Get it on Google Play
Download on the App Store

चोवीस चारोळ्या

(१) गुढीवाडव्याच्या शुभेच्छा

"चैत्र महिन्याशी करूया

पुन्हा मैत्र...

नव्या वर्षाचे रंगवूया

सुखद चित्र... "

(२) भूताच्या भूतकाळाचे भूत

भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!!

सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो

मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!!

भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो"

(३) 'विविधतेतील' कथित एकता

या देशाच्या 'विविधतेतील' कथित एकता...

सांगा बरे उरली आहे का आता?

स्वातंत्र्यापासूनच हा देश आहे म्हणतात धर्मनिरपेक्ष!

पण जन्मापासूनच जगतो प्रत्येकजण आरक्षणसापेक्ष!


(४) कोजागिरी? ( कोण जागतंय?)
चंद्राच्या साक्षीने मिळाली,

बासुंदीची मेजवानी...

कोजागिरीच्या रात्रीने लिहिली,

जागरणाची कहाणी...

(५) होळी

मिळून सारे करूया

दहशतवादाची होळी...

मग(च) साजरी करूया

आनंदोत्सवाची होळी...!


(६) बेकारी...

बेकारीला कंटाळून त्याने,

दहशतवादाची कास धरली.

त्याच्या मनातील रावणाने शेवटी,

मनातल्या रामावर मात केली.

(७) उपहासात्मक चारोळी: दहशतवाद्याचे रोजचे नवे शब्दकोडे : (सोडवा पाहू!) 

(शहरांच्या आद्याक्षरानुसार दहशतवादी एक कोड तयार करून त्याप्रमाणे क्रमाने स्फोट घडवून आणत... त्यावर ही चारोळी)

बी नंतर ए नंतर डी

दहशतवादी शिकवतो एबीसीडी

टांगले जातेय सुरक्षेच्या अब्रुचे लक्तर

सांगा बरं दहशतीचे पुढचे कोणते अक्षर ?
किंवा
सांगा बरं दहशतीचे पुढचे कोणते शहर?

(८) वेडी चारोळी...


एका वेड्याला शहाण्यांनी दगडं मारून पिटाळलं...

वेड्याचं शहाणं मन वेड्याला सांगू लागलं,

" या सगळ्या वेड्यांच्या जगामध्ये,

माझ्यासारख्या शहाण्यांना जगणं कठीण झालं "

(९) हे मात्र न कळे...! भाग एक

सौंदर्य असते म्हणतात बघणाऱ्यांच्या डोळ्यात...

प्रेम तर असते म्हणतात मात्र आंधळे!

मग 'सौंदर्याच्या प्रेमात' पडणाऱ्यांच्या डोळ्यात...

नेमके काय असते हे मात्र न कळे!
(१०) हे मात्र न कळे...! भाग दोन
एकमेकांवर 'आंधळेपणाने प्रेम' करणाऱ्यांच्या डोळ्यात...

नेमके काय असते हे मात्र न कळे!

फक्त डोळ्यांनी व्यक्त करायच्या या प्रेमात...

आंधळेपणाचे काय काम ते मात्र न कळे!

(११) मन .. असे आणि तसेही

मन म्हणजे-कल्पनाशक्तीचा उगम

आणि सुविचारांचा संगम..

त्याचसोबत- शैतानी शक्तींचा उगम

आणि विकारांचा संगम...

(१२) गूढ प्रेम!!

मध्यरात्री ती आली...

पायवाटेवर बसली, डोळ्यात 'त्या'ची अतृप्त आशा घेवून!

त्या रात्री 'तो'ही आला...

तीच्यासोबत यायला, स्वतःच्या जीवाला पारखा होवून!

(१३) स्वस्त शब्दकोश

महागाईने केले

जनतेला भलतेच त्रस्त

'स्वस्त' हा शब्दच केला

शब्दकोशातून फस्त

(१४) क्षणाचा सोबती - भाग एक


आपल्या दोन आयुष्यांचे

क्षण एकमेकांत मिसळून जाती

झालो मी तुझ्या आयुष्याच्या

प्रत्येक क्षणाचा सोबती

(१५) क्षणाचा सोबती - भाग दोन

एका क्षणी तुला पाहिले

क्षण तो खास अगदी

त्या क्षणी मिळाला क्षणाला

क्षणाचा सोबती
"प्रेमाचा" पाऊस

(१६) छंद मिलनाचा 

पावसाच्या संथ धारांमध्ये

मदनाच्या मंद वाऱ्यामध्ये

मादक गंध तुझ्या शरिराचा

लावी मनाला छंद मिलनाचा.

(१७) पाऊस सहवास 

पाऊस बरसला

सुगंध पसरला

सहवास बहरला

श्वास मोहरला

(१८) मिलनाचे संकेत 

पाऊस धारा बरसल्या

मनाच्या तारा जुळाल्या

इंद्रधनुष्य उगवले

त्याने मिलनाचे संकेत दिले

(१९) रंगत 

जसे, ऊनपावसाच्या खेळात

इंद्रधनुष्याची संगत

तसे, रुसव्या फुगव्याशिवाय

येत नाही प्रेमात रंगत

(२०) ती पाहा आली दिवाळी...

आशेच्या एका सकाळी...

ती पाहा आली दिवाळी...

घेवूनी प्रकाश ओंजळी...

लख्ख करूनी आभाळी...
(२१) आजकाल ...
आजकाल, खेळाडू अभिनय करतात

अभिनेते राजकारणात शिरतात

राजकारणी भ्रष्टाचारात मग्न असतात

देशासमोरचे प्रश्न तसेच रहातात

(२२) स्वातंत्र्य

स्वातंत्र्य मिळाले आपल्याला, नावापुरते

गरिबांच्या तोंडाला मीठही नाही, चवीपुरते

(२३)

मैत्रीदिनाशी मैत्री करा,

मैत्रीशी मैत्र धरा!

मित्रांच्या हृदयात घर करा,

मैत्रीच्या शब्दार्थाला सर करा! 



(२४)

सूर्य गारठला, चंद्र विझला

जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला...

तारे हरपले, अवकाश संपले,

जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले..


सर्व चारोळी लेखन- निमिष सोनार, पुणे

चोवीस चारोळ्या

Nimish Navneet Sonar
Chapters
चोवीस चारोळ्या