Get it on Google Play
Download on the App Store

अभिजितचे पतन

निलेश ओक यांच्या पुस्तकातील मला आवडलेल्या अरुंधतीच्या कालखंडाबद्दल पहिल्या भागात लिहिले. पुस्तकातील इतर मुख्य उपविषयांवर यापुढील भागात लिहिणार आहें.

पुस्तकाच्या सुरवातीलाच श्री ओक यानी एक प्रकरणअभिजितचे पतनया नावाने लिहिले आहे. मूळ विषयाशीं त्याचा तसा काही संबंध नाही. भारतामध्ये महाभारताचेहि पूर्वीपासून ज्योतिर्गणित (Astronomy) या विषयाची जुनी परंपरा होती हे दाखवून देणे हा हेतु असल्याचे त्यानी म्हटले आहे. त्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. अर्थात टेलेस्कोप वगैरे साधने नसलेल्या त्या काळात नुसत्या नजरेने जे पाहता येईल त्याचाच अभ्यास शक्य होता आणि तरीहि जगातील इतर अनेक संस्कृतींप्रमाणे भारतानेहि या विषयात आश्चर्यकारक प्रगति केली होती याचा सार्थ अभिमान भारतीयानी बाळगण्यास काहीच हरकत नाही.

भारतीयानी, सूर्य, चंद्र ग्रह आकाशाच्या एका विशिष्ट पट्ट्यातून (Ecliptic) फिरतात हे जाणले होते. एक फेरा पुरा करण्यास चंद्राला २७ दिवस लागतात हे जाणल्यावर त्या भ्रमणमार्गावर २७ नक्षत्रे त्यानी निश्चित केली. त्या कश्यपाच्या २७ कन्या त्या कश्यपाने चंद्राला अर्पण केल्या चंद्र एकेकीच्या घरी एकेक रात्र काढतो अशी एक काव्यमय कल्पनाहि रचली. (मात्र काही नक्षत्रांचीं नावे पुरुषी आहेत!) ही २७ नक्षत्रे भ्रमणमार्गावर साधारणपणे सारख्या अंतरावर आहेत मात्र स्वातीसारखे एखादे नक्षत्र भ्रमणमार्ग सोडून दूर अंतरावर आहे.

भ्रमणमार्गावरील २७ नक्षत्रांबरोबर त्या मार्गापासून जवळजवळ ६० अंश दूर असलेल्याअभिजितया एका ठळक तार्याचेहि नाव जोडले जाते. याअभिजितच्या पतनाबद्दल एक उल्लेख महाभारतात आहे. वनवासात असताना युधिष्ठिराला अनेक ऋषि येऊन भेटत असत त्यांचें अनेक विषयांवर संभाषण होई. व्यासानी या निमित्ताने अनेक विषयांबद्दल त्याकाळी प्रचलित असलेले ज्ञान माहिती संकलित केली आहे. यापैकीच एक मार्कंडेय ऋषि. त्यांच्या संवादामध्ये त्यानी स्कंद देवतेबद्दल युधिश्ठिराला बरेच ऐकविले त्याचे अखेरीस इंद्र स्कंद यांचा एक संवाद वर्णिला आहे. तो संपतासंपता इंद्राला काहीतरी महत्वाचे सांगावयाचे आहे असे स्कंदाला जाणवले म्हणून त्याने विचारले तेव्हा इंद्राने त्याला जे म्हटले त्याबद्दलचे श्लोक हा श्री ओक यांचा विषय आहे.

ते चार श्लोक असे आहेत.

  अभिजित्स्पर्धमाना तु रोहिण्याः कन्यसी स्वसा

        इच्छन्ती ज्येष्ठतां देवी तपस्तप्तं वनं गता.

     तत्र मूढोस्मि भद्रं ते नक्षत्रं गगनाच्च्युतम्

      कालंत्विमं परं स्कंद ब्रह्मणासह चिन्तय

   धनिष्ठादिस्तदा कालो ब्रह्मणा परिनिर्मितः

      रोहिण्याद्यः अभवत्पूर्वम् एवम् संख्या समाभवत्

    एवमुक्ते तु शक्रेण त्रिदिवं कृत्तिकागताः

      नक्षत्रं शकटाकारं भाति तद्वन्हिदैवतम्

 हे श्लोक वाचले तर उघड दिसते कीं पहिले श्लोक इंद्राने स्कंदाला काय म्हटले ते सांगतात चौथा श्लोक त्यानंतर काय घडले हे सांगतो (अर्थात मार्कंडेयाने तसे युधिष्ठिराला म्हटले).