Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

फक्त जगू द्या

जानव्यात अडकलेला चंद्र

काही सुटता सुटेना

बारामतीच्या दादाचं

कुणाशी पटता पटेना


कोकणातल्या आंब्याचं लोणचं

अजून कुठं मुरलं नाही.

नारायणाचं मन कधीच

एका घरात रमलं नाही.


नाथाचं आतलं दुःख आता

विनोदाच्या तावडीत सापडलं.

आजवर कधीच कळलं नाही

कमळाला नेमकं कोण आवडलं?


पण ज्यांना कमळ नाही आवडलं

त्याना मात्र ई.डी. ने येड्यागत झोडपलं.

आम्हाला मात्र घंटा कधी कळलं नाही कुणाजवळ

किती रुपये सापडलं?


इंजिन आलंय जरा रुळावर

पण कमळ बसलंय मुळावर

बेरजेचे गणित घडाळ्याच्या वेळेवर

नजर आहे सर्वांची वंचितच्या बाळावर


टायगर अभी जिंदा है म्हणत

पावर अजूनही बाकी आहे

शरदाच्या चांदण्या गेल्या उड्या मारत

आणि आता तरुण चंद्र एकाकी आहे


नवं पिक नवीन सम्राट

आता खेळतोय धनुष्याच्या दोरीवर.

आणि भविष्याच्या रेषा दिसत नाहीत आता 

हाताच्या पंज्यावर.


अण्णा कुठे अन्न मागतायेत 

काही केल्या कळत नाही

मिडीयाचा कॅमेरा आता

राळेगणसिद्धीकडे वळत नाही


निकाल लागेल पुन्हा एकदा

कुणाला तरी मिळेलच गादी

एक दाढीवाला बाबा आहे

कविता करत तोच येईल आधी


पुन्हा मग मंत्रीपदाचा गोंधळ उडेल

कुणाच्या चेहऱ्यावर हसू

तर कुणाच्या डोळ्यात आसू असेल

पुन्हा पुन्हा त्याच घेतील शपथा आणि आमच्या ढुंगणावर पुन्हा त्याच नेहमीच्या लाथा


आम्ही काय करायचं

बोटाला शाई लावायचं.

आणि तुम्ही सगळ्यांनी

आम्हाला थुक्का लावायचं.


विकास करा अथवा राहू द्या

काम करा नाहीतर सोडून द्या

अच्छे दिन ही नको

आणि बुरे दिन ही नको

जो कुणी येईल त्याला 

फक्त एकच विनंती

बाबांनो आता 

कसं का होईना 

फक्त आम्हाला जगू द्या.

जगू द्या.

बस फक्त जगू द्या.