Get it on Google Play
Download on the App Store

गाव

कुटुंबाच्या आदमुसल्या दमाने
अन झरनाऱ्या घामाने
घरचा पोरगा शिक्षण घेतो,
आधी करतो
परिवर्तनाचा जयघोष
विषमतेविरुद्ध आक्रोश.
बाबासाहेबांच्या आधाराने
तो साहेब होतो
आणि गावाला कायमचा निरोप देतो.
आजन्म घामात भिजलेली
अन फाटक्या गोधडीत निजलेली
माय त्याची वाट पाहते.
मोडक्या कुडांना आधार देता देता
बाप मोडून पडतो,
तो मात्र बिझी असल्याचा निरोप धाडतो.
त्याची शिकलेली बायको
गावात येत नाही,
अन सोफीस्टीकेटेड नातवंड
आजीचे नावही घेत नाही.
सुख दु:खाच्या
एखाद्या अनिवार्य प्रसंगी
लाजी खातर तो गावात येतो
तुटलेल्या सवंगड्याच्या
फाटलेल्या जिंदगीवर
तो मारतो शेरा
अन उगाच मिरवतो
शहरात बांधलेल्या बंगल्याचा तोरा
तेंव्हा बाजूच्या बुढयाला
बोलण्याची उबळ येते
सात्विक संतापाने त्याचे ओठ हलते
जणू त्याच्या वाणीने सारेच गाव बोलते.
आगा, गावाच्या घराचे जरा हाल पाय
मजुरी करत जगते तुही थकलेली
माय..
जवान बहिण आणखी उजवाची हाये.
कर्जाचे सारेच उखीर बुजवायचे हाये.
तुह्यासाठीच सुटली तुह्या भावंडाची
शाळा..
आन पुतण्याच्या हाती आला
निन्द्ण्याचा इळा..
सोपं असतं गड्या देणं
समतेवरचं भाषण,
तुमच्या सारख्या आवलादीनच
हा मोहला झाला मसन.
आरे, परिस्थितीन आमी
कफल्लक असलो तरी
बाबासाहेबाच्या इचाराचे
सच्चे पाईक हाओत,
आन तुमचा आवाज मोठा करणरे
आमीच माईक हाओत...
कवी- हेमंतकुमार कांबळे
('गाव' या दीर्घ कवितेतून)
धन्यवाद- प्रशांतजी वंजारे सर