Android app on Google Play

 

जंगलाचा राजा

 

स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील मार्जार कुलामधील सिंह हा एक मोठा प्राणी आहे. जंगली सिंह हल्ली आफ्रिका खंडातीलसहाराच्या दक्षिणेस आणि भारतात गुजरात राज्यामधील गीरच्या जंगलात आढळतात. एके काळी पश्चिम यूरोपमध्ये सिंहांचे वास्तव्य होते. इंग्लंड मध्ये आढळलेल्या जीवाश्मांवरुन आणि फ्रान्स व जर्मनीमधील गुहांमध्ये नवाश्म युगात आदिमानवाने काढलेल्या चित्रांवरुन हे दिसून येते. इ. स. पू. सु. चौदाव्या शतकापासून पॅलेस्टाइन लोकांना सिंह माहीत होता. एकोणिसाव्या शतकापर्यंत उत्तर भारतात (नर्मदेपर्यंत) पुष्कळ सिंहआढळत होते. इथिओपिया, ईजिप्त आणि अरबस्तान या मार्गाने सिंह आशिया खंडात आले असावेत.
 
सिंह घनदाट जंगल, वाळवंट आणि दलदल (चिबड) असलेल्या प्रदेशात राहत नाहीत. आफ्रिका खंडात सपाट प्रदेश आणि गवताळ प्रदेश ही सिंहाची नैसर्गिक निवासस्थाने आहेत. भारतात गीरच्या जंगलातील सर्व प्रदेश ओबडधोबड आहे. या जंगलात खुरटलेले साग, पळस, जांभूळ व बोरीची झाडे असून अधूनमधून बांबूंची लहान बेटे आहेत. या खुरट्या झाडांखाली काटेरी झुडपे वाढलेली आहेत. भारतात आढळणारा सिंह अशा जंगलांत राहतो. अशा प्रदेशात खूर असलेले प्राणी पुष्कळ असतात. सिंह अशा प्राण्यांची शिकार करतात.
 
आफ्रिकी सिंह आणि भारतीय सिंह एकाच जातीचे असले, तरी त्यांच्यात काही फरक आहेत. आफ्रिकी सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लीओ लीओ आणि भारतीय सिंहाचे पँथेरा लीओ पर्सिका असे आहे. भारतीय सिंहाची सरासरी लांबी आफ्रिकी सिंहाइतकीच म्हणजे सु. २७५ सेंमी. असते. भारतीय सिंहाची आतापर्यंत नोंदली गेलेली जास्तीत जास्त लांबी २९२ सेंमी. आणि आफ्रिकी सिंहाची ३२३ सेंमी. आहे. सिंहाची शेपटी ६१-९१ सेंमी. लांब असते. भारतीय सिंहाच्या शेपटीच्या टोकावरील काळ्या केसांचा गोंडा मोठा व लांब असतो. कोपरांवर केसांचे मोठे झुपके असतात आणि पोटावर केसांची संपूर्ण आणि स्पष्ट झालर असते. सिंहाचा रंग पिंगट पिवळा असतो. त्याची आयाळ डोक्यापासून खांद्यापर्यंत असून फिकट किंवा गडद रंगाची असते. आयाळ भरदार किंवाविरळ असते. स्थूलमानाने भारतीय सिंहाची आयाळ आफ्रिकी सिंहापेक्षा काहीशी लहान असते; परंतु त्याबरोबर भारतीय सिंहाचे अंग आफ्रिकी सिंहापेक्षा दाट केसांनी झाकलेले असते. शिवाय आफ्रिकी सिंहात नेहमी काही सिंह असे आढळतात, की त्यांना मुळीच आयाळ नसते; परंतु प्रत्येक भारतीय सिंहाला आयाळ असते. सिंहीण सिंहापेक्षा लहान असून तिला आयाळ नसते. सिंहाचे वजन १८१-२२७ किगॅ. असते. त्याची खांद्यापाशी उंची सु. १२२ सेंमी. असते. त्याला लांब सुळे आणि तीक्ष्ण नख्या असतात. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रॉन्सव्हाल राज्यात पांढरे सिंह आढळतात; परंतु त्यांची संख्या मर्यादित आहे.
 
सिंहाचे ओरडणे मेघगर्जनेसारखे असून ते कधी कधी पाच किमी. पर्यंत ऐकू येते. ते संध्याकाळी शिकारीस बाहेर पडताना तसेच पहाट होण्यापूर्वी गर्जना करतात. सिंह दिवसा झाडाच्या छायेत विश्रांती घेतात आणि तिन्हीसांजेच्या सुमारास शिकार करण्याकरिता बाहेर पडतात; परंतु कधी कधी दिवसादेखील ते शिकार करतात. हत्ती, गेंडे आणि पाणघोडा यांच्यासारखे प्राणी सोडून बाकीच्या कोणत्याही शाकाहारी प्राण्यांना (उदा., गवा, झीब्रा,हरिण इ.) ते मारुन खातात. ते दबा धरुन भक्ष्याची शिकार करतात आणि बहुधा सिंहीणच भक्ष्याला ठार मारते. आठवड्यातून एकदाच पोटभर अन्न मिळाले तरी सिंहांना चालते. पुष्कळ दिवस शिकार न मिळाल्यास सिंह मेलेल्या जनावरांवर आपली भूक शमवितात. शक्यतो वृद्घ व अशक्त सिंहच मानवावर हल्ल करतात. सिंह पाण्यात चांगले तसेच बराच वेळ पोहू शकतात. पाण्यातील मगर व सुसर यांच्यापासून ते लांब राहतात.
 
सिंह कळप करुन राहतात. एक किंवा दोन पूर्ण वाढलेले नर कळपाचे पुढारी असतात. कळपात ६-३० सदस्य असतात. मादीचा विणीचा हंगाम ठराविक नसतो; परंतु गीरच्या जंगलातील माद्यांना जानेवारी किंवा फेबुवारीच्या महिन्यात पिले होतात. गर्भावधी सु. ११६ दिवसांचा असतो. मादीच्या दोन वेतांमध्ये सु. दोन वर्षांचे अंतर असते. तिला एकावेळी दोन किंवा तीन पिले होतात; कधीकधी पाचदेखील होतात. जन्म झाल्यानंतर पिलांचे मिटलेले डोळे सहा ते नऊ दिवसांपर्यंत उघडतात. त्यांच्या शरीरावर काळे ठिपके असतात. दहाव्या महिन्यानंतर हे ठिपके नाहीसे होतात. पिले अकरा महिन्यांची झाल्यावर शिकारीत भाग घेतात. मादी पिले अडीच ते तीन वर्षांची झाल्यावर जननक्षम होतात. सिंह पाच वर्षांचा झाला म्हणजे वयात येतो. जंगलातील सिंह १५-१८ वर्षे जगतो, तर पाळलेला सिंह सु. ३० वर्षे जगतो.
 
काही विशिष्ट परिस्थितींत प्राणिसंग्रहालयात वाघ व सिंहीण आणि सिंह व वाघीण यांच्यापासून अनुक्रमे ‘टायगन’ आणि ‘लायगर’ अशा संकरित संतती निर्माण होतात. त्यांतील नर संतती वंध्य असते; परंतु मादीला पिले होऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेचे कूगर राष्ट्रीय उद्यान, टांझानियाचे सेरेगेटी राष्ट्रीय उद्यान, नामिबियाचे ईटोश राष्ट्रीय उद्यान, झिंबाब्वेचे ह्वांगे राष्ट्रीय उद्यान, युगांडाचे रुबेनझोरी राष्ट्रीय उद्यान इ. ठिकाणी सिंहांकरिता संरक्षित नैसर्गिक प्रदेश राखून ठेवण्यात आले आहेत. भारतात गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांचे शेवटचे नैसर्गिक निवासस्थान आहे. [ ⟶राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश].
 
सिंहाला पौरुषाचे व पराक्रमाचे प्रतीक मानतात. त्याला राजसत्तेचे प्रतीक मानले असल्यामुळे राजाच्या आसनाला सिंहासन म्हणतात. सारनाथ येथील अशोकस्तंभाच्या शिर्षावर चार सिंह विशिष्ट मौर्यशैलीत कोरलेले आहेत. या स्तंभाचे शीर्ष भारताने पहिल्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. शिल्पकारांनी कीर्तिमुखाच्या स्वरुपात त्याला मंदिराच्या दारावर बसविले आहे.