Get it on Google Play
Download on the App Store

तर तुमच्या जागी माझे नाव घालीन

एक सौदागर अकबर बादशहाकडे गेला. त्याने नेलेले उत्कृष्ट जातीचे दाहीच्या दाही घोडे बादशहाला अतिशय आवडल्याने, त्याने ते खरेदी केले, आणि तशाच तऱ्हेचे आणखी दहा घोडे आणण्यासाठी त्या सौदागराला दहा हजार रुपये दिले. बिरबल हा प्रकार निमूटपणे पाहत होता. सौदा झाल्यावर तो सौदागर तिथून निघून गेला आणि अकबर व बिरबल यांच्यात इतर गप्पागोष्टी सुरु झाल्या.
गप्पांच्या ओघात दिल्लीच्या एका मूर्ख माणसाच्या मुर्खपणाचा विषय निघाला असता बादशहा म्हणाला, 'बिरबल, आपल्या राज्यातल्या अशा वेचक मुर्ख माणसांची यादी तुला सवडीप्रमाणे करुन ठेवता येणे शक्य आहे का ?'
बिरबल म्हणाला, 'का नाही तयार करता येणार ? अवश्य येईल. त्यातून मी तर म्हणतो अशा म्हत्त्वाच्या गोष्टीला विलंब कशाला लावायचा ? मी आत्ताच त्या कामाला हात घालतो.' असं म्हणून व एक कागद व लेखणी घेऊन बिरबलानं विचार करुन सुचतील ती विस पंचवीस नावं लिहून काढली. उत्कंठेपोटी बादशहानं ती यादी पाहिली असता, त्याला आपले नाव पहिल्या क्रमांकावर झळकत असल्याचे दिसले. रागानं लालबूंद होऊन बादशहानं विचारलं, 'बिरबल, या मुर्खांच्या यादीत माझं नाव आणि तेही पहिल्या क्रमांकावर लिहिण्याचं काय कारण ?'
बिरबल म्हणाला, 'तो घोडे विकायला आलेला सौदागर कोण, कुठुन आला, त्याचं नाव व पत्ता काय, त्याला इथे ओळखणारे कुणी आहे की नाही, यापैकी कशाकशाचीही चौकशी न करता, त्याला आपण आणखी दहा घोडे आणून देण्यासाठी दहा हजार रुपये दिलेत, म्हणून या यादीत मानाचं पहिलं स्थान आपल्याला दिलंय.'
या उत्तरानं खजील झालेल्या अकबरानं विचारलं, 'पण असं समज, की त्याने दहा घोडे मला आणून दिले तर ?'
बिरबल म्हणाला, ' ती शक्यता नाही खाविंद. त्यातूनही त्याने ते आणून दिलेच, तर या यादीतील आपलं नाव खोडून, त्या जागी मी माझं नाव लिहिन.'