Android app on Google Play

 

सुजाण पालक किंवा जबाबदार पालक होणं

 

कालच्या घटनेने मुलांच्या संगोपनाविषयी पुन्हा एकवार विचार करायला लावले. विषेशत: अधिका-यांची मुले आणि जबाबदार पालकत्व हा कळीचा मुद्दा आहे म्हणून आज खास आपल्या या ग्रुपवर लिहीत आहे. आज मुलांचे एकाकीपण ही एक खूप मोठी समस्या बनली आहे, त्यातही एकुलती एक मुलं ही येत्या काही काळात खूप मोठी सामाजिक समस्या असणार आहे आणि त्याला जबाबदार त्यांचे पालकच आहेत हे नाकारता येणार नाही त्यामुळे केवळ कुटुंब नव्हे तर आपली मुलं ही आपली priority असली पाहीजेत. पण ही गोष्ट समजून घेण्यात आपली फार मोठी गल्लत होते आहे. मुलं priority असणं म्हणजे मुलांना भरमसाठ चैनीच्या वस्तू, गॅझेटस , महागडी खेळणी, फाइव्ह स्टार ट्रिटस हे सगळं उपलब्ध करून देणं . त्यांनी न मागताही त्यांना सर्व सुखसोयी त्याही तुमच्याच दृष्टीकोनातून उपलब्ध करून देणं . त्यांना भरपूर पैसे खर्च करून देशविदेशी फिरायला नेणं अशा गोष्टी करता आल्या की आपण खूप चांगले पालक झालो असा एक गोड गैरसमज आहे.
    आजकालची मुलं आपल्या व्यस्त जीवनशैलीचा आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रचंड मानसिक ताण सहन करत आहेत , हे किती लोकांना माहीत आहे? हा ताण व्यक्त करण्यासाठी त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांना ख-याखु-या जीवंत सोबतीची गरज असताना तुम्ही त्यांना निर्जीव जगात ढकलून रिकामे होता. अधिका-यांची मुलं म्हणून असणा-या त्यांच्या वेगळ्या ओळखीमुळे दुर्दैवाने हा स्पेस त्यांना बाहेरच्या समाजातही सहजासहजी मिळत नाही जो इतर मुलांना एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्यातून , वागण्यातून सहज उपलब्ध असतो. आपल्याला कल्पनाच नसते पण मुलांचंही विश्व प्रचंड ताणतणावांचं असतं . आपल्या दृष्टीने त्या गोष्टी क्षुल्लक असतात त्यामुळे आपण त्याचं ऐकून घ्यायला वेळच देत नाही. तर काही बाबतीत आपला अतिरेकी हस्तक्षेपही चालू असतो. जसे त्यांच्या शालेय गोष्टीत उगीच नाक खुपसणे , त्यांचे होमवर्क पूर्ण करून देणे, त्यांच्या वस्तू सांभाळायला माणसं सोबत देणे ........ही यादी बरीच मोठी आहे. त्यांना जे हवं असतं ते सोडून आपण सगळं देत असतो आणि वर स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणार 'मी माझ्या मुलाला काही कमी पडून दिले नाही' !
   कधी कधी असं होतं की मुलं तुम्हाला सहज म्हणतात , 'पप्पा तुम्ही लवकर या नाही आला तर मग मी तुमच्याकडून कॅडबरी/ खेळणं / आणखी काही वस्तू घेईन. ' त्यावेळी आपण काय करतो? माझं एक उदाहरण सांगते मी आत्ता मुलांपासून लांब राहते तेव्हा कधी कधी माझा मुलगा मला असंच काहीतरी अटी घालतो. ब-याच वेळा अवघडच असतं जाणं पण तशा वेळी आवर्जून मी कुठलीही 'वस्तू' त्याला 'देत नाही ' कारण आपल्या आईला / वडीलांना वस्तू हा पर्याय नाही हे त्याला जाणवलं पाहीजे. जास्तीत जास्त वेळा मी जाण्याचाच प्रयत्न करते कारण तशा वेळी मुलांना फक्त आपणच हवे असतो पण त्याऐवजी वस्तू मागणं हा त्यांच्या बालबुद्धीचा पर्याय असतो.
    खरं तर सुजाण पालक किंवा जबाबदार पालक होणं ही उत्कृष्ट अधिकारी होण्यापेक्षा अवघड बाब आहे. पण होता होईल तेवढी ही जबाबदारी समजपूर्वक आपणच सांभाळली पाहीजे कारण our child is not our asset it is a liability. आपल्याला सव्याज हे देणं समाजाला द्यायचं आहे. आज नुसतं सुरक्षित ( अनावश्यक) कवच देत राहण्यापेक्षा उद्या व्यवहारी जगात वावरण्यासाठी आवश्यक ते सगळे गुणअवगुण त्याच्यात येतील यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. उद्या स्वत: कमावायला लागल्यावर सगळ्या वस्तू सहज , न मागता मिळत नाहीत हे वास्तव कळाल्यावर हेलपटून जावू नयेत ती. कुठेही नकार किंवा अपयश आले तर आयुष्याकडून निराश होवून जावू नयेत ती. नाहीतर भविष्यात अशा अनेक घटनांना तोंड द्यायची वेळ येवू शकते !!!