Android app on Google Play

 

संग्रह ३

 

५१

मोठंमोठं डोळ भुंवया बारीक

बाळाचं रूप मावळ्यासारिखं

५२

सावळ्या सुरतीला न्हाई नटाया लागत

माझा बाळ, लाल केवडा बागेत

५३

रंगीत भंवर्‍यानी बाजार झाला लाल

तुला घेऊन देते चल

५४

अवखळ माझा हरी, करते सयांना ताकीत

धोंडं रस्त्यानं फेकीत

५५

केळी नारळ मोडून चिन्नीदांडूला जागा केला

बाळ अवखळ जलमला

५६

हातांत चिन्निदांडू, काखेला बैलगाडा

आला खेळून दृष्ट काढा

५७

अवखळ माझा बाळ किती आवरूं शेजीबाय

भरल्या रांजनी धुतो पाय

५८

चुनियाच्या भिंती बाळ पाडीतसे किती

मामी येत्याती काकुळती

५९

दळनाची पाटी ठेवुं मी कोणीकडे

राघु रांगतो चहुकडे

६०

घागर्‍या घुळुघुळु, नको येऊ मागेमागे

तुला सयाची दृष्ट लागे

६१

घागर्‍या घुळूघुळु, दनानला माझा वाडा

चाले बाळाचा बैलगाडा

६२

जाईच्या शेजारी, काय गुलाबा तुझी हवा ?

तान्हाबाळ बहिणी शेजारी भाऊ नवा

६३

माझ्या अंगनात खेळे कुनाचा जेठयामाल

अंगी कुसुंबी, झगा लाल

६४

काळी चंद्रकळा, नेसली घडीवर

मुलगा गुजर कडीवर

६५

छंदखोरू बाळ, छंद घेतो नाही त्याचा

चंद्र मागतो आकाशीचा

६६

छंदखोरू बाळ, छंदाला देऊं काय

मोर मागतो नाचवाय !

६७

छंदखोरू बाळ तुझ्या छंदाला डाळगुळ

सोड निरीचा माझ्या घोळ

६८

मावळण आत्याबाई, तुमच्या हाती दूधपेढं

भाचा खाऊ मागाया येतो पुढं.

६९

छंदखोरू बाळ, छंदाला देते वाटी

सोड गळ्याची माझ्या मिठी

७०

लेन्यालुगडयाची नार, काय लेन्याचा तेगार

माझा बाळराज जरीचा पदर

७१

लेन्यालुगडयाची नार कुनी पुसंना लेन्याला

महिनं किती झालं, कडीच्या तान्ह्याला ?

७२

धन ग संपदा, तुझ्या सांदीचा ध्येरूसा

तान्हा माझा राघू खेळे गलीला आरसा

७३

धन ग संपदा, कुनी पुसंना मालाला

महिनं किती झाले कडीच्या लालाला

७४

धन ग संपदा, तुझ्या सांदीचं कोंदन

तान्हा माझा राघू रासबिदीला मंडण

७५

लुगडं घेतलं, काय जोतंया दीडाच्याला

पदर घालावा कडीच्याला