Android app on Google Play

 

यशाची प्रभावी दशसूत्री!!

 

आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!!
म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो.
खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल.
अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. जे मिळवायचे आहे त्याबद्दल दिवसभरात प्रयत्न करावेत. कर्म करत जावे. प्रत्येक दिवस हा चांगलाच दिवस असतो असे मनावर ठसवावे. कुठेतरी लिहून ठेवावे आणि मेंदूच्या एका कप्प्यात नेहेमीकरता जतन करून ठेवावे.
मोबाईल च्या फ्रंट स्क्रीन वर लिहून ठेवावे की - "Every day is a good day!"
2) रोज प्राणायाम आणि योगासने करावीत. जमल्यास सूर्यनमस्कार करा, विविध व्यायाम प्रकार करा किंवा सकारात्मक संगीत लावून तालबद्धतेने एकट्याने किंवा जमल्यास समुहात नाच करावा. तोही एक प्रकारचा व्यायामच होय.
3) रोज किमान अर्धा तास मौन बाळगावे आणि थोडे एकांतात चिंतन करावे. रोज एक वाईट सवय सोडण्याच्या दिशेने आणि एक तरी चांगली सवय अंगीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व थोडा तरी त्या दिशेने रोज प्रयत्न करावा. आणि स्वतःची कुणाशीच तुलना करू नये. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. आपल्या पूर्वीच्या आणि आजच्या सुधारणेत फक्त तुलना करावी.
4) रोज थोडे अंतर एकट्याने चालावे. शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात थोडा तरी वेळ चालत चालत घालवावा.
5) रोज आपल्या वाट्याला आलेले काम (कर्म) मनापासून करावे. आशा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास आणि धैर्य कधीही गमावू नये. इतर काहीही गमावले तरी हरकत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. आजच्या क्षणात पूर्ण जगावे मात्र भविष्याची जाणीव असू द्यावी.
6) रोज सकारात्मक सुविचार, पुस्तके, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत किंवा आॅडिओ टेप ऎकाव्यात.
7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे.
8) रोज चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवावे, हास्यविनोद करावा. त्यामुळे मन हलके होते.
9) रोज कुणाला तरी छोटीशी का होईना मदत करावी. कुणाला तरी रोज सकारात्मक प्रेरणा जरूर द्यावी.
10) प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी. त्यामुळे विसरलेल्या गोष्टी किंवा धागे किंवा एखादा मुद्दा ल्क्षात येतो. आपल्या समस्या व अडचणी या निसर्ग आणि दैवी शक्तींच्या हाती रात्रीपुरत्या सोपवून, दिवस कसाही गेला तरी जे दिवसभरात बरे वाईट घडले ते भविष्यातील चांगल्याची चाहूल होती असे समजून पुन्हा कृतज्ञतेने झोपून जावे.
वरच्या गोष्टींसाठी थोडा का होईना वेळ जरूर काढावा. मी सुद्धा या दहा गोष्टींत प्राविण्य मिळवले नाही किंवा सर्व गोष्टी अजून रोज करू शकत नाही पण प्रयत्न मात्र जरूर करत आहे. आपल्या मुलाना सुद्धा त्यांच्या कुमारावस्थेतच या गोष्टी शिकवा आणि शक्यतो सवय लावा.
 

यशाची प्रभावी दशसूत्री

Nimish Navneet Sonar
Chapters
यशाची प्रभावी दशसूत्री!!