Android app on Google Play

 

२-भुलाबाई: एक आठवण

" भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला, पार्वती बोले शंकराला, चला हो माझ्या माहेराला. " काही मुली शेजारी भुलाबाईचे गाणे म्हणत होत्या.

मला माझा भूतकाळ आठवला. काळ साधारण १९५० -१९६०. माझ्या लहानपणीचा.

आमचा दहा जणींचा गट होता. माझ्या माहेरी भाद्रपद पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भुलाबाई बसतात ती जागा स्वच्छ करून ठेवली जाई. नंतर माझा चुलत भाऊ फोटोंचे मखर तेथे लावी व नंतर सुंदर आरास करित असे. पौर्णिमेच्या दिवशी नवीन भुलाबाई म्हणजेच, मातीचा शंकर- पार्वतीचा जोड आणला जाई. आम्ही दोघी बहिणी व दोन्ही चुलत बहिणी यांचा एकेक जोड असे. माझ्या बहिणीचा कॄष्णाचा, माझा राधेचा ब दोन्ही चुलत बहिणींचा शंकर पार्वतीचा असे जोड असत. हे जोड सजवलेल्या मखरात ठेवले जात.

आम्ही मुली फुलांचे हार करून भुलाबाईला घालीत असू. संध्याकाळी शाळा सुटली की, सर्व मुली टिपऱ्या घेवून एका ठीकाणी जमत. नंतर एकेकीच्या घरी भुलाबाईचे गाणे म्हणत असू. नंतर सर्व मुलींना खाऊ वाटला जाई. असा कार्यक्रम एक महिनाभर चालत असे.

शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई अंगणात पाटावर ठेवून रांगोळी काढून त्यापुढे ३० खिरापती ठेवीत असू. नंतर केळीच्या पानावर किंवा कागदावर तो खाऊ वाटित असू. शंकरपाळे, मुगाची डाळ, चिवडा, चण्याची डाळ, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, लाडू, पेढे वगैरे.

खाऊ मुळेच पोट भरून जाई. नंतर १२ च्या पुढे टिपऱ्या खेळायच्या. भेंड्या खेळायच्या. नंतर चांदण्यात मसाला दूध प्यायचे. खुप मजा येई. आता मुलींना वेळ नाही. कारण अभ्यास खुप असतो. टि. व्ही. आला. मुली मुलांबरोबर शिकायला लागल्या. मग कालौघात हे सगळे लोप पावत गेले.

कालाय तस्मै नमः