Android app on Google Play

 

किंमत कशी ठरते ?

 

एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते ? प्रश्न सोपा वाटला तरी प्रचंड क्लिष्ट आहे. लोकांना वाटते कि जो माणूस वस्तू विकतो तो किंमत ठरवतो. जर ते खरे असते तर आज भारतांत एका फोन कॉलची किंमत १ रुपया नसती तर १०० रुपये असती. वोडाफोन, एयरटेल इत्यादी कंपनींना आपल्या विषयी प्रेम वाटते म्हणून म्हणून त्यांनी दर कमी केले नाहीत. तर मग सरकारने त्यांना जबरदस्तीने दर कमी करायला लावले आहेत ? अजिबात नाही. उलट जिथे जिथे सरकार दर ठरवण्याचा पर्यंत करते तिथे मालाचा दर्जा अत्यंत खाली असतो आणि कधी कधी किंमत सुद्धा प्रचंड असते. उदाहरणार्थ पेट्रोल, डीसेल चे दर सरकार ठरवत असल्याने ते फार महाग आहे, रेल्वे बसचे दर सरकार ठरवते आणि तिचे प्रचंड गर्दी आणि फार कमी दर्जाची सेवा उपलब्ध असते. ह्या उलट जिथे जिथे सरकारी हस्तक्षेप कमी असतो उदाहरणार्थ टेलिकॉम, मोबईल फोन्स, गाड्या, दुचाकी, दूरदर्शन संच इत्यादी इत्यादी तेथे दर कमी असतात, अनेक दर्जाचा माल अनेक किंमतीत उपलब्ध असतो. श्रीमंत लोक ५२'' दूरदर्शन संच घेवू शकतात तर गरीब लोक 2 हजारांचा चीनी टीवी घेवू शकतात.

आम्ही आधीच्या उदाहरणात पाहिले कि अलीच्या दृष्टीने बकरीच्या दुधाची किंमत ० होती. पण गोपी साठी बकरीच्या दुधाची किंमत त्याच्या जीवा इतकी होती. कुठल्याही वस्तू किंवा सेवेची किमत ह्या प्रकारे प्रत्येक माणसा साठी वेग-वेगळी असते. म्हणूनच तर व्यापार करणाऱ्या दोन्ही माणसांचा फायदा त्यात होतो. समजा तुमच्या कडे एक वस्तू आहे. तुम्ही ती वस्तू कधीही दुसऱ्या कमी किंवा समान वस्तूच्या मोबदल्यात विकणार नाही. तुम्ही नेहमी ती वस्तू जास्त किमतीच्या वस्तूच्या मोबदल्यात विकणार. पण त्याच प्रकारे जो माणूस तुमच्या पासून तुमची वस्तू विकत घेणार आहे त्याच्या साठी तुमच्याकडे असलेली वस्तू हि जास्त मौल्यवान असेल.

लोकांच्या दृष्टीकोनातून विविध वस्तूंची किंमत वेगळी असते हा व्यापाराचा प्रमुख नियम अहे. समजा तुम्हाला एक जीवघेणा रोग झाला. समजा क्ष नावाचे औषध जर तुम्ही घेतले नाही तर मृत्यू नक्की आहे. क्ष औषध बाजारांत १ लक्ष रुपयांना विकले जाते. आता तुम्ही ते औषध घेणार का ? जरी तुमची तितकी ऐपत नसेल तरी सुद्धा मित्र परिवाराकडून उधार घेवून तुम्ही आपला जीव वाचवाल. समजा  कंपनीने क्ष सारखेच दुसरे औषध ड बाजारात आणले ज्याची किंमत ५० हजार आहे तर तुम्ही कुठले औषध घ्याल ? नक्कीच ड.

ह्या प्रकारे कुठल्याही वस्तूची किंमत विकत घेणार्याच्या दृष्टीकोनातून ठरत असली तरी प्रत्यक्षांत ती विकत घेणार्या माणसाकडे काय पर्याय आहे ह्यावर अवलंबून असते.

म्हणजेच जेंव्हा पर्याय मृत्यू होता तेंव्हा तुम्ही उधार घेवून सुद्धा क्ष औषध विकत घेतले असते. म्हणजे तुमच्या दृष्टीकोनातून क्ष औषधाची किंमत १ लाखां पेक्षा जास्त होती. पण ज्या क्षणी दुसरा पर्याय उपलब्ध झाला त्या क्षणी तुम्ही क्ष औषध विकत घेण्यास नकार दिवून ड हे औषध घेतले म्हणजेच क्ष औषधाची किंमत तुमच्या दृष्टीने फार तर ५० हजार झाली. कारण आता पर्याय मृत्यू नसून ५० हजारांचे औषध हा पर्याय होता.

मानवी स्वभाव हा विचित्र असतो. तुम्ही जरी ५० हजारांचे औषध घेवून आपला अमुल्य जीव वाचवला तरी तुम्ही ५० हजार एक औषधासाठी फार महाग आहे हो अशी तक्रार करण्यास नेहमीच पुढे असाल पण प्रत्यक्षांत ती औषध कंपनी तुमचा जिव वाचवून तुमच्यावर उपकार करत असते थोडक्यांत ५० हजारांचे औषध घेवून जसा औषध कंपनीचा फायदा होतो तसा तुमचाही प्रचंड फायदा होत असतो.

आता त्या क्ष औषध विकणाऱ्या कंपनीचे काय? बाजारांत दुसर्याने ड हे औषध आणणाऱ्या कंपनीने त्यांचा धंदा साफ बुडवला आहे. आता त्या कंपनी पुढे दोन पर्याय आहेत. एक तर किमत १ लाखच ठेवून १००% नुकसान करून घ्यायचे किंवा किंमत ५० हजारांनी कमी करून ५०% नुकसान करून घ्यायचे. बहुतेक वेळा कंपनी आपले दर कमी करून कमी नुकसान करून घेण्याचा निर्णय करते.

ह्या प्रकारे बाजारातील स्पर्धेमुळे दर कमी किंवा जास्त होतात. ह्या उदाहरणातून आणखीन एक निष्कर्ष निघतो. तो म्हणजे एखाद्या वस्तुचा दर आणि ती वस्तू निर्माण करण्यासाठी येणारा खर्च ह्यांत काहीही संबंध नसतो. समजा क्ष हे औषध निर्माण करण्यासाठी ५ रुपये खर्च येतो तरी सुद्धा ती औषध कंपनी ते औषध १ लाख रुपयालांच विकेल कारण विकत घेणार्यापुढे मरण हा दुसरा पर्याय असतो. म्हणजे कंपनीचा फायदा ९९९९५ इतका होता. काही लोकांना हा नफा फार जास्त वाटला तरी प्रत्यक्षांत तुमचा फायदा जास्त झाला कारण आपला जीव अमुल्य आहे. आपल्या जीवापुढे ९९९९५ हि किंमत काहीच नाही.

पण प्रचंड फायद्याचा एक सायीड इफेक्ट आहे तो म्हणजे प्रचंड फायदा सर्वांनाच हवा असतो. क्ष कंपनीला इतका फायदा होतो हे लक्षांत आल्या नंतर ताबडतोब इतर सर्व कंपन्या हेच औषध निर्माण करण्यासाठी धाव घेतात. आणि वरील उदाहरणा प्रमाणे किमती धडा धड पडू लागतात. भारतीय दूरसंचार क्षेत्रांत हेच झाले म्हणून तर किमती आज अगदीच खालच्या थराला पोचल्या.

पण किमती खाली जातात इतकेच नाही तर दर्जा सुद्धा सुधारू लागतो. फायदा जास्तीत जास्त कसा होयील ह्या विचारांत विविध कंपन्या अनेक क्लुप्त्या लढवितात आणि त्यांत शेवटी  ग्राहकाचा फायदा होतो.

समजा क्ष औषध करण्यासाठी कॅल्सीयम हे द्रव्य लागते. कॅल्सीयम हे खाणीतून काढले जाते. एखादी कंपनी फायदा वाढविण्याच्या नादात समुद्रातून कॅल्सीयम कमी दरात काढण्याचा शोध लावते. ह्या मुळे ज्या ज्या क्षेत्रांत कॅल्सीयम वापरले जाते तिथे तिथे दर कमी होतात.

दर कमी होण्यासाठी ह्या प्रकारे ३ गोष्टी आवश्यक असतात.
१. दर ठरवण्याचा अधिकार विक्रेत्याला असला पाहिजे.
२. एका पेक्षा जास्त विक्रेत्यांना एखादी वस्तू किंवा सेवा विकण्याचा अधिकार असला पाहिजे.
३. ग्राहकाला वाट्टेल तिथून एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्याचा अधिकार असला पाहिजे.

ह्या तिन्ही गोष्टी जिथे जिथे आहेत तिथे तिथे दर नेहमीच पडतात आणि वस्तू किंवा सेवेचा दर्जा वाढत जातो.

प्रश्न: आपल्या बुद्धी साठी:

- सध्या सरकार रिक्षा आणि टेक्सी चे दर ठरवते, त्या शिवाय कोण हे व्यवसाय करू शकतो हे सुद्धा सरकार ठरवते. ह्यामुळे नक्की कुणाचे नुकसान होते ? समजा आम्ही प्रत्येक रिक्षा चालकाला त्याचे दर ठरविण्याची मुभा दिली तर समाजाला त्याचा फायदा होयील कि नुकसान ?

- एके काळी सरकार चित्रपटग्रहां च्या तिकिटाचे दर ठरवत होते. त्या काळी ब्लेक मध्ये तिकिटे विकली जायची. मागील १० वर्षा पासून सरकारने तिकिटांचे दर ठरवणे बंद केले आणि चित्रपटग्रह मालकांना त्यांना वाट्टेल ते दर ठरविण्याची मुभा दिली. ह्या मुळे भारतीय चित्रपट सृष्टीला आणि दर्शकांना फायदा झाला कि नुकसान ?

- तुम्ही जो व्यवसाय करता तिथे सरकार तुमच्या कामाचा मोबदला ठरवते काय ? समजा सरकाने तुमच्या ग्राहकांच्या रक्षणासाठी तुमच्या कामाचा मोबदला ठ्रावानियास सुरुवात केली तर तुम्हाला फायदा होयील कि नुकसान ?

पुढील भागांत आम्ही सरकार आणि किमंत ह्या विषयावर चर्चा करू. सरकारने शेतकर्यांना आधारभूत किंमत दिल्याने कुणाला फायदा होतो. शाळांची फी सरकारने ठरविल्याने कुणाला फायदा होतो इत्यादी प्रश्नाचा शोध घेवू.

तुम्हाला जर ह्या लेखमाले विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला +९१९१६८५७७६५७ वर whatsapp करू शकता.