Get it on Google Play
Download on the App Store

गंभीर विनोदी चर्चा

'विनोद विरंगुळे' एकदा सहज रस्त्याने जात होता.

एका एस. टी. डी. बुथवर तो अचानक थबकला. खिशात हात घालून पैसे आहेत का ते तपासले. अचानक आनंदला. बुथवर 'आनंद अवकाळे' बसला होता.

आनंदः काय रे विनोद! कसे काय? आज एकदम आनंदात? नाव विनोद असून तू नेहेमी गंभीर असतोस. आज आनंदी आहेस. ते कसे काय?

विनोदः तू जरा थांब. मला फोन करायचे आहेत.

असे म्हणून विनोद फोन करू लागला. आधी त्याने केरळ मध्ये फोन केला. नंतर तामिलनाडू, हैदराबाद, काश्मीर, दिल्ली, पुणे, मुंबई.. याप्रमाणे एकाही प्रदेशाला सोडले नाही. सगळ्या ठीकाणी फोन केलेत. आनंद दु:खात बुडाला, कारण एवढे सगळे फोन केल्यावर विनोद पैसे देईल का ती शंका त्याला येत होती. पण यावेळेला विनोद आनंदचे ऐकेनासा झाला.

विनोदः वा वा वा! काय सोय केली आहे शासनाने. मजा आली. मी तामीलनाडू च्या एयरपोर्ट्वर, हैदरावाद च्या माझ्या मित्राला, असे सगळे फोन आज शासनामुळे करू शकलो.

असे म्हणत त्याने आनंद समोर एक रुपया टिकवला.

आनंदः हे काय? एक रुपया? फक्त? अरे शंभर रुपये झालेत.

विनोदः शंभर रुपये कसले? तू या फोनसमोर काय सूचना लावली आहेस? वाचः एक रुपयात संपूर्ण भारतात बोला. मी पूर्ण भारतात बोललो. हा घे एक रुपया.

आनंद: अरे असे शब्दशः अर्थ घेतल्याने त्याचे अनर्थ होतात बाबा. चल दे शंभर रुपये. नाहीतर मी एक रुपयात पोलिसांना बोलावीन.

विनोदः (शंभर रुपये आनंदला देत म्हणाला) अशा दुकानासमोर पाट्या लावायच्या आनी गिऱ्हाईकांना फसवायचे हे बरोबर नाही. मी तक्रार करीन. ग्राहक मंचाकडे. चल येतो आता.

विनोदने चर्चाला आपल्या मोबाईलवरून फोन लावला:
"चर्चा. लवकर निघून ये. मी एक रूपयात संपूर्ण भारतात बोलायचा नादात शंभर रुपये घलवून बसलो. आता माझेजवळ घरी जायला पैसे नाहीत. तू प्लीज पैसे घेवून ये "

त्या प्रसंगानंतर विनोद बाईकवरून चर्चासोबत जात होता. रस्त्याने त्यांना त्यांचा जिवलग मित्र गंभीर विचारे भेटला. त्याने फक्त पॅण्ट घातलेली होती. बाकी शरीर उघडे होते. त्यावर मध्यभागी छातीवर लिहिलेले होते "गॅस संपला आहे." उजव्या हातावर लिहिले होते, "लाईट बील भरण्याची शेवटची तारिख ३१/०२/२००९", डाव्या हातावर एक भली मोठी यादी होती, "एक किलो कांदा, चार किलो बटाटे, मेथी, पालक, गाजर, वाटाणे" पोटावर लिहिले होते, "दोन सामोसे, चार वडा पाव, तीन पाव भाजी" आणि त्याचे चेहेऱ्यावर वैचारिक आणि सांसारिक अजीर्ण झाल्याचे भाव दिसत होते.

दर पाच मिनिटांनी मोबाईल वर त्याच्या बायकोचा फोन येत होता व ती त्याला सांगायची,"आरसा बघा" मग तो खिशातून आरसा काढून शरीरावर लिहिलेले बघायचा आणि आणखी त्याचा चेहेरा आक्रसायचा आणि पुन्हा तो आक्रसलेला चेहेरा आरशात पाहून तो पुन्हा गंभीर व्ह्यायचा.

लग्न होण्यापूर्वी कॉलेज जीवनात हा म्हणे बेस्ट कॉमेडीयन होता.... आणि त्याचे लग्न झाले. हसणे बंद झाले. असे म्हणतात की, त्याचे लग्नापूर्वी नाव 'हर्षल हसवे' होते, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी त्याने नाव बदलून गंभीर विचारे केले.

चर्चा ने गाडी थांबवली. म्हणाली, " अरे विनोद बघ. संसारात पडल्यावर असे होते. आपण कॉलेजमधले तिघे जीवलग मित्र. पण या गंभीर विचारे चे लग्न झाल्या पासून त्याचे हाल काय झालेत बघ. त्याने 'गजिनी' ला गंभीरपणे मनावर घेतलेले दिसते आहे."

विनोद : "अरे, गंभीर, थांब की! कुठे चाललास? "

गंभीर ने खिशातून आरसा काढला व डाव्या गालावर धरला, त्यावर बायकोची पाच बोटे उमटलेली होती व पाचही बोटांवर त्याने आज करावयाच्या कामांची यादी लिहिलेली होती.

गंभीर : "अरे मला घाई आहे. मला बरीच कामे करायची आहेत. मी सतत कामे विसरायला लागल्यावर बायकोने गजिनी बघून एक गोंदण मशीन विकत घेतले. आणि त्यानंतर ... असे माझे हाल झालेत.. तीच्या मते मला 'शॉर्ट टर्म मॅरेज लॉस' आणि ' लॉंग टर्म शॉपींग लॉस' झाला आहे."

चर्चा : 'लॉंग टर्म शॉपींग लॉस' ठीक आहे रे, पण हा 'शॉर्ट टर्म मॅरेज लॉस' काय भानगड आहे?

गंभीर : "त्याचे असे आहे की, मी बरेचदा रस्त्याने सुंदर मुलगी दिसल्यास, लग्न झाल्याचे विसरून जातो. त्याला माझ्या बायकोने हे नाव दिलेले आहे. आणि त्यासाठी ते मी विसरू नये म्हणून सुद्धा बरेच ठीकाणी गोंदलेले आहे..असो ..."

एवढ्यात त्याच्या बायकोचा फोन वाजला आणि तो घाबरून घाईघाईने बाजारात पळाला. त्याचे उघड्या पाठीवर लिहिले होते, "हरवल्यास खालील पत्त्यावर आणून देणे- पत्ता"

चर्चा आणि विनोद यांची हसून हसून पुरेवाट झाली. ते जावू लागलेत. चर्चा म्हणाली, "अरे तू गजिनी पाहिलास का? आमिरने काय बॉडी बनवली आहे त्यात! सुपर्ब"

विनोद : " हो पाहिला आहे"

चर्चा : " तोच चित्रपट जर का करण जोहरने किंवा चोप्रा कंपनीने बनवला असता तर त्याचे नाव काय असते माहिती आहे? "

विनोद : " काय? "

चर्चा : "रब ने बनादी बॉडी"

विनोद : "आणि जुन्या काळात हा चित्रपट बनला असता तर त्यातले गाणे काय असते सांगू:
"भूल गया सब कुछ, याद नही अब कुछ, हो हो हो, गजिनि ... ओ ओ ओ , मै आ राहा हू..."

विनोद आणि चर्चा घरी परतले. विनोद सोफ्यावर बसला. चर्चा किचनमध्ये जावून कॉफी बनवू लागली.

विनोदने टी. व्ही. सुरू केला. प्रथम एक न्यूज चॅनेल लागले-
"मीच खरा बातमीदार- परसो तक- टुमारो टाईम्स" नावाचे. हे चॅनेल हींग्लीश्मराटी होते.

ब्रेक झालेला होता. ब्रेकींग न्यूज देवून देवून बातमीवाचकांचा घसा दुखल्यामुळे थोडा ब्रेक त्यांनी घेतला होता. ब्रेक मध्ये जाहीराती लागल्या होत्या. मात्र खाली बातम्या सरकत होत्या.

एक बातमी सारखी परत परत येत होती-
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार आणि सोबत जाहिरात होती-
"काका टी - चाय पियो और जागो, सब लोग जागो. "

आणखी एक मातमी आली- विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी कोंडीत पकडले. आणि वर दुसरी एक जाहीरात सुरू झाली-
"केसांचा कोंडा आणि त्यामुळे होणारी कोंडी? - नो प्रोब्लेम - डोकेबाज खांदे शांपू लावा. "

बातमी - मंदी मुळे लाखो लोक बेकार. जाहीरात- बेकार हुये तो क्या? कार तो ले सकते हो. मॅनो कार. सस्ती कार. कार मे जाओ, इंटरव्ह्यू दो. लकी कार, इंटरव्ह्यू पास.

तेवढ्यात चर्चा कॉफी घेवून आली आणि विनोदला एक कप देत सोफ्यावर बसली.

चर्चा : "अरे, विनोद. आपल्या गंभीरला बरे व्हायला किती वेळ लागेल रे? "

विनोदः "का? काय झाले त्याला एवढे? "

चर्चा : "अरे बघितेले नाहिस का? आता आपल्याला भेटला होता तो? गजिनी मॅनिया झालाय त्याला. अरे, बरा होईल ना रे तो? "

विनोद : "अगं सोड गं. लग्न झाल्यावर, सगळ्यांचीच अशी स्थिती होते. सोड ती चिंता आणि कॉफी पी. "

चर्चा : "चॅनेल बदलव बरं. ब्रेक काय बघतोस? "

विनोदने चॅनेल बदलवले. "मीच माझा" नावाचे चारोळ्यांना वाहीलेले चॅनेल लागले.

हे चॅनेल चारोळ्यांना 'वाहीलेले" असल्याने एकेक कवी चारोळी वाचून झाल्यावर त्याची होडी बनवून चॅनेल-प्रायोजीत तळ्यात त्या होड्या "वाहावत" होते.

त्यात एक कवी एक गहन चारोळी हा प्रकार सादर करत होता,

"मी म्हणजे मी म्हणजे मीच!

माझा मीच अन मी माझा,

तू तुझा अन ती त्याची,

मग त्याचा तो तीचा कसा? "

या गहन चारोळीने सगळे श्रोते संमोहीत होऊन संभ्रमीत झाले आनी समाधिस्थ झाले.

त्या चारोळीचा अर्थ लावता लावता चर्चाला भोवळ आली.

विनोद : "चला थोडी झोप होवू देत हिची. तोपर्यंत निवांत चॅनेल बघतो. "

विनोदने चॅनेल बदलवले. "मी सिनेमा" नावाचे चॅनेल लागले. त्यात एक आडदांड हिरो व्हिलनला बुक्के लाथा मारत होता. मात्र व्हिलन गुदगुल्या झाल्यासारखा हसत होता. तवढ्यात ब्रेक झाला आणि गुदगुल्या नाशक पावडरीची जाहिरात लागली. कंटाळून विनोदने चॅनेल बदलवले. "लकी खडा, भाग्य बडा" नावाचे एक चॅनेल सुरू झाले.

त्यात एक माणूस सोफ्यावर बसून हातोडीने तुरुंगात खडी फोडल्याचे दाखवत होते. हातोडी खाली पटकून तो म्हणाला,

" मी असाच खडी फोडत होतो, तुरुंगात, तेवढ्यात मला खडी फोडता फोडता, एक खडा सापडला, तो मी बोटात घातला आणि काय चमत्कार मी... तेव्हापासून... "

पुढे ऐकण्याचे धैर्य न झाल्याने विनोदने टि. व्ही. बंद करायचा निर्णय घेतला.

गंभीर विनोदी चर्चा

Nimish Navneet Sonar
Chapters
गंभीर विनोदी चर्चा