सत्यकथा: भाग्यवान बैल!
दि. ९/९/१९९९ रोजी-
भगवान सखाराम पाटील रा. देवघर जि. नासिक
यांच्या घरी रडारडी चालू होती.
जो तो विचारत होता, काय झाले?
कोण गेलं?
अहो, त्यांचा लाडका सर्जा बैल म्हातारपणामुळे मरण पावला होता. भगवान पाटील यांनी गावोगावी मित्रमंडळी, नातेवाईक व आजूबाजूची ५/१० खेडी यांना बैलाच्या मौतीचे आमंत्रण पाठवले होते व पोळ्याला बैलाचा जसा शृंगार करतात तसा पूर्ण शृंगार मालेगांवहून मागवला. प्रेतयात्रेची जोरदार तयारी झाली. सर्जा बैलाचे प्रेत मोठ्या ट्रकमध्ये सजवून ठेवणात आले. प्रेतयात्रा सेताकडे निघाली तेव्हा जवळपास २५०० - ३००० लोक तेथे जमले. प्रेतयात्रा वाजत गाजत हरिनाम भजने गात निघाली.
शेतात यात्रा आल्यानंतर सरण रचण्यात आले. त्यानंतर सर्जा बैलाला ठेवण्यात आले. भगवान पाटलांनी त्यास भडाग्नी दिला.
त्यानंतर त्यांनी सर्वांना बैलाच्या गंधमुक्ती चे १० दिवसांनंतर चे आमंत्रण दिले.
***
दि. १९/९/१९९९ रोजी देवघर गावातील सर्व लोक, तसेच आजूबाजूच्या खेड्यातील सर्व मंडळी असे एकूण ४००० लोक जमा झाले. गंधमुक्ती जेवण जोरात झाले.
वरण भात, भाजी पूरी, बुंदी असे पदार्थ बनवले होते.
प्रत्येक जण विचारत होता की पाटलांनी बैलाच्या मरणोत्तर एवढा खर्च का केला? त्याचे उत्तर फक्त आणि फक्त भगवान पाटील याचे कडे होते आणि त्या बिचार्या मुक्या बैलाकडे जो काही बोलू शकत नव्हता....
***
दि. ९/९/२००९ रोजी, बरोबर दहा वर्षांनी त्यांनी त्यांच्या नातवाला त्या बैलाबद्दल सांगितले....
भगवान पाटील हे साधारण शेतकरी होते.
त्यांचेकडे ४/५ बिघे जमीन होती व एक बैलजोडी होती.
शेतीची कामे आटोपल्यावर भगवान पाटील साखर कारखान्यावर बैलजोडी घेवून जात व सिझन संपला की घरी येत. मे, जून मध्ये शेती नांगरणे वगैरे कामे करीत.
बैलाकरता त्यांचेकडे एक लहान गोठा होता. त्यामध्ये ते बैलजोडीला बांधून ठेवत.
एक दिवस सर्जा बैल रात्रीचा सुटून गेला व तो रात्रभर भटकत भटकत १० मैल दूर गेला. चिंचगव्हाण येथे पोहोचला. भगवान पाटील बैलाच्या शोधाकरता बाहेर पडले. या गावात विचार, ता गावात विचार असे करत करत सर्जेराव सकाळी सकाळी चिंचगव्हाण येथे पोहोचले.
गावाबाहेरच्या उकिरड्याजवळ त्यांचा बैल त्यांना शांतपणे बसलेला दिसला. बैल दिसताच त्यांना आनंद झाला. त्यांनी बैलाला उठवले.
त्या बैलाच्या पायाखाली एक गाठोडेवजा पिशवी होती. ती उघडून पाहाताच पाटील यांचे डोळे विस्फारले. त्यात ३०/४० तोळे सोन्याचे दागिने होते.
तसेच चांदीचे राणी छाप नाणे होते. बैल अन गाठोड्यासह ते न थांबता घरी पोहोचले. बैलामुळे त्यांना संपत्ती मिळाली. त्यातून त्यांनी ५०/६० बिघा जमीन घेतली आणि गावात एक प्रतिष्ठीत शेतकरी म्हणून नावारुपास आला.
आता ती शेती नातू करतात. भगवान पाटील दर वर्षी पितृ अमावस्येला बैलाला घास देतात....