Android app on Google Play

 

वृंदावनी वेणु

 

वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे ।
वेणुनादे गोवर्धनु गाजे ॥१॥

पुच्छ पसरूनी मयूर विराजे ।
मज पाहता भासती यादवराजे ॥२॥

तृणचारा चरू विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायी झाली ।
पक्षीकुळे निवांत राहिली ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥

यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे ।
रविमंडळ चालता स्तब्ध होय ।
शेष कूर्म वराह चकीत राहे ।
बाळा स्तन देऊ विसरली माय ॥४॥

ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती ।
बाकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानी बैसोनी स्तुति गाती ।
भानुदासा पावली प्रेम-भक्ति ॥५॥
 

संत भानुदास

स्तोत्रे
Chapters
वृंदावनी वेणु