Android app on Google Play

 

टीका आणि प्रशंसा - एक आढावा!

आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलू. 

आजकाल मी पाहतोय की खालील प्रकारच्या सुविचारांचा सोशल मेडीया वर सुळसुळाट झाला आहे:

"जो तोडावर स्पष्ट बोलतो, रागावतो तोच खऱ्या मनाचा मोकळा माणूस! बाकीचे लोक जे स्मितहास्य करतात ते सगळे खोटे लोकं!"

"जो माणूस सतत चिडतो आणि तुमचे दोष दाखवतो तोच चांगला माणूस आणि तुमचा हितचिंतक असतो. त्यामुळे तुमच्यात सुधारणा होते. तुमचे गुणगान करणरी आणि तुमची प्रशंसा करून तुम्हाला प्रेरणा देणारी माणसं ही सगळी वाईट माणसं, खोटी माणसं!"

तसेच खालील म्हणी सुद्धा वरील गोष्टींचे काही प्रमाणात समर्थन करतात:

"निंदकाचे घर असावे शेजारी!"
"स्पष्टवक्ता सुखी भव!"

सगळी चिडकी, स्पष्टवक्ती, इतरांचे सतत दोष काढणारी माणसं आपापल्या स्वभावाचं समर्थन या सुविचारांच्या आणि म्हणींच्या आडून करतांना दिसतात.

मला या लोकांना एकाच प्रश्न विचारायचा आहे: 

स्पष्टवक्ते लोक जसे इतरांचे दोष काढतात, स्पष्टपणे समोरच्याला बोलून मोकळे होतात आणि अनेकदा समोरचा ते निमूटपणे ऐकतो तसेच एखादेवेळेस समोरच्याने चिडून त्यांचे दोष तोंडावर सांगितले तर ते त्यांना चालेल का? 
ते लोक खुल्या मनाने वाईट न वाटता स्वत:चे दोष स्वीकारतील का? 
मग वरचे सुविचार त्यालाही लागू करतील का?

समोरचा निमुटपणे ऐकतो याचा अर्थ असा नाही की त्याला तुमचे सगळे आरोप मान्य आहेतच. 

समोरचा बरेचदा तुम्ही त्याचेवर केलेल्या चुकीच्या दोषारोपांबद्दल उलटून बोलत नाही कारण तो तुमच्या मनाचा विचार करतो जेणेकरून तुम्हाला वाईट वाटू नये!

मला एकच कळतं की जो खरा मोकळ्या मनाचा आणि तुमचा हितचिंतक माणूस आहे तो तुमचे दोष जरूर दाखवतो पण त्यासोबत ते कसे सुधारायचे याचेसुद्धा त्याचेजवळ उत्तर तयार असते आणि त्यासाठी तो तुम्हाला मनापासून मदतही करतो. 

आणि ते हळूहळू सुधारल्यावर त्यच्या लक्षात येते आणि तो त्याबद्दल आपल्याला वेळोवेळी सांगतो सुद्धा! 

असा माणूस तुमचे फक्त दोष नाही तर गुण पण शोधतो आणि त्यांचे आवर्जून कौतुक करतो.

"तू असाच आहेस, तसाच आहेस, तू कधीही सुधारणार नाही, तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही!", असे तुमचा हितचिंतक कधीही म्हणणार नाही. 

तसेच तुम्ही तुमच्या हितचिंतकाचे दोष त्याला दाखवले तर ते तो खुल्या मनाने स्वीकारेल आणि तुमच्या बद्दल गैरसमज करणार नाही.

मात्र एखादा जर का फक्त तुमचे सतत दोषच काढत असेल (आणि ते सुधारायला तुम्हाला मदत न करता तुमचे दोष कायम राहावे हे त्याला मनापासून वाटत असेल, म्हणजे पुन्हा दोष काढायला मोकळे!)  पण कधीही तुमच्यातला जर एकही गुण त्याला दिसत नसेल तर समजावे की तुमची प्रगती त्याला सहन होत नसून तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी त्याचे हे प्रयत्न चालू आहेत. 

कारण कितीही केले तरी मन असे असते की आपले दोष सतत काढले गेले तर स्वत:बद्दल कायम नकारात्मक ऐकून ऐकून नकळत आपण स्वत:बद्दल नकारात्मक विचार करू लागतो आणि त्यात भर म्हणजे आपले दोष दाखवणारा जर आपल्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती असेल की ज्याला आपण खूप मानतो आणि आदर करतो तर त्याने काढलेले दोष आपल्या मनावर जास्त नकारात्मक परिणाम करतात.

मी वरील दिलेल्या दोन म्हणींचा खरा अर्थ असा आहे:

"निंदकाचे घर असावे शेजारी!" अशी म्हण आहे म्हणजेच" निंदक नसावा (सतत २४ तास) घरी!" 
येथे घरी किंवा शेजारी या शब्दांचा शब्दशः अर्थ घायचा नाही आहे. 
घरी म्हणजे "सतत आणि नेहमी"
शेजारी म्हणजे "कधी कधी"
शेजारी आपल्यासोबत सतत २४ तास नसतो. 
म्हणजेच अति टीका आणि दोष हे मारक ठरतात म्हणून तेथे शेजारी असे म्हटले आहे! 

"निंदक असावा सतत घरी!" असे म्हटले नाही! 

म्हणजेच निंदा, टीका हे फक्त ठराविक प्रमाणातच औषधाचे काम करते नाहीतर ते विष बनते. 
योग्य स्तुती आणि प्रेरणा हे फक्त औषधच नाही तर अमृतासारखे काम करते.

"स्पष्टवक्ता सुखी भव!" ही म्हण बनवणारा नक्की एक स्पष्टवक्ता असावा कारण त्याने फक्त स्पष्टवक्त्या लोकांच्या सुखाचाच विचार केलेला दिसतोय. स्पष्टवक्त्याचे स्पष्टवचन ऐकणाऱ्या बिचाऱ्या समोरच्या माणसाच्या दु:खाबद्दल विचार केलेला दिसत नाही.

स्वत:च्या तथाकथीत स्पष्टवक्तेपणाचं समर्थन करणाऱ्याना असे वाटते की जणू काही परमेश्वराने इतरांचे दोष स्पष्टपणे त्यांना दाखवण्याचा ठेका फक्त त्यांनाच दिला आहे!

सारांश सांगताना मला मला एकच (स्पष्टपणे) सांगावेसे वाटते की, आजच्या धकाधकीच्या जीवनात आधीच लोक जगण्यासाठी खूप संघर्ष करत आहेत, तेव्हा एकमेकांवर टीका करण्याऐवजी एकमेकांच्या गुणांचे कौतुक करून एकमेकांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि प्रगतीसाठी  एकमेकांना प्रेरणा देणे हे महत्वाचे आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसेसमध्ये हेच सूत्र सांगितले जाते. बॉसने आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याने केलेल्या कामाचे योग्य कौतुक करणे आवश्यक असते. तर त्याला पुढचे काम आणखी चांगले करण्याची प्रेरणा मिळते. हेच पालक आणि मुलांच्या बाबतीतही लागू होते.

तसेच खासगी किंवा कार्यालयीन जीवनात सुद्धा आणखी एक सूत्र महत्वाचे ठरते - एखाद्याची स्तुती किंवा प्रशंसा किंवा कौतुक हे चारचौघात करावे आणि टीका किंवा दोष किंवा चुका एकांतात सांगाव्यात! 

#nimishtics

टीका आणि प्रशंसा - एक आढावा!

Nimish Navneet Sonar
Chapters
टीका आणि प्रशंसा - एक आढावा!