Get it on Google Play
Download on the App Store

श्रीविष्णूची कहाणी

ऐका परमेश्वरा महाविष्णु, तुमची कहाणी.

काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी, बावन आड. तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे. काय करतो? सकाळी उठतो, स्नानसंध्या करतो, विभूतीचं लेपन करतो, तिबोटी लंगोटी घालतो. खांदी कुर्‍हाड घेतो, वनात जातो. वनाचीं फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पांच भाग करतो. देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गाईला देतो, उरलंसुरलं आपण खातो. असं करतां करतां नखं रुपलीं, बोटं खुपलीं, अंगीं रोम वाढले, मस्तकीं जटा वाढल्यां. अठ्याऍंशीं सहस्त्र वर्षं तपास भरलीं. एवढं तप कुणा कारणें करतो? महाविष्णु भेटावा याकारणें करतो.

कपोत-कपोती एका वृक्षावर बसलीं होती, तीं त्याला विचारूं लागलीं “भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणीं तर चालतोस, मुखीं तर वदतोस. एवढं तप कोणाकारणें करतोस?” “महाविष्णु भेटावा याकारणें करतों.” शेषशयनीं, सुवर्णमंचकीं, महाविष्णु निजले होते. तिथं येऊन कपोत-कपोती सांगूं लागलीं-

“काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी, बावन आड. तिथं एक सप्तक्या ब्राह्मन तप करीत आहे. काय करतो? सकाळी उठतो, स्नानसंध्या करतो, विभूतीचं लेपन करतो. तिबोटी लंगोटी घालतो. खांदीं कुर्‍हाड घेतो. वनास जातो. वनचीं फळें आणतो, त्याचा उत्तम पाक करतो. त्याचे पांच भाग करतो. देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गाईला देतो, उरलंसुरलं आपण खातो, असं करतां करतां नखं रुपलीं, बोटं खुपलीं, अंगीं रोम वाढले, मस्तकीं जटा वाढल्या, अठ्याऍंशीं सहस्त्र वर्षे तपास भरलीं. एवढं तप कोणाकारणें करतो? महाविष्णु भेटावा याकारणें करतों.”

महाविष्णु बरं म्हणाले. झटकन उठले. पायीं खडावा घातल्या. मस्तकीं पीतांबर गुंडाळला. ब्राह्मणाजवळ उभे राहिले. “भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणीं तर चालतोस, मुखीं तर वदतोस, एवढं तप कोणाकारणें करतोस?” ‘ महाविष्णु भेटावा याकारणें करतों.” तेव्हां महाविष्णु “तो मीच”असं म्हणाले. “कशानं भेटावा? कशानं ओळखावा?” “असाच भेटेन, असाच ओळखेन.” शंख-चक्र-गदा-पद्म-पीतांबरधारी अयोध्याचारी माघारीं वळला, तों महाविष्णूची मूर्त झाली.

“भल्या रे भक्ता, शरणागता, राज्य माग, भांडार माग, संसारीचं सुख माग.” “राज्य नको, भांडार नको, संसारीचं सुख नको, तुझं माझं एक आसन, तुझी माझी एक शेज, तुझी माझी एक स्तुति.” कुठं करावी?” देवाद्वारीं, भल्या ब्राह्मणांच्या आश्रमीं.” असं त्याला एकरूप केलं.

महाविष्णूची कहाणी ऐकती, त्यांची किल्मिष पातकं हरती. नित्य कहाणी करती, त्यांना होय विष्णुलोक प्राप्ती. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: जो सद्धर्मानें वागतो व सत्कर्म करण्यांत आपलें आयुष्य घालवितो त्याला अखेर देव भेटल्याशिवाय राहात नाहीं.

व्रतांच्या कथा

संकलित
Chapters
गणपतीची कहाणी महालक्ष्मीची कहाणी श्रीविष्णूची कहाणी नागपंचमीची शेतकर्‍याची कहाणी नागपंचमीची कहाणी सोमवारची शिवामुठीची कहाणी सोमवारची खुलभर दुधाची कहाणी सोळा सोमवाराची कहाणी सोमवारची फसकीची कहाणी सोमवतीची कहाणी सोमवारची साधी कहाणी मंगळागौरीची कहाणी शुक्रवारची कहाणी शुक्रवाराची जिवतीची कहाणी शनिवारची मारुतीची कहाणी संपत शनिवारची कहाणी आदित्यराणूबाईची कहाणी बोडणाची कहाणी वसूबारसेची कहाणी ललितापंचमीची कहाणी श्रीहरितालिकेची कहाणी ज्येष्ठागौरीची कहाणी ऋषिपंचमीची कहाणी पिठोरीची कहाणी दिव्यांच्या अंवसेची कहाणी धरित्रीची कहाणी गोपद्मांची कहाणी पांचा देवांची कहाणी वर्णसठीची कहाणी बुध-बृहस्पतींची कहाणी शिळासप्तमीची कहाणी