संपादकीय

नमस्कार,

टेक मराठीचा पहिला ई-दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना आम्हांस आनंद होत आहे.

नुकत्याच झालेल्या यशस्वी मंगळ मोहिमेमुळे भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे हे जगाला समजले. संरक्षण, राज्यकारभार, वैद्यकिय सेवा, दळणवळण इत्यादि सर्व देशपातळीवर मह्त्वाच्या ठरणाऱ्या क्षेत्रामध्येही आपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या प्रगतीचा वेग अपेक्षेप्रमाणे आहे का किंवा तो अधिक चांगला असण्याच्या दृष्टीने काय करायला हवे होते हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल. पण एक मात्र खरं की मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण यामुळे सामान्य लोकांपर्यन्त तंत्रज्ञान पोहोचण्यास मदत झाली. यापुढची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे तंत्रज्ञानाचा परिणमकारक वापर. याबाबतीत आपल्याला सामान्य माणसांच्या पातळीवर एक दरी दिसून य़ेते. ही दरी भाषेमुळे निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञान आणि इंग्रजी हे एक समीकरण झालेले आहे. त्यामुळे “इंग्रजी नसेल तर तंत्रज्ञान नाही” अशी अवस्था आहे.