Get it on Google Play
Download on the App Store

संतांचा मानवधर्म 20

विष्णुवीर गाढे
कळिकाळ पाया पडे

आम्ही विष्णूचे वीर, कळिकाळही आमच्या पाया पडेल. कारण ज्याने आसक्ति जिंकली, वासना-विकार जिंकले त्याला मरणाची डर कुठली? मृत्युला पाहून तो हसतो, मृत्युचे तो स्वागत करतो.

आपुले मरण पाहिले म्यां डोळा
तो सुखसोहळा अनुपम


असे धन्योदगार ते काढतात. मृत्युने मारण्यापूर्वीच ते देहाला मारून ठेवतात. मृत्युवर ते स्वार होतात. देहावर विजय मिळवून निर्मळ मनाने हे संत मग जगाची सेवा करीत राहतात.

तुका म्हणे आतां
उरलो उपकारापुरता


देह गळेपर्यंत आता लोकांची सेवा होईल ती करायची. जीवनात कसे वागावे?

आणिकांचे कानी, गुणदोष मना नाणी
बोले ते वचन, जेणे राहें समाधान
तुका म्हणे फार, थोडा करी उपकार ॥


दुसर्‍या चे गुणदोष मनात न आणता आपले कार्य करीत राहावे. दुसर्‍यांना जेणेकरून समाधान होईल असे बोलावे. थोडाफार उपकार करावा, असे सूत्रमय सार आहे.

परंतु हजारो अभंगातून निवडानिवड काय करायची? तुकारामांच्या अभंगावर आणि ज्ञानेश्वरांच्या ओवीवर सारा महाराष्ट्र पोसला गेला आहे. ज्याला तुकारामाचे चार अभंग येत नाहीत असा मनुष्य महाराष्ट्रात आढळणार नाही. महाराष्ट्रात हजारो ठिकाणी भजने होतात. 'रूप पाहतां लोचनी' वगैरे शेकडो अभंग तेथे गायिले जातात. संतांनी महाराष्ट्राला संस्कृतीच्या समान पातळीवर आणिले. उच्च विचार सोप्या भाषेत घरोघर नेले. ग्यानबा-तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे वाङमय हे खरे राष्ट्रीय वाङमय कारण ते सर्व थराथरांत गेले. मोरोपंतांची आर्या व वामनी श्लोक पांढरपेशी लोकांत व हरदासात, परंतु आम जनतेत तुकोबांची वाणी गेली. न्यायमूर्ति रानडे, डॉ. भांडारकर यांच्यासारखे नव विद्वान प्रार्थना समाजात तुकारामांचे अभंग घेऊनच किर्तने करीत व खेडयातील कीर्तनकार तेच अभंग घेऊन विवरण करतात.

तुकारामाच्या अभंगात प्रसाद आहे, कळकळ आहे. स्वानुभाव आहे. ते रोकडे बोल आहेत. ते चावट बोल नाहीत. त्यांच्या अभंगात परिचयाचे दाखले. रोजच्या व्यवहारातील उपमा नि द्दष्टांत. कधी कधी त्यांची वाणी कठोर वाटते, ती वाणी कवचित् शिवराळ होते. विनोबा म्हणाले, ''तुकारामांचा आईचा गुण असा वेळेस प्रगट होतो.'' आईच मुलावर रागावते. त्यांच्या त्या कठोर, कधी शिवराळ वाटणार्‍या वाणीत त्यांची अपार करुणा आहे, त्यांचे वात्सल्य आहे.

शाळा

निनावी
Chapters
संतांचा मानवधर्म 20 शाळा माझी – शाळा बोकीलांची !!!