Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भगवान श्रीकृष्ण 10

समाजहिताचे प्रत्येक कर्म पवित्रच
समाजाच्या हिताचे प्रत्येक कर्म पवित्र आहे. त्या त्या परिस्थितीत जे जे करता येईल तेच कर्म उत्कृष्टपणे करणे, त्या वेळेस इतर वासना-विकार-मनोरथ शांत ठेवणे व सर्व जीवन त्या कर्मात ओतणे म्हणजेच धर्म होय. 'स्वकर्मणा तमभ्यर्च सिध्दिं विंदति मानवः' आपल्या कर्मरूप पुष्पाने त्याची पूजा करून मनुष्य सिध्दी मिळवतो. माझे कर्म परमेश्वराच्या पायांवर पुष्प म्हणून घालण्याला मला लाज वाटली न पाहिजे, असे ते कर्म व्हावे . मग माझे चटई विणण्याचे काम असो, झाडण्याचे काम असो व महान् ग्रंथ लिहिण्याचे काम असो. कबीर शेला विणी. तो कोणत्या दृष्टीने विणी? गिऱ्हाईकाला फसवण्याच्या दृष्टीने? नाही. माझा हा शेला भगवंताच्या पायांवर, त्याच्या अंगावर घालावयचा आहे, या दृष्टीने कबीर शेले विणी. त्याचे ते शेला विणण्याचे कर्म, भगवंताची पूजा करण्याचे पुष्प होते. त्या कर्मात जीवनाचा सारा सुगंध, सारे सौंदर्य व रस त्याने ओतलेला होता. 'झिनि झिनी झिनी झिनी । बिनी चदरिया' असे म्हणत तो विणीत होता. यामुळे कबीराच्या शेल्यात दिव्यता झळके. गिऱ्हाइकाची दृष्टी त्यावर ठरत नसे ! तो शेला अमोल आहो, असे सर्वांना वाटे. ज्या कर्मात जीवन ओतलेले आहे, हृदयाने जे रंगवलेले आहे त्याचे मोल कोण करणार?

वेरूळचे मुख्य जे कैलास लेणे ते ज्या प्रमुख शिल्पकाराने खोदून तयार केले, त्याला ते तयार झाल्यावर स्वतःलाच आश्चर्य वाटले ! तो त्या लेण्याकडे पाहात विस्मयाने म्हणाला, ''काय? हे माझ्या या पार्थिव हातांनी मी लेणे निर्माण केले? हे शक्य आहे?'' तेव्हा आकाशवाणी झाली,''नाही, हे देवांनी निर्माण केले.'' ही जी दंतकथा आहे, त्यात काय भावार्थ आहे? ती हृदयकाशातील वाणी म्हणाली,''तू स्वतःला विसरला होतास, परमेश्वरच जणू तुझ्या हातांत येऊन बसला होता. विश्वंभराच्या पायांवर अर्पण करण्यासाठी, त्याच्या अंगावर घालण्यासाठी तू ही लेणी निर्माण करीत होतास. त्यात तू इतका दंग झालास की,  स्वतः विश्वंभरच जणू तुझ्या हातात, तुझ्या दृष्टीत येऊन बसला !'' ''देवो भूत्वा देवं यजेत'' - ईश्वराची पूजा या कर्माने मला करावयाची आहे, या भावनेच्या उत्कटत्वाने जणू माझा देवच येऊन ते कर्म करतो व ती दिव्यता त्या कर्मात प्रगट होते.

माझे कर्म हे ईश्वराला द्यावयाचे आहे. या भावनेने जर होईल तर ते किती उत्कट होईल? साधा कोणी जेलर, सुपरिटेंडेंट रागावेल, तो खूष होणार नाही म्हणून आपण किती जपून काम करतो? जेलरला आनंद व्हावा म्हणून मी जपतो. त्याच्यापेक्षा किती पटींनी परमेश्वराला आनंद व्हावा म्हणून मी जपेन? मग जेलमध्ये जी मी सतरंजी तयार करीत असेन, ती किती काळजीपूर्वक मी करीन? ही सतरंजी कोणी तरी बाहेरचा मनुष्य विकत घेणार आहे. तो बाहेरचा मनुष्य म्हणजे ईश्वरच आहे, तो नारायण आहे. तो परमेश्वर, नारायण माझ्या या सतरंजीवर बसणार आहे, ही भावना, हा विचार माझ्या सतरंजी विणण्याच्या कर्मात केवढी दिव्यता ओतील?

भिशीमधील स्वयंपाक करणा-यांनी भाकर नीट भाजली नाही तर आपण रागावतो, भाकरीला पापुद्रा सुटला नाही म्हणून संतापतो. पंधराशे लोकांचा त्यांना स्वयंपाक करावयाचा असतो. ते कठीण काम आहे. जर त्या स्वयंपाक करणा-यांची अशी वृत्ती झालेली असेल की, ही भाकर माझे देव खाणार आहेत, माझे नारायण खाणार आहेत, तर किती सुंदर भाकरी ते भाजतील? भिशीमधील कैद्यांची अशी वृत्ती व्हावी ही आपण स्वराज्यवाले अपेक्षा करतो. त्या कैद्यांनी संत नामदेवाच्या दर्जाचे व्हावे अशी आपण अपेक्षा करतो, परंतु अशी अपेक्षा करण्याचा माझा अधिकार आहे का? मी जे काम करीत आहे ते त्याच दृष्टीने मी करीत आहे का? रस्सी तयार करण्याचे, सतरंजी विणण्याचे, गालिचा तयार करण्याचे-कोणतेही कर्म जे आपण करतो ते याच भावनेने. हे कर्म ईश्वरासाठी आहे या भावनेने करतो का? ही भावना होणे म्हणजेच योग. म्हणजेच ते कर्मपुष्प देवाच्या पायांवर वाहावयाच्या लायकीचे झाले. मग ते कर्म कोणतेही असो. ते प्रभूला प्रिय आहे.