कुमारी 'अखंडा बडबडकर' आणि मांजर
नमस्कार! दगडफेक आणि तोडफोड, जाळपोळ या विषयाला वाहिलेल्या आमच्या "विध्वंस माझा-२४ तास--चला विध्वंस करूया! (पाहूया!)" या वहिनीवर आपले स्वागत आहे.
भस्मापूर या तालुक्यात एका गावी कुकराबाई नावाच्या सासूने, कढईबाई नावाच्या एका सुनेस थप्पड मारली. ही खबर ऐकताच सराटाताई या सुनेच्या आईने एका थैलीत पाच किलो दगड भरून आणले आणि घरावर दगडफेक केली.... आमचा बित्तमबाज नावाचा एक प्रतिनिधी तेथे हजर आहे आणि हे चित्रिकरण करतो आहे. त्याला आपण विचारूया ...
निवेदक: " बित्तू , काय स्थिती आहे आत तेथे? " (समोरून आवाज नाही. फक्त बित्तू मान हलवतो) " बित्तू, झोपलास काय रे? मी काय विचारते आहे? "
बित्तू: " अं, आत्ता, पाचवा दगड मारून झालाय! तरीही कुकराबाई काही बाहेर येत नाही..मात्र तीची 'शिटी'वाजणं बंद झाल्यासारखी वाटतेय, सराटाबाई आल्याने."
निवेदक: " जरा प्रेक्षकांना नीट समजावून सांगशील? "
बित्तू: " म्हणजे असं की, याच सराटाताईने यापूर्वीही तलवार घेवून कुकराबाईची शिटी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी ती चक्क दगड घेवून आलीये. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक दहा अंकांनी घसरलाय."
निवेदक: " मग सरकार यावर काय पावले उचलणार आहे?"
बित्तू: " सरकार लवकरच सासू-सून हिंसाचारा बाबत एक कायदा करण्याच्या विचारात आहे. येथे जे लोक जमले आहेत, ते आता चाललेत शेअर घ्यायला. पण आज " कमाये तू.. या कमाये ना" आणि " थोडा नमक, थोडी शक्कर" हे दोन महत्त्वाकांक्षी चित्रपट रिलिज होत आहेत. तर लोकांना आता असा प्रश्न पडलाय की, ही दगडफेक बघायची, सिनेमाला जायचं की शेअर विकत घ्यायचे... तर आता मी लोकांनाच विचारतो, की ते काय करणार आहेत..?
माणूस१: " माझ्या मते जोपर्यंत सरकार लैंगिक शिक्षण अनिवार्य करत नाही, तोपर्यंत ही जाळपोळ, दगड फेक ही अशीच चालू राहाणार आणि शेअर बाजार असाच कोसळत राहाणार. मी तर चाल्लोय आता पिक्चर बघायला"
बित्तू: " खरे तर, कुकराबाई जी कंपनी चालवते त्या कंपनीचे शेअर आता ५०० रुपयांनी खाली आले आहेत. तुला काय वाटतं? "
माणूस२: " हो! दर वेळेला ही येते, आणि दगड मारते आणि शेअर कोसळतात."
(आता वेळ झालीये एका ब्रेकची! ब्रेकनंतर पाहूया आणखी बातम्या आणि स्पेशल रिपोर्टस ... पाहात राहा ... पाहातच राहा!)
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत! आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार, आमचा एक प्रतिनिधी मांजरीच्या हल्ल्यात जखमी झालेला आहे. त्याचे कव्हरेज करायला गेली आहे आमची एक प्रतिनिधी कुमारी 'अखंडा बडबडकर'
न्यूजरूमः " अखंडा, कसे काय झाले हे सगळे? "
अखंडाः " त्याचे असे झाले की, ही जी मांजर आहे ती कुकराबाईच्या स्वयंपाकघरात उंदराला शोधीत होती. तेवढ्यात कुकराबाईने मांजरीला हाकलले. कारण ती (कुकराबाई) अगोदरच संतापलेली होती, व कुकरची शिटी सराटाबाईला मारण्याच्याच तयारीत होती. तेवढ्यात उंदीर खिडकी बाहेर पळाला आणि त्यापाठोपाठ मांजरही! आणि सराटाबाईला मारलेली कुकरची शिटी सराटाताईने सराट्याने परतवून लावली. तेवढ्यात आमचा प्रतिनिधी खिडकीत चढून आत कुकराबाईची मुलाखत घेण्यास निघाला होता, तेव्हा त्याने ऐकले की कुकराबाईने सुनेला एका खोलीत बंद केले होते आणि ती दार उघडा असे ओरडत होती..तेवढ्यात त्या मांजरीला ती शीटी लागली आणि तीने जोरात "म्यांव" करत खिडकीबाहेरच्या आपला प्रतिनिधी बित्तूच्या तोंडावर उडी घेतली आणि बित्तू जमिनीवर आपटला! "
न्यूजरूमः "अरेरे, फारच वाईट झाले"
अखंडाः "बित्तू आता हॉस्पीटलमध्ये आहे"
न्यूजरूमः "बरं अखंडा, ह्या मांजरीबद्दल तू अधिक माहिती सांगू शकशील?कोठून आली ही मांजर? तीचे घर? तीचा पत्ता?"
अखंडाः "मांजरीचा तपास मी करणारच आहे. पण त्या उंदराबद्दल माहिती मिळाली आहे. हा उंदीर फार चालाख असून या मांजरीच्या हाती कधीच लागत नाही. तो एक किलोमीटरवर असलेल्या एका गोदामात राहातो अशी माहिती येथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितली आहे."
न्यूजरूम: "अखंडा, ब्रेकनंतर आपण बोलूच. तर दर्शकहो, आपण अखंडाशी बोलतच राहू... पण त्या आधी वेळ झालिये एका ब्रेकची.. पाहत राहा, पाहतच राहा, विध्वंस माझा!"
थोड्याच वेळात : आमच्या टिव्हीचा एक अभिनव एक्सक्लुजीव्ह खुलासा.
सनसनीखेज खुलासा -म्यांव, मियांव आणि मिहीयांव
एक मांजर करणार खुलासा.....
एक्सक्लुजीव्ह खुलासा.....
मांजर बोलणार.....
करोडो लोक ऐकणार...... पाहात राहा....
ब्रेकिंग न्यूज : "आज आपल्या स्टुडिओत आले आहेत, मांजर स्पेशालिस्ट म्यांजेश म्यांउकर. आणि आमच्या "मार्जारी आगलावे" या प्रतिनिधीने शेवटी त्या मांजरीचा ठावठीकाणा शोधला आहे, व तीला पकडून स्टुडिओत आणले आहे. इकडे कुकराबईला अटक झाली असून तीने यापुढे सुनेशी असे न वागण्याचे वचन सराटातईला दिले आहे. शेअर बाजार आता त्यामुळे वधारला आहे. आणि या नाट्यावर महेश मांजरेकर आता चित्रपट काढणार आहेत. आणि त्यात मांजरीची भूमिका करणार आहे, मल्लीका मांजरावत.तर आता आपण वळूया मार्जारीकडे. .नमस्कार मार्जारी! "
मार्जारी : "नमस्कार! "
निवेदीका उडी मारून मार्जारी जवळ येते व तीला प्रणाम करते.
निवेदीका : " तर मार्जारी, आधी आम्हाला सांग, कसे काय पकडलेस या मांजरीला?"
मार्जारी : "ती अशी पुढे आणि मी मागे, धावले, खुप धावले. जाळे टाकले. आणि पकडले. आली कचाट्यात."
निवेदीका : "धन्यवाद मार्जारी. आता आपण आपल्या स्टुडिओत बोलावले आहे, मांजर स्पेशालिस्ट म्यांजेश म्यांउकर यांना."
म्यांजेश : "नमस्कार. मी मांजर-दुभाषा."
निवेदीका : "आपण या मांजरीने केलेला खुलासा बघणारच आहोत. पण, त्या आधी आपण परिचय करून घेणार, मांजर स्पेशालिस्ट म्यांजेश म्यांउकर यांचा. तुमच्या लहानपणापासूनचा प्रवास सांगा. कसे तुम्ही या क्षेत्रात आलात?"
म्यांजेश : "माझे वडिल श्री. मांजरोबा मांजरसाळे हे कुक्कुट पालन करायचे. एकदा एका मांजरीने कोंबड्यांना घाबरवायला सुरुवात केली. त्यामुळे बऱ्याच कोंबड्या मेल्या आणि तेव्हा पासून माझे वडील मांजरींना व बोक्यांना वश करू लागलेत. मलाही सवय लागली. ते मांजरांना पाळू लागलेत व त्यांनावर विशिष्ट प्रोग्रामिंग करून इतरांच्या घरात ते सोडत असत. त्यामुळे त्या मांजरी घरी आल्यावर इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत. आणि वडिलांना त्यांची भाषा समजायला लागली आणि मलाही. वडिल गेले पण मी तेच करतो. मांजर-दुभाष्याचे काम!"
निवेदीका : "अक्षरशः भारावून गेले मी हे सर्व ऐकून. आता आपण जाणून घेवूया काय सांगतेय ही मांजर"
मांजर उडी मारून निवेदीकेच्या मांडीवर बसली व म्हणाली: " मेयांव, मिमी मयांव. मिमी मयांव. मे मयांव. म्योयांव.म्यांव! "
म्यांजेश : " ती म्हणतेय की त्या घरातील कुकराबाई नेहेमी त्या सुनेला त्रास द्यायची. तीच्या मुलाला सुद्धा सुनेजवळ जावू द्यायची नाही. "
मांजर : " मे मे म्या म्या म्यू म्यू मोएअऍव मियांव"
म्यांजेश : " ती म्हणतेय की तुमच्या या चॅनेलमुळेच कुकराबाईच्या सुनेला न्याय मिळाला. "
मांजर : " टॉमं जेऱ्यांव टॉम जेऱ्यांव... मी ख्यांव... म्यां..... व. म्याह्याव मिहियांव"
म्यांजेश : " ती म्हणतेय की त्या दिवशीचा उंदिर तीने खावून टाकला आणि तीचा आवडीचा प्रोग्राम आहे टॉम ऍण्ड जेरी "
निवेदीका : " चला तर. आताच आपण बघितलात- सनसनीखेज खुलासा -म्यांव, मियांव आणि मिहीयांव."
आणखी एक खुलासा : या मांजरीला आता अनेक जाहिरातींच्या ऑफर्स आल्यात. व आनिमल प्लॅनेटवर ती निवेदिका असणार आहे.
थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई).....
सळई नाही घेवू शकली जीव.....
यमाची सळई, साई माघारी पळवी......
एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी.