Get it on Google Play
Download on the App Store

सार्वजनिक दुर्गापूजा

सुमारे एक हजार वर्षे बंगालमध्ये हा उत्सव चालू आहे असे मानले जाते. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुज मूर्ती बनवितात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिक, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात. देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते. दुर्गापूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला होते. त्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे आवाहन करतात. षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात. यात देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध पवित्र वस्तूंनी स्पर्श करतात व त्यांना पावित्र्य आणतात. सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम बेल, डाळिंब, अशोक, हरिद्रा इ. नऊ प्रकारच्या पल्लवांची एक जुडी करतात व ती अपराजिता वल्लीने बांधतात. मग त्या जुडीला स्नान घालून साडी नेसवतात. तिला कलाबहू (कदलीवधू) असे म्हणतात. ती गणपतीची पत्नी असते. उत्सवमूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात. त्यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे महास्नानाचा होय. त्यावेळी एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्यात देवीचे जे प्रतिबिंब पडते, त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात. देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल, शंखोदक, गंगाजल, समुद्रजल, इ. जले, पंचगव्य, पंचामृत, आणि गोठा, चौक, वारूळ, नदीचे पात्र इ. ठिकाणची माती आणतात. त्यानंतर देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात. मग तिला पशुबळी देतात. पूर्वी हे बलिदान फार मोठ्या प्रमाणावर होत असे, पण सांप्रत त्याचे प्रमाण घटले आहे. अशीच पूजा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात. याशिवाय संधिपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात. ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते. त्या रात्री गायन, वादन, खेळ यांच्या योगाने जागरण करतात. चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत व तळ्यात विसर्जन करतात. दुर्गा ही या दिवसात सासरहून माहेरी आलेली असते अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात.

बंगाल प्रांतात या उत्सवासाठी कारागीर विशेष प्रकारच्या देवीच्या उत्सवमूर्ती तयार करतात. यामध्ये महिषासुरमर्दिनीसह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांच्या मूर्तीही तयार केल्या जातात.