Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

संत आणि राजा

एक दानशूर राजा होता. राजाची ख्याती ऐकून एक संत त्याच्या दरबारात आला. तो राजाला भेटायला राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला,''मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला,"महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते माजखोर आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल.

तात्पर्य- स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो.