Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण सहावे

१८५२
--------

१० जानेवारीला बर्फावरुन वाटचाल करत जॉन रे फोर्ट गॅरी इथे पोहोचला. तिथून रेड नदीच्या काठाने पदयात्रा करत त्याने सेंट पॉल गाठलं. सेंट पॉलहून निघून शिकागो - हॅमील्टन - ऑन्टारीयो - न्यूयॉर्कमार्गे मार्च अखेरीस तो लंडनला परतला.

इंग्लंडला परतल्यावर रे ला बीची बेटावर फ्रँकलीनच्या मोहीमेचे अवशेष आणि तीन कबरी आढळून आल्याची बातमी कळली. पुढच्या वर्षी आर्क्टीकमध्ये परतून फ्रँकलीनचा शोध घेण्याची आणि नॉर्थवेस्ट पॅसेज जोडणार्या शेवटच्या भागाचा शोध घेण्याची त्याने योजना आखली.

वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर मॅक्क्युलरच्या तुकडीची स्लेजवरुन भटकंती पुन्हा सुरु झाली. रेनडीअरच्या शिकारीमुळे त्यांना ताजं मांस मिळत होतं खरं, पण तरीही अनेकांची प्रकृती हळूहळू उतरणीला लागली होती. फ्रँकलीन मोहीमेच्या शोधात आलेली सर्व जहाजं आर्क्टीक मधून परतली होती. अपवाद फक्तं इन्व्हेस्टीगेटर आणि एंटरप्राईझचा! परंतु दोन्ही जहाजांवरील खलाशांना दुसर्या जहाजावरील आपले सहकारी नेमके कुठे आहेत याचा पत्ता नव्हता.

आर्क्टीकमध्ये फ्रँकलीन मोहीमेचे आढळलेल्या अवशेषांचा तपशीलवार अभ्यास केल्यावर ब्रिटीश नौदलाने फ्रँकलीनच्या शोधार्थ आणखीन एका मोहीमेची योजना आखली. ब्रिटीश नौदलाची ही शेवटची आणि सर्वात मोठी मोहीम होती. फ्रँकलीनबरोबरच मॅक्क्युलर आणि कॉलीन्सनचा शोध घेण्याचीही या मोहीमेवर जबाबदारी होती.

या मोहीमेचा प्रमुख म्हणून एडवर्ड बेल्चरची नेमणूक करण्यात आली. असिस्टंस, रिझोल्यूट, पायोनियर, इंटरपीड आणि सामग्री वाहून नेणारा डेपो म्हणून नॉर्थ स्टार अशा पाच जहाजांची या मोहीमेसाठी निवड करण्यात आली. बेल्चरच्या जोडीला, हेनरी केलेट, शेरार्ड ओस्बॉर्न, लिओपोल्ड मॅक्लींटॉक आणि विल्यम पुलेन या आर्क्टीकमधील अनुभवी दर्यावर्दींचाही या मोहीमेत समावेश होता.

असिस्टंस आणि पायोनियर यांच्यातून बेल्चर आणि ओस्बॉर्न यांनी वेलींग्टन सामुद्रधुनीत फ्रँकलीनचा शोध घ्यावा आणि रिझोल्यूट आणि इंटरपीड यांतून केलेट आणि मॅक्लींटॉक यांनी मेल्व्हील बेटाच्या पश्चिमेला मॅक्क्युलर आणि कॉलीन्सन यांचा शोध घ्यावा अशी योजना आखण्यात आली. विल्यम पुलेनचं नॉर्थ स्टार हे जहाज अन्नसामग्रीचा मुख्य डेपो म्हणून बीची बेटावर ठेवण्यात येणार होतं.

एप्रिल मध्ये बेल्चरच्या मोहीमेने इंग्लंडमधील नोर बंदरातून आर्क्टीकची वाट धरली.

११ एप्रिलला मॅक्क्युलरने ७ सहकार्यांसह इन्व्हेस्टीगेटर सोडलं, आणि स्लेजवरुन मेल्व्हील बेटाची वाट धरली. त्याच्याजवळ २६ दिवस पुरेल इतकी अन्नसामग्री होती. आर्क्टीकमध्ये असलेल्या इतर जहाजांशी संपर्क करण्याचाही त्याचा विचार होता. परंतु एंटरप्राईझचा अपवाद वगळता इतर जहाजांनी परतीची वाट धरल्याची त्याला काहीच कल्पना नव्हती. विल्यम केनेडीचं प्रिन्स अल्बर्ट बॅफीन उपसागरातच अडकलं होतं.

इन्व्हेस्टीगेटरवरुन निघाल्यावर मॅक्क्युलरच्या तुकडीची वाटचाल धीम्या गतीनेच सुरु होती. मेल्व्हील बेटाकडे जाणार्या सामुद्रधुनीपाशी त्याला एक केर्न आढळून आला!

हा केर्न विल्यम पेरीने १८१९-२० च्या मोहीमेत उभारला होता. या केर्नमध्ये आदल्या वर्षी कॅप्टन ऑस्टीनने ठेवलेला संदेश मॅक्क्युलरला आढळला. मात्रं बीची बेटावर सापडलेल्या फ्रँकलीनच्या तुकडीचे धागेदोरे मिळाल्याचा त्या संदेशात उल्लेख नव्हता. बर्फावरुन आणखीन पुढे मजल मारणं अशक्यं झाल्यावर ७ मे ला मॅक्क्युलर इन्व्हेस्टीगेटरवर परतला.

मिंटो खाडीत हिवाळ्यासाठी मुक्काम केलेल्या कॉलीन्सनने मेल्व्हील बेट गाठण्यासाठी स्लेजवरुन एका तुकडीची रवानगी केली. ही तुकडी मेल्व्हील बेटावर पोहोचण्यात अयशस्वी झाली असली तरी त्यांना बर्फात दुसर्या एका तुकडीच्या स्लेजच्या खुणा आढळून आल्या. या खुणा मॅक्क्युलरच्या तुकडीच्या होत्या.

उन्हाळा सुरु झाल्यावर बर्फ वितळून आपली सुटका होईल या आशेवर मॅक्क्युलर होता, मर्सी उपसागराबाहेरील बर्फ वितळण्यास सुरवात झाली होती, परंतु ३१ जुलैपर्यंतही जहाजभोवतीचा बर्फ वितळण्याची चिन्हं दिसेनात! ऑगस्टच्या अखेरीस मर्सी उपसागरातून आपली यावर्षीही सुटका होणार नाही याची मॅक्क्युलरला कल्पना आली.

जुलैमध्ये आणखीन एका मोहीमेने इंग्लंडचा किनारा सोडला. या मोहीमेचा प्रमुख होता एडवर्ड इंगलफील्ड. या मोहीमेची योजना जेन फ्रँकलीनची होती. आपल्या मालकीचं इसाबेला हे जहाज या मोहीमेसाठी तिने इंगलफिल्डला दिलं होतं.

५ ऑगस्टला कॉलीन्सनच्या एंटरप्राईझची बर्फातून सुटका झाली. पूर्वेचा मार्ग धरुन त्याने व्हिक्टोरीया लँडच्या दक्षिणेने कॉरोनेशन आखात गाठलं. व्हिक्टोरीया लँडच्या दक्षिणेला केंब्रिजच्या उपसागरात त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.

बेरींगच्या सामुद्रधुनीतून आर्क्टीकमध्ये शिरलेल्या कोणत्याही बोटीने पूर्वेच्या दिशेने गाठलेला हा सर्वात लांबवरचा भाग होता!

आर्क्टीक गाठल्यावर एल्समेअर बेट इंगलफिल्डच्या नजरेस पडलं. त्याने ग्रीनलंडच्या पश्चिम किनार्याच्या बर्याच भागाचं सर्वेक्षण केलं. स्मिथ आणि जोन्स खाड्यांमध्ये जास्तीत जास्त शोध घेत त्याने बीची बेट गाठलं. मात्रं फ्रँकलीनची कोणतीही खूण त्याला आढळली नाही.


बॅफीन बेट

८ सप्टेंबरला मॅक्क्युलरने पुढच्या वसंत ऋतूत आर्क्टीकमधून बाहेर पडण्याची योजना मांडली. २६ जणांच्या एका तुकडीने स्लेजच्या सहाय्याने ५५० मैलांवरील केप स्पेन्सर गाठावं आणि आदल्या वर्षीच्या मोहीमेत ऑस्टीनने तिथे ठेवलेली अन्नसामग्री आणि बोट घेऊन बॅफीन उपसागर गाठून सुटकेचा प्रयत्न करावा. ८ जणांनी मागे फिरुन बँक्स बेटाच्या किनार्याने मागे ठेवलेली बोट आणि अन्नसामग्री ताब्यात घ्यावी आणि मॅकेंझी नदीतून हडसन बे कंपनीची कॉलनी गाठावी अशी मॅक्क्युलरचा बेत होता.

हिवाळ्याची चिन्हं दिसू लागताच इंगलफिल्डने परतीचा मार्ग पकडला. बॅफीन बेटाच्या पूर्व किनार्यावर फ्रँकलीनचा शोध घेत तो इंग्लंडला परतला.

विल्यम केनेडीच्या प्रिन्स अल्बर्ट जहाजालाही फ्रँकलीनच्या मोहीमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. मात्रं कॅनडाच्या किनार्याचं बरचसं सर्वेक्षण त्यांनी केलं. ऑक्टोबरमध्ये केनेडी इंग्लंडला परतला.

हिवाळ्याच्या सुरवातीला बेल्चरच्या मोहीमेतील असिस्टंस आणि पायोनियर ही जहाजं वेलींग्टन सामुद्रधुनीच्या उत्तरेला बर्फात अडकली! रिझोल्यूट आणि इंटरपीड मेल्व्हील बेटाच्या किनार्याजवळ अडकली! १८१९ च्या विल्यम पेरीच्या मोहीमेनंतर अटलांटीकमधून मेल्व्हील बेटापर्यंत पोहोचलेली ही पहिलीच मोहीम होती. विल्यम पुलेनचं नॉर्थ स्टार पूर्वीच्या योजनेप्रमाणे बीची बेटावर पोहोचलं होतं. जहाजं अडकल्यावर स्लेजच्या सहाय्याने आसपासच्या प्रदेशात अनेक मोहीमा हाती घेण्यात आल्या.

मॅक्क्युलरचे सहकारी दिवसेदिवस अशक्तं होते. आदल्या वर्षीपेक्षाही तीव्र थंडीमुळे त्यांच्या अडचणींत भरच पडली होती. त्यातच आणखीन एक संकट त्यांच्यापुढे उभं ठाकलं.

स्कर्व्ही!

रेनडीयरचं ताजं मांस मिळणं दुरापस्तं झाल्याने स्कर्व्हीचा प्रादुर्भाव वाढत होता! दिवसेदिवस सर्वजण अशक्तं होत चालले होते.

--------
१८५३
--------

वेलींग्टन सामुद्रधुनीत अडकलेल्या बेल्चरने मार्चमध्ये स्लेजवरुन फ्रँकलीनचा शोध घेण्यास सुरवात केली. उत्तरेला शोध घेतल्यावर डेव्हन बेटाच्या उत्तरेच्या टोकाला असलेल्या खाडीचा बेल्चरला शोध लागला.

या खाडीतून फ्रँकलीन बॅफीन उपसागराच्या दिशेने तर गेला नव्हता?

मार्चमध्येच केंब्रिजच्या आखातात मुक्काम केलेल्या रिचर्ड कॉलीन्सनने स्लेजच्या सहाय्याने पूर्वेची दिशा धरली. बर्फावरुन मार्गक्रमणा करत त्याने व्हिक्टोरीया बेटाच्या पूर्वेचं टोक असलेला पील पॉईंट गाठला. इथे असताना एस्कीमोंच्या एका टोळीशी त्याची गाठ पडली. त्या एस्कीमोंपैकी एकाने कॉलीन्सनला बर्फात एक नकाशा काढून दाखवला.

त्या नकाशावर एक जहाज दर्शवलेलं होतं!

हे जहाज फ्रँकलीनच्या जहाजांपैकी तर नव्हतं?
त्या जहाजावर अद्यापही कोणी खलाशी तग धरुन होते का?

दुर्दैवाने कॉलीन्सनच्या तुकडीतील कोणालाही एस्कीमोंची भाषा नीट येत नव्हती, त्यामुळे या माहितीचं महत्व त्याला कळू शकलं नाही अन्यथा त्या जहाजाच्या दिशेने स्लेजवरुन एक तुकडी पाठवणं त्याला सहज शक्यं झालं असतं! फ्रँकलीनच्या तुकडीतील कोणी अद्यापही जिवंत असलंच तर त्यांचा शोध लागू शकला असता.

मॅक्क्युलरने आर्क्टीकमधून बाहेर पडण्याच्या आपल्या शेवटच्या मोहीमेची रुपरेषा सहकार्यांसमोर मांडली. मॅक्क्युलरबरोबर केप स्पेन्सरला जाणार्या तुकडीत समावेश न झालेले इतर खलाशी साहजिकच नाराज झाले होते. अशक्तं आणि वैद्यकीय मदतीची आवश्यकता असणार्यांना आपल्याबरोबर नेण्याचा मॅक्क्युलरचा निश्चय होता. मोहीमेची तयारी सुरु असतानाच मॅक्क्युलरच्या सहकार्यांना पहिला धक्का बसला.

५ एप्रिलला जॉन बॉईलचा स्कर्व्हीने बळी घेतला!

बॉईलच्या मृत्यूचा परिणाम जबरदस्तंच होता. फ्रँकलीनच्या मोहीमेप्रमाणे आपलाही इथेच अंत होणार अशी भावना सर्वांच्या मनात मूळ धरु लागली! आतापर्यंत टिकवून ठेवलेलं धैर्य पार रसातळाला गेलं.

६ एप्रिलला जॉन बॉईलची कबर खणण्यात मग्नं असलेल्या खलाशांना एक विलक्षण दृष्यं दिसलं..

मर्सी उपसागराच्या उत्तरेने त्यांच्या दिशेने कोणीतरी चालत येत होतं!
माणूस!

सर्वजण आश्चर्याने त्या माणसाकडे पाहत राहीले. काही वेळातच तो त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला.

"कोण आहेस तू? आणि कुठून आलास?" मॅक्क्युलरने त्याच्याकडे चौकशी केली.
"लेफ्टनंट बेडफोर्ड पिम! हेराल्ड! कॅप्टन केलेट!" तो उत्तरला.

मॅक्क्युलरचा आणखीनच गोंधळ उडाला. तीन वर्षांपूर्वी बेरींगच्या सामुद्रधुनीत गाठ पडलेल्या हेराल्ड जहाजावरील लेफ्टनंट पिम त्याला अजिबात आठवत नव्हता. त्यातच तो आर्क्टीकमध्ये कुठून उगवला होता?

लेफ्टनंट पिम २८ दिवसांच्या पदयात्रेनंतर तिथे पोहोचला होता. फ्रँकलीन आणि मॅक्क्युलर - कॉलीन्सन यांच्या शोधात आलेल्या बेल्चरच्या मोहीमेतील रिझोल्यूट या मेल्व्हील बेटावरील जहाजावरुन शोध घेत मर्सी उपसागरात अखेर त्याने मॅक्क्युलरला गाठलं होतं!

पिमकडून ही माहीती मिळताच मॅक्क्युलर आणि त्याच्या सहकार्यांना हायसं वाटलं.

सुटका!

८ एप्रिलला पिमने इन्व्हेस्टीगेटर सोडलं आणि रिझोल्यूटची वाट धरली. पिमशी गाठ पडल्याने सुटकेच्या आशेने मॅक्क्युलरच्या सहकार्यांमध्ये नवाच उत्साह संचारला होता. मात्रं त्यांच्या परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नव्हती. स्कर्व्हीचा धोका अद्यापही टळला नव्हताच. ११ एप्रिलला जॉन एम्स या खलाशाचा मृत्यू झाला. आणखीन दोन दिवसांनी १३ एप्रिलला जॉन केरचा बळी गेला.

१५ एप्रिलला आपल्या २७ सहकार्यांसह तीन स्लेजवरुन मॅक्क्युलरने इन्व्हेस्टीगेटर सोडलं आणि तो मेल्व्हील बेटाच्या दिशेने निघाला. पाच दिवसांच्या वाटचालीनंतर २० एप्रिलला मॅक्युलर आणि त्याचे सहकारी अखेर मेल्व्हील बेटांवर पोहोचले! रिझोल्यूट जहाजावर हेनरी केलेट आणि फ्रान्सिस मॅक्लींटॉक यांच्याशी त्याची भेट झाली. बेरींगच्या सामुद्रधुनीतून आर्क्टीकमध्ये प्रवेश करुन मेल्व्हील बेट गाठण्यात मॅक्क्युलर अखेर यशस्वी ठरला होता!

एप्रिलअखेरीस फ्रान्सिस मॅक्लींटॉकने स्लेजच्या सहाय्याने रिझोल्यूट सोडलं आणि फ्रँकलीनच्या मोहीमेचा शोध घेण्यास सुरवात केली.

१९ मे ला मॅक्क्युलर इन्व्हेस्टीगेटरवर परतला. त्याच्याबरोबर रिझोल्यूटवरचा डॉक्टर डॉमव्हील होता. डॉमव्हीलने मागे राहीलेल्या मॅक्क्युलरच्या सहकार्यांची तपासणी केली. मर्सी उपसागरातील बर्फ वितळून जहाज मोकळं झालं तरीही ते हाकारण्याइतकी मॅक्क्युलरच्या सहकार्यांमध्ये ताकद राहीलेली नव्हती! आणखीन एक हिवाळा तिथे काढणं म्हणजे उघडच मृत्यूमुखात उडी मारणं ठरणार होतं!

अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे एकच मार्ग होता...

जहाज सोडून मेल्व्हील बेटावरील रिझोल्यूटचा आश्रय घेणे!
हेनरी केलेटने मॅक्क्युलरला आधीच तशी सूचना दिली होती!

मे अखेरीपर्यंत जहाजावरील सर्व सामान किनार्यावर उतरवण्यात आलं. मरण पावलेल्या आपल्या सहकार्यांच्या स्मरणार्थ तिथे एक केर्न उभारण्यात आला. जहाज सोडून मेल्व्हील बेटावर असलेल्या रिझोल्यूटवर जात असल्याचा मॅक्क्युलरने तिथे संदेश ठेवला.

३ जूनला मॅक्क्युलर आणि इतरांनी इन्व्हेस्टीगेटर सोडलं आणि मेल्व्हील बेटाची वाट धरली. १८ दिवस पुरेल इतकी अन्न्सामग्री त्यांच्यापाशी होती. १२ जूनला त्यांनी मेल्व्हील बेट गाठलं. १७ जूनला सर्वजण रिझोल्यूटवर पोहोचले.

जॉन रे ने पुन्हा इंग्लंड सोडलं आणि न्यूयॉर्क - माँट्रीयाल - सॉल्ट सेंट मेरी - फोर्ट विल्यम या मार्गे १८ जूनला यॉर्क फॅक्टरी वसाहत गाठली. २४ जूनला दोन बोटी घेऊन त्याने यॉर्क फॅक्टरी सोडली आणि बोटी ओढत १७ जुलैला चेस्टरफिल्ड खाडी गाठली.

रिझोल्यूटवरील एक तुकडी बीची बेटावरुन ऑक्टोबरमध्ये इंग्लंडला परतणार होती. इव्हेस्टीगेटरवरील अधिकारी सॅम्युएल क्रेसवेल याचाही त्यांच्यात समावेश करण्यात आला होता.

जुलैमध्ये रिझोल्यूटवरील स्लेजच्या सहाय्याने भटकंती करत असलेल्या एका तुकडीची दुसर्या एका मोहीमेच्या तुकडीशी गाठ पडली. ही तुकडी एंटरप्राईझवरील कॉलीन्सनच्या मोहीमेतील होती. मॅक्क्युलरने मर्सीच्या उपसागरात इन्व्हेस्टीगेटर जहाज सोडून देऊन मेल्व्हील बेटावर रिझोल्यूटवर आश्रय घेतल्याचं त्यांच्याकडून समजल्यावर कॉलीन्सनने आर्क्टीकमधून बेरींगच्या सामुद्रधुनीमार्गे इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला.

ऑगस्टच्या मध्यावर मॅक्लींटॉक रिझोल्यूटवर परतला. तीन महिन्यांत त्याने १४०० मैलांची भटकंती केली होती. फ्रँकलीनचा शोध लागला नसला तरीही प्रिन्स पॅट्रीक बेटाची त्याने प्रद्क्षिणा केली होती.


प्रिन्स पॅट्रीक बेट

१८ ऑगस्टला बर्फात अडकलेल्या असिस्टंस आणि पायोनियरची सुटका झाली. बेल्चरने उत्तरेचा मार्ग धरला, परंतु वेलींग्टन सामुद्रधुनीतून काही अंतर काटल्यावर पुन्हा एकदा गोठलेल्या बर्फाने त्याचा मार्ग रोखून धरला. सप्टेंबरच्या अखेरीला असिस्टंस आणि पायोनियर बर्फात पक्की अडकली होती!

दरम्यान बीची बेटावर आणखीन एक जहाज येऊन धडकलं होतं!

फिनीक्स!

बेल्चरच्या मोहीमेला अन्नसामग्रीचा साठा पुरवण्यासाठी एडवर्ड इंगलफील्डच्या अधिपत्याखाली हे जहाज आर्क्टीकमध्ये परतलं होतं. बीची बेटांवरील इंग्लंडला परतणारे रिझोल्यूटवरील खलाशी आणि सॅम्युएल क्रेसवेल यांच्यासह फिनीक्सने इंग्लंडची वाट धरली. ऑक्टोबर अखेरीला फिनीक्स इंग्लंडला परतलं. किमान मॅक्क्युलरच्या मोहीमेचा तरी तपास लागला होता!

चेस्टरफिल्ड खाडीतून पूर्वी अज्ञात असलेल्या या नदीतून जॉन रे ने २१० मैल अंतर काटलं, पण पुढे खाडी इतकी चिंचोळी झाली की बोट पुढे नेणं अशक्यं झालं. बेक नदीपर्यंत बोट ओढून नेईपर्यंत हिवाळ्याला सुरवात होणार हे ध्यानात आल्यावर रे ने परतीची वाट धरली आणि रिपल्सच्या उपसागराजवळ हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला.

बर्फातून मोक्ळी झालेली रिझोल्यूट आणि इंटरपीड ही जहाजंदेखील आर्क्टीकमधून बाहेर पडण्यात अयशस्वीच झाली होती. नोव्हेंबरमध्ये ७०'४१'' अंश उत्तर अक्षवृत्त आणि १०१'२२'' पश्चिम रेखावृत्तावर दोन्ही जहाजं बर्फात अडकली!

१४ नोव्हेंबरला इन्व्हेस्टीगेटरवरील हॅन्स सॅन्सबरी याला रिझोल्यूटवर मृत्यूने गाठलं. किनार्यापासून दूर सामुद्रधुनीत अडकल्याने कोणत्याही प्राण्याची शिकार करुन त्याचं ताजं मांस मिळण्याची शक्यताही दुरावली होती!

--------
१८५४
--------

३१ मार्चला जॉन रे ने रिपल्सचा उपसागर सोडला. पेलीच्या उपसागराजवळ रे ची काही एस्कीमोंशी गाठ पडली.

या एस्कीमोंपैकी एकाचा डोक्यावर सोनेरी पट्टा असलेली टोपी होती!

रे ने त्या एस्कीमोकडे त्या टोपीची खोदून खोदून चौकशी केली. पेली उपसागरापासून सुमारे १०-१२ दिवस पदयात्रा केल्यावर येणार्या एका ठिकाणी आपल्याला ती टोपी मिळाल्याचं त्या एस्कीमोने सांगितलं! त्याने सांगितलेली दुसरी बातमी ऐकल्यावर रे ला धक्काच बसला!

"त्या जागेवर ३०-४० कब्लूना उपासमारीने मरण पावलेले आम्हाला आढळले!" तो एस्कीमो म्हणाला!

कब्लूना!
युरोपियन गोर्या लोकांना एस्कीमो कब्लूना म्हणत असत!

रे ने त्या एस्कीमोकडून ती टोपी विकत घेतली. आणखीन कोणती वस्तू मिळाल्यास आपण ती विकत घेऊ असं मधाचं बोट लावण्यास तो विसरला नाही!

रिझोल्यूट जहाजावर रिझोल्यूट आणि इन्व्हेस्टीगेटरच्या खलाशांची गर्दी झाली होती. सर्वांसाठी हे जहाज अपुरं पडत होतं. तसेच उपलब्धं अन्नसामग्रीचा तुटवडाही त्यांना जाणवत होता. यावर उपाय म्हणून वसंत ऋतूत इन्व्हेस्टीगेटरच्या खलाशांना बीची बेटावरील नॉर्थ स्टार जहाजावर पाठवण्याचा केलेट - मॅक्लींटॉक यांनी निर्णय घेतला.

१० ते १२ एप्रिलच्या दरम्यान एकापाठोपाठ एक अशा स्लेजच्या तीन तुकड्या रिझोल्यूटवरुन बीची बेटाच्या दिशेने निघाल्या. वाटेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा पायात घातलेले मोजे फ्रॉस्टबाईट पासून वाचवण्यासाठी कापून काढावे लागत होते. मात्रं या परिस्थितीतही त्यांची वाटचाल पुढे सुरुच होती. २३ ते २७ एप्रिलच्या दरम्यान सर्वजण बीची बेटावरील नॉर्थ स्टार जहाजावर पोहोचण्यात यशस्वी झाले.

२७ एप्रिलला जॉन रे एका गोठलेल्या सामुद्रधुनीच्या दक्षिणेला पोहोचला. या सामुद्रधुनीला पुढे त्याचंच नाव देण्यात आलं. या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आणि पेली उपसागराच्या दक्षिणेला रे ने कॅस्टर पोलक्स नदी गाठली!

१८३९ मध्ये सिम्प्सनने नेमका हाच प्रदेश पश्चिमेच्या दिशेने गाठला होता!
रे च्या या मोहीमेबरोबर बेरींगच्या सामुद्रधुनीपासून ते हडसनच्या उपसागरापर्यंत असणार्या संपूर्ण प्रदेशाचा शोध घेतला गेला होता!

कॅस्टर पोलक्स नदीपासून रे ने बुथिया आखाताच्या पश्चिमेकडून उत्तरेची दिशा धरली. आतापर्यंत पादाक्रांत न झालेला हा शेवटचा प्रदेश होता. उत्तरेच्या दिशेने जाताना किंग विल्यम बेटा किनारा पश्चिमेला वळेल अशी त्याला अपेक्षा होती, परंतु हे पश्चिमेचं वळण येईना!

बेलॉट सामुद्रधुनीच्या दक्षिणेला सुमारे २०० मैलांवर असताना ६८ अंश उत्तर अक्षवृत्त आणि ९३ अंश पश्चिम रेखावृत्तावरुन रे परत फिरला. किंग विल्यम हे बेट आहे हे आपसूकच सिद्ध झालं होतं.


बेलॉटची सामुद्रधुनी

२२ मे ला इन्व्हेस्टीगेटरवरील थॉमस मॉर्गन याचा नॉर्थ स्टारवर मृत्यू झाला!

एडवर्ड बेल्चरला आपल्या सहकार्यांच्या काळजीने घेरलं होतं. कोणत्याही परिस्थितीत आर्क्टीकमध्ये आणखीन एक उन्हाळा घालवण्याची त्याची तयारी नव्हती. एप्रिलमध्ये बेल्चरने केलेट आणि मॅक्लींटॉकला रिझोल्यूट आणि इंटरपीड सोडून बीची बेट गाठण्याची सूचना दिली. २८ मे ला या दोन्ही जहाजांवरील खलाशांनी नॉर्थ स्टार गाठलं.

२६ मे ला रे रिपल्स उपसागराच्या परिसरातील आपल्या तळावर पोहोचला. तिथे अनेक एस्कीमोंशी त्याची गाठ पडली. या एस्कीमोंकडून त्याला महत्वाची माहीती मिळाली.

"चार-पाच वर्षांपूर्वी एस्कीमोंच्या एका गटाची सुमारे ४० कब्लूनांशी गाठ पडली होती!" एका एस्कीमोने रे ला सांगितलं, "ते कब्लूना एक मोठी बोट ओढून नेत होते. त्यांचा प्रमुख एक उंच आणि धिप्पाड माणूस होता! त्याच्यापाशी टेलीस्कोपही होता! त्यांची बोट बर्फात सापडून फुटली होती. ते दक्षिणेच्या दिशेने हरणाच्या शिकारीसाठी निघाले होते!"

ही बातमी ऐकल्यावर रे ची उत्सुकता चाळवली गेली नसली तरच नवल!

"ते कब्लूना पुन्हा भेटले का?" रे ने अधीरतेने प्रश्न केला.
"नाही! पुढच्या हिवाळ्यात त्या एस्कीमोंना सुमारे ३०-३५ कब्लूनांची प्रेतं आढळली!" तो एस्कीमो म्हणाला, "त्यांच्यापैकी अनेकांनी आपल्या मेलेल्या सहाकार्यांचं मांस खाल्ल्याचं दिसत होतं!"

हे ऐकल्यावर रे ला आश्चर्याचा धक्काच बसला!

त्या एस्कीमोंकडे त्या गोर्या लोकांच्या मृतदेहांपासून उचललेल्या अनेक गोष्टी उचलल्या होत्या. त्यामध्ये एक अत्यंत महत्वाची वस्तू होती.

चांदीची एक ताटली!
या ताटलीच्या मागे अक्षरं कोरलेली होती..

सर जॉन फ्रँकलीन के. सी. एच!

ही ताटली नजरेस पडताच जॉन रे ने आपली मोहीम थांबवली. शक्यं तितक्या लवकर इंग्लंडला परतण्याचा त्याने निर्णय घेतला.

२५ जुलैला बेल्चरने आपली असिस्टंस आणि पायोनियर ही जहाजं सोडून बीची बेट गाठलं!

एव्हाना नॉर्थ स्टार जहाजावर इन्व्हेस्टीगेटर, रिझोल्यूट, इंटरपीड, असिस्टंस आणि पायोनियर या सर्व जहाजांवरील खलाशांची आणि अधिकार्यांची गर्दी झाली होती. ऑगस्टच्या मध्यावर बीची बेटावर बर्फात अडकलेलं नॉर्थ स्टार जहाज मुक्तं झालं!

याच वेळी इंग्लंडहून आणखीन दोन जहाजं बीची बेटावर येऊन पोहोचली!

फिनीक्स आणि ब्रेडलबेन!

एडवर्ड इंगलफिल्ड फिनीक्समधून पुन्हा एकदा आर्क्टीकमध्ये आला होता. ही जहाजं नजरेस पडताच सर्वाना हायसं वाटलं. नॉर्थ स्टार च्या जोडीला या दोन्ही जहाजांवरुन सर्वांनी परतीची वाट धरली.

... पण अजूनही त्यांचे हाल संपलेले नव्हते!

बीची बेटांवरुन निघाल्यावर ब्रेडलबेन बर्फात अडकलं!

सर्व जहाजावरील खलाशांनी मिळून ते बर्फातून मो़कळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या काही उपयोग झाला नाही! अखेर सर्वांनी नॉर्थ स्टार आणि फिनीक्सवर आश्रय घेतला. ब्रेडलबेनवरील सर्वांच्या नशिबाने या निर्णयाची वेळीच अंमलबजावणी करण्यात आली.

जहाजावरील शेवटचा माणूस नॉर्थ स्टारवर पोहोचल्यावर अवघ्या अर्ध्या तासात एक मोठा हिमखंड जहाजावर येऊन आदळला!

फिनीक्स आणि नॉर्थ स्टारवरून सर्वजण भयचकीत होऊन पाहत असतानाच ब्रेडलबेन नॉर्थवेस्ट पॅसेजच्या तळाशी गेलं!