Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ४

७६

हिरव्या चोळीला चाटी म्हणे रुपै सवातीन

बहिणा कामीन बाळंतीण !

७७

बहिणाला झाला लेक जीव उल्हास झाला थोडा

बंधु हौशाला झाला लेक, सोप्या वाजतो चवघडा

७८

बाळंतीणबाई तुला शेपाची शेगडी

पांघराया देऊं बाप्पाजीची घोंगडी

७९

बाळंतीणबाई तुला बाळंतपण साजं

शिळं काजळ कुंकु ताजं

८०

टोपाच्या ठ्कुच्याला गोंड लावते झेंडयाचं

बाळ पाठीच्या पांडवाचं

८१

टोपाच्या टकुच्याला गोंड लावू माईणीचं

बाळ माझ्या बहीणीचं

८२

रेशमी टोपडयाला गोंडे लावू परकाराचं

बंधुजीचं बाळ, तान्हुलं सरदाराचं

८३

अंगड टोपडं शिवते गझनीचं

तान्हुलं माझ्या मैनाई सजणीचं

८४

हौस मला मोठी बंधुज्या बाळाची

पदर फाडीन साडीचा कुंची शिवीन घोळाची

८५

बंधुचं माझ्या बाळ म्हणतं आत्या जीजी

बाळा मंजुळ बोली तुझी

८६

तीनी सांजा झाल्या समई दिवा लावा

भाचाबाळ मला दावा

८७

माझ्या अंगनांत शिंपीनी सवती सवती

बाळाच्या कुंचीला लावा मोती

८८

सासुर्‍याला जाते लेक कुनाची वालूबाई

पुढं पाळना, मागं गाई !

८९

लेकुरवाळीयेचा पदर साधाबाधा

माझी बाळाबाई, झाली पुत्रवंती राधा

९०

साखळ्यावाळीयानं गल्ली दणाणली

माझी बाळाबाई लेकुरवाळी आली

९१

लेकुरवाळीयेच्या कामाचा बोभाटा

बाळ कडेला धाकुटा

९२

भावजय गुजर बाळंतीण, मला कळून सवा महिना

खण अंगीला घेते फैना, वर काढिते राघुमैना

९३

माझ्या घराला पाव्हनी, कोन आली राधा

पाळन्याला मागे जागा

९४

माझं मोठं घर, सोप्याला पाळणा

आंत निजे बाळ तान्हा

९५

लेकुरवाळीयेच्या कामाचं खटाळं

घाली नागीन वेटाळं