नलदमयंतीकथा भाग ११
तिने आपल्या दासींना सांगितले कीं बाहुकाला पाणी वा विस्तव देऊं नका व तो स्वत:साठी अन्न कसे शिजवतो तें नीट पाहून मला सांगा. त्याने मांस शिजवले तर जमल्यास त्याचा नमुना माझ्यासाठी आणा. नलराजाला अग्नि व वरुण यांनी वर दिलेले असल्यामुळे जर बाहुक हाच नल असेल तर त्याचे पाणी वा अग्नि यावांचून अडणार नाहीं तसेंच नल पाकक्रियेत खास प्रवीण असल्यामुळे बाहुकाने मांस शिजवले तर त्याला नलाच्या हातची चव असेल अशा तिच्या अपेक्षा होत्या. त्याप्रमाणेच झाले. दासींनी येऊन सांगितले कीं त्याच्या चुलीत अग्नि आपोआप प्रगट झाला व कलशामध्ये जळहि आपोआप भरले! याचा तारतम्याने इतकाच अर्थ घ्यावयाचा कीं स्वयंपाकघरांतील सर्व क्रियांमध्ये नल प्रवीण होता व ही गोष्ट सर्वसामान्य पुरुषांना (त्याकाळींहि) सहजसाध्य नसल्याने बाहुकाचे नलाशीं साम्य दिसून आले. अजूनहि खात्री करण्य़ासाठी दमयंतीने आपल्या दोन्ही लहान मुलांना बाहुकाकडे पाठवलें व दासींना लक्ष ठेवण्यास सांगितले. मुलें दृष्टीस पडल्यावर बाहुकाला म्हणजे नलाला मन आवरतां आलें नाहीं व तो त्यांना कवटाळून रडूं लागला. हे ऐकून दमयंतीची जवळपास खात्री झाली पण रूप मुळीच जुळत नव्हते. नलाचे वेषांतर उत्तम जमले होते. अखेर दमयंतीने आईला विश्वासात घेऊन म्हटले कीं बाहुक हाच नल असला पाहिजे तेव्हां खात्री करण्यासाठी मला त्याची एकांतात भेट घेऊंदे. पित्याला काही न सांगतां आपल्या जबाबदारीवर तिने हे धाडस केले. प्रत्यक्ष भेटीत दमयंतीने स्पष्टच विचारल्यावर नलाचा नाइलाज झाला व त्याने मीच नल असें मान्य केलें. ’वनात तुला एकटीला टाकून गेलो कारण नाहींतर तूं मला सोडून माहेरीं गेली नसतीस व तूं हरप्रयत्नाने माहेरीं पोंचशीलच असा मला भरवसा होता’ असा खुलासा केला. मग वेषांतर टाकून स्वरूप धारण केले. ’तूं पुन्हा स्वयंवर करणार आहेस हे ऐकून मला काही सुचेना’ असे नल म्हणाला तेव्हां अर्थातच दमयंतीने खुलासा केला कीं ’हा सर्व, पित्यालाही न कळवतां, माझाच बेत होता आणि त्याचा हेतु फक्त एकच होता कीं तुम्हीच बाहुकरूपाने ऋतुपर्णापाशीं असाल तर फक्त तुम्हीच एक दिवसात येथे येऊन पोंचाल दुसर्या कोणासही हे शक्य होणार नाही हें मी खात्रीने जाणत होतें’ पतिपत्नींतील परस्पर विश्वासाचे हे एक उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.
नलाने व दमयंतीने एकेकट्याने सोसलेल्या संकटांची हकीगत एकमेकांना सर्व सांगितली. दुसर्या दिवशीं नलदमयंतीने वडील माणसांस व ऋतुपर्णासहि सर्व हकिगत सांगितली. स्वयंवराबाबत फसवणूक झाल्याबद्दल बिलकुल राग न धरतां ऋतुपर्णाने दोघांचे अभिनंदन केले व ’नला मी तुला न ओळखून नोकराप्रमाणे वागवले याचे वाईट वाटते’ असे म्हटले. नलाकडून रथसंचालनात प्रावीण्य मिळवून ऋतुपर्ण परत गेला. दमयंतीच्या पित्यानेहि कन्या व जावई पुन्हा एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला व नलाचा आदरसत्कार केला.
यथावकाश, द्यूतविद्येत नव्याने प्रावीण्य मिळवलेल्या नलाने आपल्या राजधानीला परत जाऊन पुष्कराला आव्हान दिले व द्यूतामध्ये विजय मिळवून सर्व गतवैभव जिंकून घेतले. मात्र पुष्कराला शासन न करतां क्षमा करुन राज्याबाहेर घालवले.
येथे नलदमयंती कथा संपली. संकटपरंपरा कोसळली तरी कुलीन व गुणवंत व्यक्ति धैर्य न सोडतां योग्य कालाची वाट पाहून दीर्घ प्रयत्नाने पुन्हा गतवैभव प्राप्त करून घेऊं शकतात हा मथितार्थ युधिष्ठिराला पटवण्यासाठी बृहदश्वाने ही कथा त्याला सांगितली. त्या पासून योग्य तो बोधहि युधिष्ठिराने घेतला असे म्हणतां येईल.