जेटी कि धक्का?
मुंबईकराना भाऊचा धक्का हा शब्दप्रयोग सुपरिचित आहे. कोकणात जाणाराना तर तो जास्तच जिव्हाळ्याचा!
हल्लीच श्री. उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले व इतर अनेक प्रेक्षणीय वास्तूंच्या फोटोंचे सुरेख पुस्तक पाहण्यात आले. त्यात एक फोटो (सध्या वापरात असलेल्या) भाऊच्या धक्क्याचा होता. हा धक्का श्री. भाऊ अजिंक्य यानी बांधला असा चुकीचा उल्लेख त्यात दिसला. सध्या ज्याला ’भाऊचा धक्का’ म्हणतात ती एक जेटी आहे, धक्का नव्हे. धक्का जमिनीला चिकटून असतो. बोट धक्क्याला चिकटून उभी राहते! जेटी जमिनीपासून सुरू होऊन समुद्रात घुसते. तिला सर्व बाजूनी बोटी चिकटू शकतात. भाऊचा धक्का ही सध्याची जेटी फार जुनी नाही. साधारण ३५ वर्षांपूर्वी ही कॉंक्रीट्ची जेटी प्रिन्सेस डॉकच्या बाहेरच्या भिंतीपासून सुरू होऊन समुद्रात तिरकी बांधली गेलेली आहे. जेटीवर प्रवाशांसाठी शेड आहे. आता कोकणात जाणार्या बोटीच नसल्यामुळे या जेटीला मुंबई बंदरात फिरणाऱ्या लोंचेस व इतर छोट्या बोटी तेवढ्या लागतात. अजूनही या जेटीला लोक भाऊचा धक्का म्हणतात खरें, पण हा मूळ भाऊचा धका नव्हेच!