Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय १

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥

ॐ नमोजी जगद्‌गुरु उदारा ॥ श्रीमद्भीमातीरविहारा ॥ पुराणपुरुषा दिगंबरा ॥ ब्रह्मानंदा सुखाब्धे ॥१॥
तूं सकळश्रेष्‍ठ साचार ॥ तूंचि आदि मायेचा निजवर ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ तिघे पुत्र निर्मिले ॥२॥
अनंत ब्रह्मांडें त्यांहातीं ॥ तूंचि घडविसी जगत्पती ॥ सकळ देव वर्तती ॥ तुझिया सत्तेकरुनियां ॥३॥
तूंचि जाहलासी गजवदन ॥ चतुर्दश विद्यांचें भुवन ॥ महासिद्धि कर जोडून ॥ सदा तिष्‍ठती तुजपुढें ॥४॥
जय अनंतकल्याणवरदमूर्ती ॥ त्रैलोक्यभरित तुझी कीर्ती ॥ सुरासुर तुज नमिती ॥ श्रीगणपति दयार्णवा ॥५॥
अरुणसंध्यारागरत्‍नज्योती ॥ कीं उगवला बाळगभस्ती ॥ तैसी गणपति तुझी अंगकांती ॥ आरक्तवर्ण दिसतसे ॥६॥
कीं शेंदुरें चर्चिला मंदाराचळ ॥ परम तेज झळके सोज्ज्वळ ॥ विशाळ उदर दोंदिल ॥ माजी त्रिभुवन सांठवलें ॥७॥
दुग्धसमुद्रीं ओपिलें ॥ कीं निर्दोष यश आकारलें ॥ तैसें शुभ्र वस्त्र परिधान केलें ॥ ध्यानीं मिरवलें भक्तांच्या ॥८॥
विनायकरिपूचें कटिसूत्र ॥ तळपे विराजमान विचित्र ॥ जांबूनद सुवर्ण पवित्र ॥ त्याचे अळंकार सर्वांगी ॥९॥
जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ ॥ तैसा एक दंत झळकत ॥ कीं सौदामिनी लखलखित ॥ मेघमंडळावेगळी ॥१०॥
परशु अंकुश इक्षुदंड ॥ पाश गदा दंतखंड ॥ पंकज आणि कोदंड ॥ अष्‍ट हस्तीं आयुधें ॥११॥
गणपति तुझें नृत्य देखोन ॥ सदाशिव सदा सुप्रसन्न ॥ सकळ देव टाळ घेऊन ॥ उभे राहती नृत्यकाळीं ॥१२॥
धिमकिटि धिमकिटि तकधा विचित्र ॥ रागगौलता संगीतशास्‍त्र ॥ नृत्यकळा देखोनि देवांचे नेत्र ॥ पातीं हालवूं विसरले ॥१३॥
गंडस्थळींचा दिव्य आमोद ॥ त्यावरी रुणझुणती षट्‌पद ॥ सव्यभागीं देवांचे वृंद ॥ वाम भागीं दानव पैं ॥१४॥
अष्‍टसिद्धि चामरें घेऊनी ॥ वरी वारिती अनुदिनीं ॥ श्रृंगी भृंगीं मृदंगी दोनी ॥ वाद्यकळा दाविती ॥१५॥
सुरासुर पाहती नृत्यकौतुक ॥ जेथें जेथें तुटे थाक ॥ मान तुकाविती ब्रह्मादिक ॥ तालसंकेत देखतां ॥१६॥
हस्तसंकेत दावी गणपती ॥ तडित्प्राय मुद्रिका झळकती ॥ सर्व अळंकारांची दीप्ती ॥ पाहताम भुलती शशिसूर्य ॥१७॥
ऐसा तूं महाराज गणनाथ ॥ तुझें कोणा वर्णवे महत्त्व ॥ आरंभिला हरिविजयग्रंथ ॥ पाववीं हा सिद्धीतें ॥१८॥
जैसा अर्भक छंद घेत ॥ पिता कौतुकें लाड पुरवीत ॥ तैसी येथें पदरचना समस्त ॥ गजवदना पुरवीं तूं ॥१९॥
तुझें नाम घेतां गणपती ॥ विघ्ने बारा वाटा पळती ॥ जैसा प्रकटतां झंजामारुत ॥ जलदजाल वितुळे पैं ॥२०॥
मृगेंद्र येतो ऐकतां कानीं ॥ मातंगा पळतां थोडी मेदिनी ॥ कीं हरिनामघोष ऐकतां कानीं ॥ दूरी पळती भूतें प्रेतें ॥२१॥
कीं जागा देखोनि घरधनी ॥ तस्कर पळती तेच क्षणीं ॥ तैसें तुझें नाम घेतां वदनीं ॥ विघ्नें पळति गजवदना ॥२२॥
देवा तुझें स्तवन न करवे ॥ आकाशा गवसणी न घालवे ॥ जलनिधि कैसा सांठवे ॥ मुंगीचिया उदरांत ॥२३॥
पृथ्‍वीचें वजन न करी कोणी ॥ मुष्‍टीं न माये वासरमणी ॥ ब्रह्मांड विदारिता वायु बांधोनी ॥ पालवीं कोणा आणवे ॥२४॥
ऐसा तूं सिद्धिविनायक ॥ तुज दुसरा नसे नायक ॥ तुझ्या कृपेनें सकळिक ॥ शब्दब्रह्म आकळे ॥२५॥
आतां नमूं वागीश्वरी ॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी ॥ चहूं वाचांची ईश्वरी ॥ कमलोद्भवतनया जे ॥२६॥
अंबे तुझी कृपा जोडे ॥ तरी मुकाही वेदशास्त्र पढे ॥ तूं स्नेहें पाहसी पाषाणाकडे ॥ तरी तो होय महामणी ॥२७॥
मात तुझेनि वरदानें ॥ जन्मांधही पारखी रत्‍नें ॥ रंक ते होती राणे ॥ कृपेनें तुझ्या सरस्वती ॥२८॥
तूं कविमानसमांदुसरत्‍न ॥ सकल मातृकांचें निजजीवन ॥ अंबे तुझें चातुर्य देखोन ॥ रमा उमा लज्जित ॥२९॥
तुझें सौंदर्य देखोनि गाढें ॥ मन्मथ होवोनि राहिलें वेडें ॥ अष्‍टनायिका तुजपुढें ॥ अधोवदन पाहती ॥३०॥
तूं बोलसी जेव्हां वागीश्वरी ॥ दंततेजें झळके धरित्री ॥ तेथींचे खडे निर्धारीं ॥ पद्मराग पैं होती ॥३१॥
अंबे तुझे जेथें उमटती चरण ॥ तेथें लोळे वसंत येऊन ॥ त्या सुवासा वेधून ॥ भ्रमर तेथें रुंजती ॥३२॥
तुझ्या आंगींच्या सुवासेंकरुनी ॥ दाही दिशा गेल्या भरोनी ॥ परब्रह्मीं उठली जे ध्वनी ॥ आदिजननी तेचि तूं ॥३३॥
तप्तसूर्या जैसें सुरंग ॥ तैसें जननि तुझें सर्वांग ॥ पंकजनेत्र सुरेख चांग ॥ अधर बिंबासारिखे ॥३४॥
सरळ नासिका विशाळ भाळ ॥ कर्णीं ताटंकांचा झळाळ ॥ कीं शशि सूर्य निर्मळ ॥ कर्णीं येऊन लागले ॥३५॥
कर्णीं मुक्तघोंस ढाळ देती ॥ गंडस्थळीं दिसे प्रदीप्ती ॥ कीं नक्षत्रपुंज एकत्र स्थिती ॥ कर्णीं लागती शारदेच्या ॥३६॥
गळां मोतियांचे दिव्य हार ॥ शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र ॥ आपादमस्तकावरी समग्र ॥ दिव्य अलंकार झळकती ॥३७॥
आरुढली हंसासनी ॥ दिव्य वीणा हातीं घेऊनी ॥ आलाप करितां मधुर ध्वनी ॥ सुरासुर आयकोनि तटस्थ ॥३८॥
सुरासुर गण गंधर्व ॥ सिद्ध चारण मुनिपुंगव ॥ अंबे तुझ्या चरणीं भाव ॥ धरिती सर्व आदरें ॥३९॥
श्रीधर निजभावेंकरुन ॥ जननि तुज अनन्यशरण ॥ माझ्या जिव्हाग्रीं राहोन ॥ हरिविजयग्रंथ बोलवीं ॥४०॥
गणेशसरस्वतीचें स्तवन ॥ वदविलें जेणें दयेंकरुन ॥ तो ब्रह्मानंद श्रीगुरु पूर्ण ॥ त्याचे चरण वंदुं आतां ॥४१॥
तो ब्रह्मानंद पिता निश्चितीं ॥ सावित्री तयाची शक्ती ॥ ही तों आदिपुरुष मूळप्रकृति ॥ माता पिता वंदिलीं ॥४२॥
ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करुन ॥ वानप्रस्थही आचरुन ॥ संन्यासदीक्षा घेऊन ॥ त्रिविध आश्रम त्यागिले ॥४३॥
पंढरीये भीमातटीं ॥ समाधिस्थ वाळवंटीं ॥ पूर्णज्ञानी जैसा धूर्जटी ॥ तापसियांमाजी श्रेष्‍ठ ॥४४॥
ज्यासी बाळपणापासून ॥ परनारी मातेसमान ॥ परद्रव्य पाहे जैसें वमन ॥ आनंदघनस्वरुप पैं ॥४५॥
कामादिक षड्‌वैरी ॥ जेणें लोटोनि घातले बाहेरी ॥ ज्याच्या कृपावलोकनें निर्धारीं ॥ ज्ञान होय प्राणियां ॥४६॥
जें निस्सीम वेदांतज्ञान ॥ तें ज्यास करतलामलक पूर्ण ॥ वंदिले तयाचे चरण ॥ ग्रंथारंभीं आदरें ॥४७॥
गुरुपद सर्वांत श्रेष्‍ठ ॥ त्याहून नाहीं कोणी वरिष्‍ठ ॥ कल्पवृक्ष म्हणावा विशिष्‍ट ॥ तरी कल्पिलें पुरवी तो ॥४८॥
मातापितयांसमान ॥ जरी म्हणावा सद्‌गुरु पूर्ण ॥ ती उपमा येथें गौण ॥ न घडे जाण सर्वथा ॥४९॥
ज्या ज्या जन्मा जाय प्राणी ॥ तेथें मायबापें असती दोनी ॥ परी सद्‌गुरु कैवल्यदानी ॥ तो दुर्लभ सर्वदा ॥५०॥
जरी अनंत पुण्यांच्या राशी ॥ तरीच भेटी सद्‌गुरुसी ॥ नाहीं तरी व्यर्थ नरदेहासी ॥ येऊनि सार्थक काय केलें ॥५१॥
श्रीगुरुवांचोनि होय ज्ञान ॥ हें काळत्रयीं न घडे पूर्ण ॥ आत्मज्ञानावांचून ॥ सुटका नव्हे कल्पांतीं ॥५२॥
श्रीरामावतार परिपूर्ण ॥ तोही धरी वसिष्‍ठाचे चरण ॥ श्रीकृष्ण ब्रह्म सनातन ॥ अनन्यशरण सांदीपना ॥५३॥
व्यास नारदासी शरण रिघे ॥ इंद्र बृहस्पतीच्या पायां लागे ॥ उमा शिवासी शरण रिघे ॥ आत्मज्ञानप्राप्तीसी ॥५४॥
शुक नारद प्रल्हाद ॥ वाल्मीक वसिष्‍ठादि ऋषिवृंद ॥ इतुकेही गुरुपद कमळींचा आमोद ॥ भ्रमर होऊनि सेविती ॥५५॥
उद्धव अर्जुनादिक भक्त ॥ गुरुभजनीं रतले समस्त ॥ अपरोक्षज्ञान प्राप्त ॥ सद्‌गुरुवांचूनि न घडे ॥५६॥
दुग्धींच नवनीत असे ॥ हें आबालवृद्ध जाणतसे ॥ परी मंथनाविण कैसें ॥ हातीं सांपडे सांग पां ॥५७॥
उगेंचि दुग्ध घुसळिलें ॥ अवघा वेळ जरी शोधिलें ॥ परी तें हातवटीवेगळें ॥ नवनीत न सांपडे ॥५८॥
जेथें जेथें प्राणी बैसत ॥ तेथें तेथें निधाने असती बहुत ॥ परी अंजन नेत्रीं न घालितां सत्य ॥ न सांपडती खणितांही॥५९॥
नेत्र उत्तम सतेजपणीं ॥ परी नुगवतां वासरमणी ॥ जवळी पदार्थ असोनी ॥ न दिसे नयनीं प्राणियां ॥६०॥
तैसें सदगुरुसी शरण न रिघतां ॥ अपरोक्षज्ञान परी नुगवतां वासरमणी ॥ जवळी पदार्थ असोनी ॥ न दिसे नयनीं प्राणियां
॥६०॥
तैसें सदगुरुसी शरण न रिघतां ॥ अपरोक्षज्ञान न लागे हाता ॥ यालागीं ब्रह्मानंदासी तत्त्वतां॥ शरण अनन्य मी असें ॥६१॥
श्रीगुरुराया तूं समर्थ ॥ हा हरिविजय आरंभिला ग्रंथ ॥ शेवटासी पावो ययार्थ ॥ तुझ्या वरें करुनियां ॥६२॥
तूं मेघ वर्षसी दयाळ ॥ तरीच हें ग्रंथरोप वाढेल ॥ साधकचातक तृप्त होतील ॥ भक्तीची ओल बहु होय ॥६३॥
माता करी प्रतिपाळ ॥ तों तों वाढों लागे बाळ ॥ तुझ्या कृपेविण बोल ॥ न बोलवे सर्वथा ॥६४॥
जोंवरी नाहीं वाजविता ॥ तों पांवा न वाजे सर्वथा ॥ सूत्रधार न हालवितां ॥ काष्ठपुतळा नाचेना ॥६५॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरुनाथा ॥ म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ ॥ आतां वंदूं श्रोते संत ॥ जे कृपावंत सर्वदा ॥६६॥
जे चातुर्यार्णवींचीं रत्‍नें ॥ कीं शांतिभूमीचीं निधानें ॥ की भक्तिवनींचीं सुमनें॥ विकासली साजिरीं ॥६७॥
कीं ते वैराग्यअंबरीचें दिनकर ॥ कीं अक्षय विज्ञानानंदचंद्र ॥ कीं अपरोक्षज्ञान्समुद्र ॥ न लागे अंत कोणातें ॥६८॥
कीं ते प्रेमगंगेचे ओघ ॥ कीं ते स्वानंदसुखाचे मेघ ॥ अखंड धारा अमोघ ॥ वर्षती मुमुक्षुचातकां ॥६९॥
कीं ते श्रवणामृताचे कुंभ ॥ कीं ते कीर्तनाचे अचल स्वयंभ ॥ कीं ते स्मरणाचे सुप्रभ ॥ ध्वजचि पूर्ण उभारले ॥७०॥
कीं ते हरिप द्मींचे भ्रमर ॥ कीं विवेकमेरुचीं श्रृंगें सुंदर ॥ कीं ते क्षमेचें तरुवर ॥ चिदाकाशीं उंचावले ॥७१॥
कीं ते मननजळींचे मीन ॥ कीं ते भवगजावरी पंचानन ॥ कीं परमार्थाचीं सदनें पूर्ण ॥ निर्मळ शीतळ सर्वदा ॥७२॥
कीं ते दयेचें भांडार ॥ की उपरतीचें माहेर ॥ कीं कीर्तीची जहाजें थोर ॥ भक्तिशीड फडकें वरी ॥७३॥
कीं ते परलोकींचें सोयरे सखे ॥ कीं ते अंतकाळींचे पाठिराखे ॥ वैकुंठनाथ ज्यांचे भाके ॥ गुंतोनि तिष्ठे त्यांपाशी ॥७४॥
ऐसें ते महाराज संत ॥ जे सकळांवरी कृपावंत ॥ जे दीनवत्सल भेदरहित ॥ आपपर नेणती जें ॥७५॥
देवांसमान म्हणावे संत ॥ हे गोष्‍टीच असंमत ॥ देव जैसी भक्ति देखती सत्य ॥ होती तैसे प्रसन्न ॥७६॥
जे सेवा करिती बहुत ॥ त्यांस उत्तम फळ देत ॥ जे भजन न करिती यथार्थ ॥ त्यांवरी देव कोपती ॥७७॥
त्यांस दरिद्र आणोनी ॥ प्राणियांसी पाडिती अधःपतनीं ॥ तैसी नव्हे संतांची करणी ॥ समसमान सर्वांतें ॥७८॥
सर्वांवरी दया समान ॥ एक उत्तम एक हीन ॥ हें न देखतीच संत पूर्ण ॥ जन वन समान तयांसी ॥७९॥
एकाचें करावें कल्याण ॥ न भजे त्यांचे अकल्याण ॥ देवांचें कर्तृत्व पूर्ण ॥ संत समान सर्वांतें ॥८०॥
जैसा कायेचा विचार होतसे ॥ तैसी तैसी छाया दिसे ॥ आपण बैसतां छाया बैसे ॥ उठतां उभी ती होय ॥८१॥
जैसी काया तैसी छाया ॥ याच प्रकारें देवांची क्रिया ॥ तैसी नव्हे संतांची चर्या ॥ समसमान सर्वांसी ॥८२॥
वरकड जनांसमान संत ॥ ऐसी बोलतांचि मात ॥ तो पावेल अधःपात ॥ दुष्टबुद्धि दुरात्मा ॥८३॥
समुद्र आणि सौंदणी ॥ तारागण आणि वासर मणी ॥ काचोटी आणि महामणी ॥ मेरु मशक सम नव्हे ॥८४॥
थिल्लर आणि गोदावरी ॥ राजा आणि दरिद्री ॥ योगी आणि दुराचारी कैसे समान होती पैं ॥८५॥
कस्तुरी आणि कोळसा ॥ केसरी आणि म्हैसा ॥ मनुष्य आणि महेशा ॥ कैसी साम्यता होईल ॥८६॥
सुपर्ण आणि वायस ॥ पाषाण आणि परीस ॥ बाभळ आणि सुरतरुस ॥ समानत्व कदा नव्हेचि ॥८७॥
तैसे संत आणि इतर जन ॥ जे लेखिती समसमान ॥ ते नरदेहासी येऊन ॥ पशू जैसे मूढ पैं ॥८८॥
असो ऐसा संतांचा महिमा ॥ वर्णूं न शकती शिव ब्रह्मा ॥ संतसंगाच्या सुखाची सीमा ॥ न करवेचि कवणातें ॥८९॥
ते संत महाराज सज्जन ॥ ग्रंथारंभीं तयांसी नमन ॥ श्रीवेदव्यास जगद्‌भूषण ॥ सत्यवतीसुत पैं ॥९०॥
ज्याचिया मुखकमळापासून ॥ चिद्रस द्रवला परिपूर्ण ॥ त्या वाङ्‌मय अमृतेंकरुन ॥ त्रिजग जाण धालें हो ॥९१॥
कीं एकमुखाचा ब्रह्मदेव ॥ कीं साक्षात्‌ द्विबाहु रमाधव ॥ कीं भाललोचन शिव ॥ स्वयमेव अवतरला ॥९२॥
तो महाराज कृष्णद्वैपायन ॥ अवतरला लोकहिताला गून ॥ सदा निगमकमलविकास पूर्ण ॥ व्यास चंडांशु देखतां ॥९३॥
जो वसिष्‍ठाचा पणतू होय ॥ शक्तीचा पुत्र निःसंशय ॥ त्या परशरसुताचें पाहें ॥ महत्त्व कोणा वर्णवे ॥९४॥
ऐसा तो शुकतात पूर्ण ॥ सत्यवतींचें हृदयरत्‍न ॥ त्या जगद्‌गुरुचे चरण ॥ प्रेमभावें वंदिले ॥९५॥
नमूं तो वाल्मीक आतां ॥ जो शतकोटिग्रंथकर्ता ॥ जो नारदकृपेनें तत्त्वतां ॥ श्रीरामकथा बोलिला ॥९६॥
ज्याच्या गोत्रीं जन्मलों स्पष्‍ट ॥ नमूं तो स्वामी श्रीवसिष्‍ठ ॥ ज्ञान ज्याचें अतिवरिष्‍ठ ॥ शांतिक्षमेचा सागरु जो ॥९७॥
दर्भावरी जेणें पृथ्वी धरिली ॥ रविसमान ज्याची शाटी मिरवली ॥ कमंडलु ठेवूनि भूमंडळीं ॥ कुंभोद्भव नेला साक्षीतें ॥९८॥
ही कथा सांगावी समस्त ॥ तरी विशेष वाढेल ग्रंथ ॥ ऐसा तो वसिष्‍ठमुनि समर्थ ॥ नसे अंत ज्ञाना ज्याच्या ॥९९॥
जेणें उपदेशिला रघुनाथ ॥ तो बृहद्वासिष्‍ठ श्रेष्‍ठ ग्रंथ ॥ छत्तीस सहस्त्र श्लोक निश्चित ॥ वाल्मीकमुनिकृत पैं ॥१००॥
जो सूर्यवंशाचा आदिगुरु ॥ जो ऋषींमाजी महामेरु ॥ ज्याचें कुळीं व्यासमुनीश्वरु ॥ रमानाथचि अवतरला ॥१॥
त्याच्या उदरीं चिद्रत्‍न ॥ जन्मला शुक गुणनिधान ॥ तेणें भागवताचें श्रवण ॥ परीक्षितासी जान करविलें ॥२॥
नमूं तो स्वामी शुक ॥ जेणें जिंकिले अरि कामादिक ॥ ज्याचें तपस्तेज अधिक ॥ तमांतक दूसरा ॥३॥
शुक असतां शुद्धवनीं ॥ छळूं आली रंभेची भगिनी ॥ ती निस्तेज होऊनि ते क्षणीं ॥ गेली लाजोनि स्वर्गातें ॥४॥
ज्याच्या मुखीं श्रीभागवत ॥ प्रकटला दिव्य ग्रंथ ॥ जेणें उद्धरिला अभिमन्युसुत ॥ भागवतधर्म सांगोनियां ॥५॥
बहु पुराणें बहु ग्रंथ ॥ त्यांत मुकुटरत्‍न भागवत ॥ जैसा सकळांत मुख्य वैकुंठनाथ ॥ तैसाचि ग्रंथ पूज्य हा ॥६॥
जैसा देवांमाजी सहस्त्रनयन ॥ कीं द्विजांमाजी सुपर्ण ॥ कीं तारागणांमाजी अत्रिनंदन ॥ तैसें जाण भागवत ॥७॥
भोगियांमाजी धरणीधर ॥ कीं तपियांत श्रेष्‍ठ पिनाकधर ॥ कीं नवग्रहांमाजी दिनकर ॥ श्रेष्‍ठ जैसा विराजे ॥८॥
कीं हरींमाजी हनुमंत ॥ कीं बोलक्यांमाजी अंगिरासुत ॥ कीं शास्त्रांमाजी वेदांत ॥ मुख्य जैसें मान्य पैं ॥९॥
आश्रमांत चतुर्थाश्रम पूर्ण ॥ कीं क्षेत्रांमाजी आनंदवन ॥ कीं शस्त्रांमाजी सुदर्शन ॥ तैसें जाण भागवत ॥११०॥
कीं वनचरांमाजी हरि थोर ॥ कीं धनुर्धरांमाजी रघुवीर ॥ कीं धातूंमाजी शातकुंभ सुंदर ॥ तैसेंचि जाण भागवत ॥११॥
त्याहीमाजी दशम ॥ केवळ हरिलीला उत्तम ॥ बोलिला व्याससुत परम ॥ हृद्गत गुह्य जें कां ॥१२॥
दशम आणि हरिवंश ॥ अनेक पुराणींच्या कथा विशेष ॥ बोलिले कवि महापुरुष ॥ श्रीकृष्णलीलामृत पैं ॥१३॥
तितुकियांचा जो मथितार्थ ॥ तो हा हरिविजय ग्रंथ ॥ दुजा नाहीं विपरीतार्थ ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१४॥
ऐका हो श्रोते सादर ॥ संपलिया रामअवतार ॥ पृथ्वीवरी दैत्य थोर ॥ मागुती सैरा माजले ॥१५॥
कंस चाणूर मुष्टिक ॥ अघ बक केशी प्रलंबादिक ॥ शिशुपाळ वक्रदंत चैद्यनायक ॥ जरासंध माजला ॥१६॥
जरासंधाच्या बंदिशाळे ॥ बावीस सहस्त्र राजे पडिले ॥ भौमासुर माजला बळें ॥ लोक पीडिले चतुर्दश ॥१७॥
बाणासुर काळयवन ॥ करिती पृथ्वीचें कंदन ॥ गायी आणि ब्राह्मण ॥ टाकिती मारुन दुरात्मे ॥१८॥
कौरव दुष्ट माजले ॥ राक्षस पुन्हां जन्मले ॥ कलींचे स्वरुप सगळें ॥ दुर्योधन जन्मला ॥१९॥
कंस आणि काळयवन ॥ मोडिती ब्राह्मणांचीं सदनें ॥ जो करी विष्णुभजन ॥ त्यासी मारुन टाकिती ॥१२०॥
न चाले अनुष्ठान तप ॥ राहिले ऋषींचे ध्यान जप ॥ वर्तूं लागलें थोर पाप ॥ धरा कंप जाहला ॥२१॥
गायीच्या स्वरुपें धरित्री ॥ उभी ठाकली ब्रह्मयाच्या द्वारीं ॥ हांक फोडोनि आक्रोश करी ॥ बुडालें बुडालें म्हणतसे ॥२२॥
मज न सोसावे दैत्यभार ॥ पाप वर्तलें अपार ॥ सकळ विष्णुभक्त द्विजवर ॥ पीडिले फार दैत्यांनीं ॥२३॥
ऐसी पृथ्वी आक्रंदतां ॥ जवळी आला जगत्पिता ॥ पृथ्वीस म्हणे तूं आतां ॥ चिंता न करीं येथोनी ॥२४॥
जैसे पर्जन्यकाळीं गंगेचे पूर ॥ तैसे आले ऋषींचे भार ॥ ब्रह्मयासी म्हणती विप्र ॥ अनर्थ थोर मांडला ॥२५॥
एक म्हणती कंसे गांजिलें ॥ एक म्हणती काळयवनें पीडिलें ॥ एक म्हणती यज्ञ मोडिले ॥ भौमासुरें चांडाळें ॥२६॥
एक म्हणती कन्या धरोनी ॥ गेला भौमासुर घेऊनी ॥ स्त्रिया भ्रष्टविल्या दैत्यांनीं ॥ ऐसें पाप अवनीं वर्तत ॥२७॥
अवघ्या प्रजा येऊन ॥ ब्रह्मयापुढें करिती रुदन ॥ तो कोल्हाळ ऐकोन ॥ विस्मित जाहला परमेष्‍ठी ॥२८॥
देवांसमवेत सहस्त्रनयन ॥ तोही आला न लागतां क्षण ॥ वंदिले विष्णुपुत्राचे चरण ॥ अतिप्रीतीं ते वेळीं ॥२९॥
ब्रह्मा म्हणे सहस्त्रनेत्रा ॥ आतां जावें क्षीरसागरा ॥ गार्‍हाणें सांगावें जगदुध्दारा ॥ तरीच कार्य साधेल ॥१३०॥
आतां देव ऋषि प्रजानन ॥ सांगातें घेऊनि चतुरानन ॥ क्षीरसागरा जाऊन ॥ कैसें स्तवन करतील ॥३१॥
कैसा क्षीरसागरींचा महिमा ॥ कोणे रीतीं तेथें परमात्मा ॥ शौनकादि विप्रोत्तमां ॥ सूत सांगे कथा हेचि ॥३२॥
परीक्षितीसी सांगे व्यासनंदन ॥ जनमेजयासी सांगे वैशंपायन ॥ तेंच प्राकृत भाषेंत पूर्ण ॥ श्रीधर सांगे श्रोतयां ॥३३॥
ब्रह्मानंदरुप तुम्ही श्रोते ॥ कथा ऐका सावधचित्तें ॥ जे ऐकतां समस्तें ॥ कलिकिल्मिषें भस्म होती ॥३४॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥ सम्मत हरिवंश भागवत ॥ चतुर संत श्रोते ऐकोत ॥ प्रथमाध्याय गोड हा ॥१३५॥

अध्याय ॥१॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ ओंव्या ॥१३५॥