Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक १० ते २०

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ‍ ।

बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ‍ ॥१०॥

बलं बलवतामस्मि कामरागविवर्जितम् ‍ ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥११॥

जें का सृष्टयारंभीं । शून्याच्या अंकुरें । सर्वथा विस्तारे । आत्मतत्त्व ॥७३॥

सृष्टीचा त्या लय । होतां तिये वेळीं । अक्षरें जें गिळी । ॐकाराचीं ॥७४॥

विश्वा चि सारिखें । दिसे जें साचार । असे विश्वाकार । जोंवरी हा ॥७५॥

मग जें का महा -। प्रळय होतांच । स्वयें राहे साच । निराकार ॥७६॥

अर्जुना , जें ऐसें । अनादि सहज । तें मी विश्वबीज । आत्मतत्त्व ॥७७॥

तुजलागें ज्ञान । दाविलें हें स्पष्ट । घेसी जरी नीट । आकळोनि ॥७८॥

तरी आत्मानात्म -। विचारें आगळा । उपयोग भला । देखशील ॥७९॥

प्रसंग सांडोन । न बोलें मी आतां । सांगेन तत्त्वतां । संक्षेपें हें ॥८०॥

तपस्व्यांच्या ठायीं । असे जें का तप । तें हि माझें रुप । जाण पार्था ॥८१॥

बळवंतामाजीं । बळ जें अढळ । बुद्धि जी केवळ । बुद्धिमंतीं ॥८२॥

भूतांचिया ठायीं । असे जो का काम। तो मी आत्माराम । म्हणे ऐसें ॥८३॥

परी जेणें कामें । धर्माचें महत्त्व । वाढे ऐसें सत्त्व । असे ज्याचें ॥८४॥

इंद्रियानुकूल । वर्ते हें तो खरें । काम तो प्रसारें । विकारांच्या ॥८५॥

धर्मासी विरुद्ध । परी तें वर्तन । न व्हावें म्हणोन । दक्ष राहे ॥८६॥

कर्तव्यकर्माचा । राजमार्ग धरी । कुमार्ग अव्हेरी । निषिद्धाचा ॥८७॥

तेविं नियमाचा । मशालजी नीट । दाखवीत वाट । सवें चाले ॥८८॥

ऐशा रीती पार्था । प्रवर्ते हा काम । म्हणोनियां धर्म । पूर्ण होय ॥८९॥

मग तो भोगितो । संसार सकळ । मोक्ष -तीर्थातील । जणूं मोतीं ॥९०॥

वेदगौरवाच्या । मंडपावरील । कर्मरुप वेल । असे जी का ॥९१॥

फळा -फुलांसंगें । भिडे ती मोक्षास । तोंवरी तियेस । वाढवी जो ॥९२॥

ऐसा जो नेमस्त । भूतां बीजरुप । तो मी म्हणे बाप । योगियांचा ॥९३॥

एकैक हें आतां । सांगूं किती फार । समस्त साचार । वस्तुजात ॥९४॥

आलें आकारास । माझ्या चि पासोन । स्वभावतां जाण । धनंजया ॥९५॥

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्व ये ।

मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥१२॥

आणिक हि जे जे । विकार सात्त्विक । रज -तमादिक । तैसे सर्व ॥९६॥

अर्जुना माझ्या चि । स्वरुपापासून । जाहले निर्माण । ओळख तूं ॥९७॥

जैसी स्वप्नाचिया । डोहांमाजीं साच । बुडे ना कधीं च । जागृति ती ॥९८॥
तैसे माझ्या ठायीं । जाहले तरी हि । सर्वथा मी नाहीं । तयांमाजीं ॥९९॥

गोठोनिया रस । तयाचें सहज । भरींव तें बीज । होय जैसें ॥१००॥

आणि तयासी च । फुटोनि अंकुर । काष्ठ तें साचार । बने त्याचें ॥१०१॥

सांगे मग तया । काष्ठाचिया ठायीं । पार्था असे काई । बीजपण ॥१०२॥

विकार हे तैसे । माझ्या चि पासोन । परी तयांहून । वेगळा मी ॥१०३॥

जैसें नभामाजीं । उद्भवे आभाळ । आभाळीं केवळ । नभ नाहीं ॥१०४॥

किंवा मेघांमाजीं । राहतें उदक । उदकांत देख । मेघ नाहीं ॥१०५॥

मग तोयाचें त्या । होवोनि घर्षण । तेज तयांतून । प्रकटे जें ॥१०६॥

तया लखलखीत । विजेमाजीं काय । राहतें तें तोय । सांगें मज ॥१०७॥

अग्निपासोनियां । धूम जैसा होय । परी धूमीं काय । अग्नि राहे ? ॥१०८॥

विकार हे तैसे । माझे चि साचार । परी मी विकार । नोहें पार्था ॥१०९॥

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ‍ ।

मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ‍ ॥१३॥

जैसें तें शेवाळ । जन्मोनि उदकीं । झांकोनियां टाकी । उदकातें ॥११०॥

मेघाचिया योगें । किंवा धनंजया । लोपे जैसें वायां । आकाश तें ॥१११॥

लटिकें तें स्वप्न । परी वाटे साच । स्वाधीन होतां च । निद्रेचिया ॥११२॥

होऊ देतें काय । मग तिये वेळीं । आपणा आपुली । आठवण ॥११३॥

डोळेयाचें पाणी । डोळां चि गोठोन । वाढे तयांतून । पडळ जें ॥११४॥

तें चि मग काय । टाकी ना किरीटी । गिळोनियां दृष्टि । डोळेयांची ॥११५॥

तैसी त्रिगुणांनीं । युक्त जी का माया । पार्था , पडछाया । माझी च ती ॥११६॥

माझी च ती परी । प्रावरण साच । होवोनि , माझ्या च । आड आली ॥११७॥

म्हणोनियां प्राणी । जाणती ना मातें । माझे मद्रूप ते । होती चि ना ॥११८॥

मुक्ताफळें जैसीं । जळीं चि जन्मोन । न जाती विरोन । जळामाजीं ॥११९॥

लिंपोनियां माती । घडिला जो घट । मिळे तो मातींत । मेळवितां ॥१२०॥

परी लागतां च । विस्तवाची आंच । भिन्नता ये साच । तयालागीं ॥१२१॥

तैसें भूतजात । सर्व हे माझे च । अवयव साच । धनंजया ॥१२२॥

परी मायायोगें । जीवदशे आले । पाहें कैसे झाले । विषयांध ॥१२३॥

अहं -ममत्वाच्या । भ्रांतींत गुंतोन । गेले विसरोन । मजलागीं ॥१२४॥

म्हणोनि माझे चि । मज नोळखिती । माझे चि न होती । मद्रूप ते ॥१२५॥

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥११४॥

महत्तत्त्वादिक । जी का माझी माया । पार्था , तरोनियां । सर्वथा ती ॥१२६॥

कैसी व्हावी येथें । भ्रांत जीवाप्रति । मद्रूपाची प्राप्ति । ऐक आतां ॥१२७॥

ब्रह्मगिरीचिया । अर्ध कडयामाजीं । पावे उगम जी । माया -नदी ॥१२८॥

आदिसंकल्पाच्या । जळाची उसळी । घेवोनि निघाली । जंव पुढें ॥१२९॥

तंव तींत महा -। भूतांचा तो भला । लहानसा आला । बुडबुडा ॥१३०॥

सृष्टिविस्ताराच्या । मग जी का ओघें । काळगतीवेगें । वाढोनियां ॥१३१॥

प्रवृत्ति -निवृत्ति । उंच दोन्ही तट । कैसी ओसंडीत । वाहूं लागे ॥१३२॥

जी का गुणरुपी । मेघवृष्टिभरें । भरे महा -पूरें । मोहाचिया ॥१३३॥

यम -नियमांचीं । गांवें वाहवीत । जाय घोघावत । पुढें पुढें ॥१३४॥

द्वेषाचे भोंवरें । दाटोनियां जींत । वळणें पडत । मत्सराचीं ॥१३५॥

आणि प्रमादादि । मोठमोठे मासे । तळपती कैसे । माझारीं च ॥१३६॥

जेथें प्रपंचाचीं । वांकणें अमूप । स्वभावनुरुप । जीवांचिया ॥१३७॥

कर्म -अकर्माचे । खळाळते पूर । जेथें अनिवार । लोटती गा ॥१३८॥

आणि कैसा सुख -। दुःखांचा तो केर । तरंगे चौफेर । तयावरी ॥१३९॥

जियेमाजीं रति -। सुखाचिया बेटा । आदळती लाटा । कामाचिया ॥१४०॥

नाना जीवरुप । फेंस तो उदंड । संचला अखंड । दिसे तेथें ॥१४१॥

अहंकाराचिया । प्रवाह -धारेंत । उसळोनि येत । मद -त्रय ॥१४२॥

विषयांच्या ऊर्मी । एकावरी एक । क्षणोक्षणीं देख । उडया घेती ॥१४३॥

जन्ममरणाचे । खळगे पाडीत । जाती उदयास्त -। रुप लोढें ॥१४४॥

पंचभूतात्मक । देहरुपी किती । तेथें होती जाती । बुडबुडे ॥१४५॥

संमोह विभ्रम । जियमाजीं मासे । गिळिती आमिषें । धैर्यरुप ॥१४६॥

तेविं ठायीं ठायीं । जेथें वक्रगती । भोंवरे भोंवती । अज्ञानाचे ॥१४७॥

भ्रांतिरुप पाणी । गढूळ जें अति । म्हणोनि फसती । जीव जेथें ॥१४८॥

आस्थेचिया गाळा -। माजीं रुतोनियां । इच्छिती ते वायां । स्वर्गप्राप्ति ॥१४९।

कैसा रजोगुण । वाहे खळाळत । गाजूं लागे तेथ । स्वर्गलोक ॥१५०॥

तमाचे प्रवाह । जेथें जोरदार । सत्त्वाचें गंभीर । स्थिरपण ॥१५१॥

किंबहुना ऐसी । मायानदी द्वाड । तरावया जड । जड जीवां ॥१५२॥

पुनर्जन्मरुपी । उसळतां लोट । होवोनि आघात । सत्यलोकीं ॥१५३॥

तेथींचे बुरुज । ढांसळोनि जाती । धोंडे कोसळती । ब्रह्मांडाचे ॥१५४॥

पाणियाच्या वेगें । वाहे अनावर । न ओसरे पूर । अज हि तो ॥१५५॥

ऐसा हा दुस्तर । पार्था मायापूर । तरेल साचार । कोण कैसा ॥१५६॥

स्वयंबुद्धीचिया । बाहुबळें कोणी । तरावें म्हणोनि । प्रवेशले ॥१५७॥

परी तेथें पाहीं । उरला चि नाहीं । ठावठिकाणा हि । तयांचा तो ॥१५८॥

झालों आम्ही ज्ञानी । ऐसे अभिमानी । डोहीं च बुडोनि । गेले कोणी ॥१५९॥

वेदत्रयाची तों । बांधोनि सांगड । आणि सवें घोंड । अहंतेची ॥१६०॥

घेवोनि जे कोणी । येथें तरुं गेले । तयांसी गिळिलें । मद -मीनें ॥१६१॥

मदनाच्या कासे । लागले जे कोणी । कमर कसोनि । तारुण्याची ॥१६२॥

विषयाच्या नक्रें । मारोनियां मिठी । तयांसी शेवटीं । चघळिलें ॥१६३॥

आतां वार्धक्याच्या । लाटेमाजीं पाश । असे मतिभ्रंश -। रुप जो का ॥१६४॥

तया पाशामाजीं । कैसे अडकोन । जाती जखडोन । चौबाजूंनीं ॥१६५॥

शोकाचिया कांठा -। वरी आदळत । क्रोध -भोंवर्‍यात । घेती घेर ॥१६६॥

तेथोनियां वर । येतां तियेकडे । टोंचिती गिधाडें । संकटांचीं ॥१६७॥

मग दुःखाचिया । कर्दमीं माखले । रेवेंत रुतले । मृत्यूचिया ॥१६८॥

जन्मोनियां पार्था । वायां गेले ऐसे । कामाचिया कासे । लागले जे ॥१६९॥

कोणी यज्ञादिक -। क्रियारुप पेटी । बांधोनियां पोटीं । तरुं गेले ॥१७०॥

स्वर्गसुखाचिया । कपारीं ते पार्था । राहिले सर्वथा । गुर्फटोनि ॥१७१॥

कर्म -बाहुबळीं । ठेवोनि विश्वास । मोक्ष गांठायास । धांवले जे ॥१७२॥

विधिनिषेधाच्या । दीर्घ भोंवर्‍यांत । अखंड भोंवत । राहिले ते ॥१७३॥

वैराग्याची नाव । प्रवेशे ना जेथें । तेविं विवेकातें । नुरे ठाव ॥१७४॥

क्कचित् ‍ पार्था , योगें । तरुं ये कांहींशी । दुस्तर ही ऐशी । मायानदी ॥१७५॥

आतां जीवाचिया । अंगबळें येथें । तरुं पाहणें तें । कैसें ऐक ॥१७६॥

करी जो कुपथ्य । तयालागीं व्याधि । पार्था , जरी कधीं । जिंकवेल ॥१७७॥

किंवा सज्जनासी । दुर्जनाची बुद्धि । देखें जरी कधीं । आकळेल ॥१७८॥

किंवा लोभियासी । लाभतां संपत्ति । जरी सांडोनि ती । जाववेल ॥१७९॥

माशालागीं गळ । जरी गिळवेल । चोरासी भियेल । सभा जरी ॥१८०॥

किंवा भेकडासी । पिशाच्च वळेल । पाडस तोडील । जाळें जरी ॥१८१॥

किंवा मुंगी जरी । मेरु ओलांडील । जीवां तरवेल । तरी माया ! ॥१८२॥

म्हणोनियां जैसी । कामुकातें पार्था । सर्वथा वनिता । जिंकवेना ॥१८३॥

तैसी मायामय । नदी ही दुस्तर । जीवांसी साचार । तरवे ना ॥१८४॥

येथें एक चि ते । तरले सहज । भजले जे मज । सर्वभावें ॥१८५॥

असतां चि ऐल -। थडीं धनंजया । संपलें गा तयां । माया -जळ ॥१८६॥

सद्‌गुरु नावाडी । तारक निःशंक । उभा असे देख । जयांपुढे ॥१८७॥

आत्मानुभूतीची । कसोनियां कास । सिद्ध तरायास । जाहले जे ॥१८८॥

आत्मानिवेदन । तराफा तो भला । पार्था , सांपडला । जयांलागीं ॥१८९॥

अहंतेचा भार । फेंकोनियां दूर । चुकवोनि धार । विकल्पाची ॥१९०॥

प्रपंचप्रीतीच्या । ओहोतीचें पाणी । तें हि तपासोनि । नीटपणें ॥१९१॥

ऐक्याचा उतार । दिसतां उघड । बोधाची सांगड । जोडोनियां ॥१९२॥

मग निवृत्तीच्या । पैल तीरा भले । कैसे ते निघाल । झेपावत ॥१९३॥

वैराग्याच्या हातें । तोडीत तें जळ । सोऽहंभाव बळ -। संपन्न ते ॥१९४॥

पोहत पोहत पातले शेवटीं । मुक्तीचिया तटीं । अनायासें ॥१९५॥

ऐशापरी मज । भजले सर्वथा । तरले ते पार्था । माझी माया ॥१९६॥

परी ऐसे भक्त । नाहींत बहुत । विरळा चि येथ । आढळती ! ॥१९७॥

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रापद्यन्ते नराधमाः ।

माययाऽपहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥१५॥

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन।

आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतवर्षभ ॥१६॥

अन्य जे बहुत । तयांतें निभ्रांत । लागलेंसें भूत । अहंतेचें ॥१९८॥

म्हणोनियां तयां । नाहीं आत्मज्ञान । झालें विस्मरण । स्वरुपाचें ॥१९९॥

मग नियमाच्या । वस्त्राचें हि भान । नुरे तयां जाण । तिये वेळीं ॥२००॥

जाहले निर्लज्ज । आतां तयांप्रति । भावी अधोगति । जाणवे ना ॥२०१॥

करुं नये ऐसें । जें जें म्हणे वेद । वागती स्वच्छंद । करोनि तें ॥२०२॥

जया कार्या आले । देहग्रामीं येथ । सर्व तो कार्यार्थ । सांडोनियां ॥२०३॥

इंद्रियग्रामाच्या । राजमार्गी देख । कामक्रोधादिक । मेळवोनि ॥२०४॥

अहंममत्वाची । व्यर्थ बडबड । कैसी ते उदंड । चालविती ॥२०५॥

दुःखशोकादिक । करिती आघात । तयांची तों खंत । नसे मनीं ॥२०६॥

सांगावया येथें । कारण तें हेंच । कीं ते झाले सोच । मायाग्रस्त ॥२०७॥

म्हणोनि ते मातें । मुकले सर्वथा । आतां ऐक कथा । मद्भक्तांची ॥२०८॥

ज्यांनी आत्महित । केलें वृद्धिंगत । ऐसे माझे भक्त । चतुर्विध ॥२०९॥

पहिला तो आर्त । जिज्ञासु तो दुजा । यत्नशील तिजा । परमार्थी ॥२१०॥

अर्जुना संपूर्ण । ज्ञानाचें निधान । चवथा तो जाण । भक्त माझा ॥२११॥

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।

प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥१७॥

कष्टतां संसारीं । व्हावें दुःखमुक्त । म्हणोनि तो आर्त । भजे मातें ॥२१२॥

भजे मातें पार्था । जिज्ञासु तो जाण । व्हावें माझें ज्ञान । म्हणोनियां ॥२१३॥

तिजा तो अर्थार्थी । करी माझी भक्ति । लक्षूनियां प्राप्ति । परमार्थाची ॥२१४॥

मग स्वभावें चि । चौथियाच्या ठायीं । कर्तव्य तें कांही । उरे चि ना ॥२१५॥

म्हणोनि जो ज्ञानी । तो चि एक भक्त । जाण हें निभ्रांत । धनंजया ॥२१६॥

ज्ञानाचा प्रकाश । म्हणोनिया देख । भेदाचा काळोख । नाहीं तया ॥२१७॥

तया झाली प्राप्ति । सायुज्याची साच । होवोनियां मी च । भजे मातें ॥२१८॥

स्फटिकाचे ठायीं । उदकाचा देख । आभास क्षणैक । होय जैसा ॥२१९॥

मद्रूप तो ज्ञानी । तैसा इतरांते । भक्त ऐसा वाटे । देहाकारें ॥२२०॥

परी तें कौतुक । ज्ञानियाचें साच । न ये गुंफिता च । शब्दांमाजीं ॥२२१॥

जैसा होतां वायु । आकाशीं विलीन । नुरे वायुपण । वेगळें तें ॥२२२॥

तैसा चि तो मिळे । मद्रूपीं संपूर्ण । मग भक्तपण । उरे कोठें ॥२२३॥

जरी हालवोनि । पाहिला पवन । तरी च तो भिन्न । नभाहूनि ॥२२४॥

गगन -स्वरुप । एर्‍हवीं तो जाण । स्वभावें संपूर्ण । असे जैसा ॥२२५॥

तैसा करी जेव्हां । कर्मे शारीरिक । भक्त ऐसा देख । गमे तेव्हां ॥२२६॥

परी धनंजया । स्वानुभूतियोगे । होय तो निजांगे । मद्रूप चि ॥२२७॥

तया ज्ञानोदय । जाहला म्हणोनि । मज आत्मा मानी । आपुला तो ॥२२८॥

आत्मा चि तो माझा । ऐसें मी हि तया । उचंबळोनियां । मग म्हणे ॥२२९॥

जीवापलीकडे । स्व -रुपाची खूण । तीतें आकळोन । वावरे जो ॥२३०॥

पार्था , देहधारी । असे तो म्हणोन । काय मजहून । भिन्न होय ? ॥२३१॥

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ‍ ।

आस्थिताः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ‍ ॥१८॥

म्हणोनि कोणी हि । झाले माझे भक्त । साधावया हित । आपुलालें ॥२३२॥

तरी जया मी च । आपुलासा मानीं । ऐसा भक्त ज्ञानी । एक चि तो ॥२३३॥

दुभत्यास्ची आस । ठेवोनियां फांस । बांधिती पायास । धेनूचिया ॥२३४॥

परी दोरेंवीण । सुदृढ तो साचा । कैसा वासराचा । स्नेह -पाश ! ॥२३५॥

तन -मन -प्राणें । दुर्जे कांहीं नेणे । देखे त्यातें म्हणे । माय माझी ॥२३६॥

ऐसा एकभाव । जाणोनि वत्साचा । धेनूसी हि त्याचा । फुटे पान्हा ॥२३७॥

म्हणोनियां साच । बोल ते यथार्थ । देखा रमानाथ । बोलिला जे ॥२३८॥

असो मग देव । म्हणे पंडुसुता । दुजे भक्त आतां । वर्णिले जे ॥२३९॥

ते हि सर्व आम्हां । आवडती भले । परी ते आगळे । ज्ञानी भक्त ॥२४०॥

सागरातें नदी । मिळोनियां जातां । वळे ना सर्वथा । माघारी ती ॥२४१॥

तैसा ज्ञानी भक्त । जाणोनियां मातें । पाहों प्रपंचातें । विसरला ॥२४२॥

हृदय -गुहेंत । तयाचिया चांग । उद्भवे गंगौघ । प्रतीतीचा ॥२४३॥

स्वभावें तो मग । मज मिळतां च । मद्रूपता साच । आली तया ॥२४४॥

पार्था , आतां मी च । झाला तो साचार । सांगूं काय फार । बोलोनियां ॥२४५॥

ज्ञानी भक्त माझा । आत्मा चि तो जाण । वस्तुतां ही खूण । न बोलावी ॥२४६॥

न बोलावी परी । दाविली बोलोन । गेलों मी भुलोन । काय करुं ! ॥२४७॥

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेवः सर्वामिति स महात्मा सुदुर्लभः ॥१९॥

कीं तो विषयांच्या । दाट झाडींतून । संकटें टाळून । षड्रिपूंचीं ॥२४८॥

सद्वासनारुप । पहाडावरती । येवोनि निश्चितीं । ठाकला गा ॥२४९॥

निषिद्ध कर्माचा । जो का आडमार्ग । सर्वथा तो मग । डावलोनि ॥२५०॥

घरोनि सत्संग । स्वीकारोनि चांग । सरळ सन्मार्ग । सत्कर्माचा ॥२५१॥

आणि फलाशेचें । जें का पादत्राण । दूर तें फेंकोन । अनवाणी ॥२५२॥

करितां प्रवास । शतावधि जन्म । न गणोनि कर्म -। फल -हेतु ॥२५३॥

एकला चि सर्व -। संग -परित्याग । करोनियां चांग । धांव घेतां ॥२५४॥

देहतादात्म्याची । संपोनियां रात । जाहली प्रभात । कर्मक्षयें ॥२५५॥

गुरुकृंपारुप । उजळली उषा । तेणें दाही दिशा । तेजोमय ॥२५६॥

ज्ञान -बालार्काचा । होतां चि उदय । देखे तो ऐश्वर्य । ब्रह्मैक्याचें ॥२५७॥

मग जेथें पाहे । तेथें मीच आहें । आणि स्वस्थ राहे । तरी मीच ॥२५८॥

असो हें सर्वत्र । तयालागीं पाहीं । दुजें कांहीं नाहीं । माझ्याविण ॥२५९॥

पार्था , देखें घट । बुडतां दोहांत । जळ जैसें आंत । बाहेर तें ॥२६०॥

तैसा ज्ञानी भक्त । राहे माझ्या ठायीं । आणि तया मी हि । अंतर्बाह्य ॥२६१॥

सर्वथा जी ऐसी । शब्दातीत स्थिति । बोलीं बोलतां ती । न ये साच ॥२६२॥

म्हणोनि हें राहो । देख तो साचार । ज्ञानाचें अपार । भाण्डार गा ॥२६३॥

मग ज्ञानरुप । होवोनि आपण । स्वभावें स्वाधीन । करी विश्व ॥२६४॥

संपूर्ण हें विश्व । वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ॥२६५॥

म्हणोनि तो ज्ञानी । भक्तांमाजीं राजा । जाण कपिध्वजा । निश्चयेसीं ॥२६६॥

प्रतीति -भांडारीं । जयाच्या साचार । विश्व चराचर । सांठवलें ॥२६७॥

ऐसा तो महंत । श्रेष्ठ ज्ञानी भक्त । दुर्लभ बहुत । धनुर्धरा ॥२६८॥

जयांचीं भजनें । परी भोगासाठीं । ऐसे भक्त होती । बहुवस ॥२६९॥

आली आशारुप । नेत्ररोगें पार्था । दृष्टीसि मंदता । तयांचिया ॥२७०॥

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥२०॥

तयांचिया ठायीं । कामाचा रिघाव । कर्मफलीं हांव । म्हणोनियां ॥२७१॥

कामाचा संसर्ग । घडे तयां जेव्हां । मालवे तो तेव्हां । ज्ञान -दीप ॥२७२॥

पार्था , ज्ञानदीप । मालवतां देख । तयांसी काळोख । अंतर्बाह्य ॥२७३॥

म्हणोनि पासीं च । असोनि मी दूर । जाहलों साचार । तयांलागीं ॥२७४॥

मग सर्वभावें । पूजिती ते देख । दैवतें अनेक । इष्ट जीं जीं ॥२७५॥

आधीं च ते पार्था । प्रकृति -आधीन । वरी झाले दीन । भोगासाठीं ॥२७६॥

कौतुकें ते पाहें । मग भोगासक्त । पूजिती दैवत । कैशा रीती ॥२७७॥

पाळिती नियम । जे जे आवश्यक । जमविती देख । पूजाद्रव्यें ॥२७८॥

यथाविधि कैसें । करावें अर्पण । घेती तें जाणोन । विहित जें ॥२७९॥