Get it on Google Play
Download on the App Store

महामानवी कवटी

जॉर्डन आणि डॉ.एरिक यांच्या अथक परिश्रमानंतर देखील ती महामानवी कवटी तेथून बाहेर निघत नव्हती.

"इथे ऊर्जा वाया घालवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आणखी माणसांची मदत घ्यावी लागेल." जॉर्डन मातीने माखलेले हात झटकत म्हणतात, "मिडियाला फोन करून बोलवूया." असं म्हणत तो मिडीयाला फोन लावतो. अँजेलिना त्यांना मध्येच अडवते.

"काय झाल? फोन लावतोय मी." जॉर्डन विचारतात.

"सर, इतक्यात मिडियाला बोलावणं योग्य नाही. आता तर आपण सुरुवात केली आहे. माहित नाही पुढे काय वाढून ठेवलं असेल. एका ठराविक निष्कर्षावर पोहोचल्याशिवाय आपण या गोष्टी उघड करु शकत नाही." अँजेलिना म्हणते.

"आपल्याला प्राचीन लिपी मिळाली आहे, मानवी वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. हेच काय तर प्रचंड मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली आहे. अजून कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं आहे?" जॉर्डन जरा खेसकतच तिला विचारतो.

"सॉरी सर, पण आपण गुप्त मोहिमेवर आहोत. बाहेर जर या मोहिमेबद्दल समजलं तर..."

अँजेलिनाला मध्येच अडवत जॉर्डन म्हणतो, "बाहेर जर या मोहिमेबद्दल समजलं तर एक नविन शोध लावला म्हणून आपलं नाव होईल. गेली ३५ वर्षे मी या क्षणाची वाट पाहतोय, ही संधी मी सोडणार नाही. आणि कुठली गोष्ट कधी आणि कुणाला सांगायची हे मी ठरवेन."

जॉर्डनच्या डोळ्यात लोभ दिसत होता. कुणाचही काही न ऐकता तो मिडियाला फोन लावतो. जॉर्डनची ही सवय सगळ्यांना माहीत असते. तो सगळ्यांपेक्षा जास्त अनुभवी असल्याने देखील कुणी काही बोलत नाही. जोर्डनचं संपूर्ण आयुष्य मानवी पूर्वजांच्या शोधात गेलं होतं. त्याने युरोप, कॅनेडा, आफ्रिका आणि उत्तर आशिया खंडात अनेक शोध लावले होते. पुरातत्त्व विभागात त्याचं मोठं नाव होतं आणि म्हणूनच भारत सरकारने ही जबाबदारी जोर्डनवर सोपवली होती.

गुहेमध्ये अंधार असल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने सगळे तिथून बाहेर निघतात. अँजेलिनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं. ती कसल्यातरी विचारात असते. डॉ एरिक अँजेलिनाला काही विचारणार इतक्यात जॉर्डन आतमधून धावतच बाहेर येतो. डॉ.अभिजीत त्याला काय झालं म्हणून विचारतो तेव्हा दिर्घ श्वास घेत जॉर्डन म्हणतो,

"तिथे आतमध्ये मिडियाबरोबर बोलत असताना मी त्या कवटीकडे पहिलं तर ती कवटी जागेवर नव्हती. इकडेतिकडे बघितलं तरी काही दिसलं नाही आणि मला कसलातरी आवाज आला. खुप विचित्र आवाज होता तो." भराभर बोलून जॉर्डन एकदम गप्प बसतो.

"इतकी मोठी मानवी कवटी अचानक कुठे जाणार?" असं बोलून इम्रान डॉ. अभिजीत आणि डॉ. एरिक यांच्यासह आत जातो.

अंधारात सगळीकडे पाहिल्यावर त्यांना हाती काही लागत नाही. ज्या ठिकाणी ती अतीप्रचंड कवटी होती त्या ठिकाणी एक मोठी पोकळ होती. डॉ. अभिजीत त्या पोकळीमध्ये जातो. त्याच्याही आत अंधुक प्रकाशात त्याला एक मंच दिसतो. सोबत असलेला टॉर्च घेऊन तो समोरील मंच स्पष्टपणे बघण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन इम्रान आवाज देतो.