आता शुद्धीत यायचा प्रयत्न,
खरंतर नकोसं वाटतंय,
पण पर्याय नाही हेच खरं....
आवाज अधिकच स्पष्ट होतोय,
कुणीतरी ओरडतंय कानापाशी,
जोरजोरात, कुणीतरी साद देतंय,
प्रतिसाद दे....
सांगतंय माझं अंतर्मन,
पण हे शरीर,
नाहीय ना साथ देत...
अखेर ठरवूनच ठरवलं...
उठायचंच, बास झालं आता!
बघू तरी कोण बोंबलतय...
काय त्रास आहे ?
झटकन उठलो अन,
ओरडलो जोरात...
कोण आहे रे हरामखोर ?
माझ्या सुखाआड येणारा ?
एवढंच बोलू शकलो,
जोरात झिणझिण्या आल्या शरीरात,
डोळे उघडून बघतोय,
समोर उभेत आमचे तीर्थरूप...
हातात काठी घेऊन उभे,
जणू जमदग्नीचा प्रत्यक्ष अवतार,
आणि बोलतायत माझ्याबरोबर,
उठा राजे, खूप लोळला गटारात
आता घरी चला,
बंधायचीय तुमची पूजा...
आठवलं मग,
काल रात्री केलेली जंगी पार्टी,
रिचवलेले ते पेग,
केलेला कल्ला...
आता लाज वाटतीय,
शरमेने मान खालीच आहे,
घरीतर जायलाच हवं,
पर्याय नाही,
चला....
निघतो आता.
खायचाय मार आणि बोलणी...
वेळ घेतो थोडा..
सावरतो धक्क्यातून...
आता नक्कीच सुधारतो,
ही शपथ घेऊन,
भेटू म्हणतो पुन्हा,
नवीन अनुभव घेऊन...