Get it on Google Play
Download on the App Store

अभंग २१ ते २७

२१) नेणता म्हणूनी चाळविसी मज । परी जीवीचें गुज कळेचिना ॥१॥
न कळे न कळे तुमचें मानस । मी तो कासाविस जीवें झालों ॥२॥
बोलतां न येचि बहुत प्रकार । प्रथमचि भार वागविला ॥३॥
कर्ममेळा म्हणे ऐक पंढरीराया । बोलियेलें वाया बोल नको ॥४॥

२२) पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें । तें वर्म ठावें झालें आतां ॥१॥
नष्ट क्रियमाण होसी तूंचि देवा । काय बा केशवा म्हणों तुज ॥२॥
विश्वाचा साक्षी असोनि वेगळा । तयासी लागला बोल देवा ॥३॥
कर्ममेला म्हणे तुमची हे नित । तुम्हासी उचित गोड वाटे ॥४॥


२३) बहु अपराध घडले मजसी । म्हणोनी तुम्हांसी पडली तुटी ॥१॥
आमुचें संचित जैसें जैसें आहे । तैसें तैसें होय आपेआप ॥२॥
तुम्हांसी हो बोल नाहीं नारायणा । आमुच्या आचरणा ग्वाही तुम्ही ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुम्हांसी बोल । वाया काय फोल वेंचूं देवा ॥४॥

२४) भरंवसा मानिला परी झाली निरास । म्हणोनी कासावीस जीवें झालों ॥१॥
बोलिल्या वचना तें कांही साचपण । नयेचि दिसोन अद्यापवरी ॥२॥
किती किती मन आवरूनी धरूं । कवणासी विचारूं पुसूं आतां ॥३॥
कर्ममेळा म्हणे कर्महीन माझें । भोगणें सहजें सहज असे ॥४॥

२५) संतांची संगती आवडे या जीवा । आणिक केशवा दुजें नको ॥१॥
वाया हाव भरी होऊं नेदीं मन । राखा आवरोन तुमचें तुम्ही ॥२॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा । परवावी आशा हीचि माझी ॥३॥


२६) साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं । जावोनी कपाटी काय पाहूं ॥१॥
सुंदर श्रीमुख विटे जें शोभलें । कर मिरविले कटावरी ॥२॥
तो हा श्रीहरी उभा भिवरेतीरीं । भक्तां अभयकरी पालवितो ॥३॥
कर्ममेळा म्हणे सर्व सुखाचें आगर । तो हा विटेवर उभा असे ॥४॥

२७) सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं । पूर्वीच निर्धारी बांधियेली ॥१॥
आतां का वाईट म्हणो कशासाठीं । आपुली ती राहाटी भोगूं आम्ही ॥२॥
तुम्ही तो व्यापक सर्वांसी निराळें । आमुची कर्मफळें भोगूं आम्ही ॥३॥
कर्ममेळा म्हणे वचन प्रमाण । आमुची निजखूण कळली आम्हां ॥४॥