Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भाग 3

कथा : धरणातलं गाव 

लेखक : तेजस भोसले 

           भाग :3 

    बाबू बारका होता . आणि सगळी पोर अंगणामधी खेळत होती . परिस्थिती तशी बेताचीच होती. खायला एक वेळ भेटायचे तर कधी कधी पाण्यावरच भागवायला लागायचे. घरात खाणारी मानस पाच आणि कमवणारा माणूस एक आणि तोही नाय नोकरी नाय धंदा फक्त भागवायच चाललं होतं माश्याच्या धंद्यावर . ते बी घावल तर घावल नाय तर नाय. मास धरून पार नदी पार करून पलीकडच्या गावात मास इकायला जायला लागायचं. आणि ते बी एखाद येळला  नावाडी जागेवर असला तर बरं . आणि असला  तर मानस येई पर्यंत तो ही वाट पाहत असे. मग तो पर्यंत इकडे सकाळी ताज मास धरल्याल पाक शिळपटवून जायचं. मग गिरायक भी कमी भावानं मास घेत असत .  मग आल्याला पैशात दाजी दारू पिऊन येई. मग त्या दिवशी सगळी गप उपाशी झोपी .

असाच एक दिवस पोर लहान असताना बाबू च्या पाठीवरचा सुरेश आम्ही सगळी अंगणात खेळत होतो . दाजी आलं आणि सुरेश ला अंगणातून घेऊन गेलं.

नदीला जाळ टाकलं होतं याला काटावरती बसवला होता . आज पोरानं काय खाल्लं नव्हतं म्हणून हौसा काकी जरा काळजीत होती.

शेजारणींन दारका आक्का न जरा कन्या दिल्या होत्या . आणि पोरासनी बोलवायला बाहेर आली होती . बगते तर धाकटा नाय. तवा तिला समजलं की दाजी घेऊन गेलं. आज जरा तिच्या काळजात धस्स झालं. आज सकाळीच टिटवी घरावरून वळसा घालून खालच्या बाजूला गेली होती.रात्री दारात कुत्रं गळा काढून रडत होत. आणि मन भी जरा नाराजच होत. त्यातच हिच्या मनात आज कालवा कालव झाली होती. हौसा काकी मनालाच म्हणाली असलं काय तरी म्हणून बाबू ला घेऊन गेली. आम्ही आमचा डाव रंगात आला होता आम्ही पोर डावात मग्न होतो. इकडे दाजी पाण्यात उतरला होता . घट्ट झाडी नदीच्या कडला. सकाळच्या उन्हाची तिरपी किरण पडत होती . जरा सूर्य वर येऊन भी आज रात कीड झाडावर वरडत होत. वाळू थोडी थोडी तापत होती. आणि हिकडं सुरेश पाण्यात दगड मारत बसला होता.

        आज दाजी न बरोबर भी कोणाला आणलं नव्हतं. फक्त सुरेश आणि दाजी. कडन झाडांची चांगलीच कींजाळ वाढली होती. जंगली प्राण्यांनी धुडगूस घातला होता. रात्री 8 पुढ रस्त्यावर यायचं म्हंटल की एखाद अस्वल किंवा वाघ किंवा रान डुकरं नेमकं आडवं असायचं. चांगलं चांगलं विषारी साप तर रस्त्यावर इटूळ घालून बसलेलं असायचं  अशा वेळी जीव मुठीत घेऊन जायला लागायच. आज दाजी पाण्यात उतरलं होत इकडे सुरेश ला फुल पाखरू दिसलं. सुरेश फुलपाखराच्या मागे पळत सुटला . कशाचं ही भान नव्हतं. फक्त तो पळत होता. फुलपाखरू वेली वरून ते आता घाणेरी वर चढलं होत. घाणेरी वरून ते गारवेळावर आणि सुरेश त्याच्या मागून पळत सुटला होता. ते हळूच त्याच्या हाताला लागायचं आणि पुढच्या क्षणी ते पुढे उडायचे आता तर ते गवतावर आल होत. गवत चांगलच दाट होत. सुरेशला मात्र कशाचं ही भान नव्हतं. तो मात्र फुलपाकराच्या मागून पळत होता. बागडत होता .मनात त्याला फक्त पकडण्यासाठी जिद्द होती. त्याला कशाचं ही भान नव्हतं.सुरेश आता त्या फुलपाखराच्या पाठीमागून दाट गवतात शिरला होता. गवताच्या मध्ये थोडं घोट्या इतकं पाणी होत . हा अनवाणी पायाने त्याच्या पाठी मागे पळत होता . पळत होता. इतक्यात फुलपाखरू फुलाच्या झाडावर बसलं आणि हा हात घालणार इतक्यातच त्याला काय तरी चावल. क्षणात सुरेश ने हात झटकला. मुंग्या पार डोक्या पर्यंत गेल्या . वेदना असह्य झाल्या. डोळ्या पुढे अंधाऱ्या नाचू लागल्या आणि तोंडातून जोरात आवाज आला आई ग मेलो.... वाचीव मला..... असा आवाज शांत वातावरणात घुमला त्याचे ते रडणं थोडं वातावरणात घुमल. आर्त किंकाळीन  पाक आभाळ गरजल आणि तशीच हाक दाजी च्या कानावर पडली . दाजीच्या हातातलं जाळ तसच खाली पडलं . पायाखालची वाळू सरकली. मगा पासून माशावर खेळणारी नजर आणि मासे शोधणारी नजर आता पोराला शोधू लागली.काळजाच्या तुकड्याला शोधू लागली.पेलेली दारू झटकन उतरली. नशा कधीच पळाली . आणि नजर सगळी किनारा शोधू लागली. नदीचा काट नजरेने कधीच पार केला होता. हृदय आता जोरात धडधड करत होत. पाण्या मधून बाहेर यायचं सुधारत नव्हतं. कस बस आता दाजी पाण्याच्या बाहेर आला होता. बगतो तर पोरग नव्हतं. दाजी ला जायचं कोठे ते आता सुधारत नव्हतं. काय करावं ते सुचत नव्हतं. पोरग का वराडल तेच कळत नव्हतं. दाजी खाली बसला. घाम आता धरधरून फुटला होता डोळ कवाच पाण्यानी डबडबल होत. देवा काय करू कोठे जाऊ असा देवाचा धावा चालू होता. सुरेश ये सुरेश..... आर कुठयस असा आवाज दिला होता. पण परत उत्तर आलं नव्हतं .देवा वाट दाखिव र.... पोरग हाक भी परत देत नाया र .. भरल्या कंटानच दाजी आभाळाकड बगत म्हणत होता. आणि त्याची नजर नदी काठच्या चिखलाकड पडली त्यात सुरेश ची पावलं उठली होती. दाजी ला सुरेश ची वाट सापडली होती . आता दाजी त्या वाटेने सरळ चालला होता. वाळूतून पावलं भी झटाझटा उचलत नव्हती. जमीन नुसती सरकत होती. अंगावरची बंडी घामानं चिप झाली होती. सुरेश ये सुरेश... आर बोल की काय झालं असं म्हणत दाजी पायाखालची जमीन तुडवत चालला होता. डोळ्या पुढं अंधार्या असताना ही चालत होता  आता दाजी घाणेरी बगून गावताकड निघाला होता.. 

अजून ही त्याला सुरेश चा पता लागला नव्हता . जीव नुसता कासावीस झाला होता . पोराच्या काळजीनं आता धड धड पन जोरातच वाढली होती. डोक्यात इचारांचं काहूर माजलं होत. इकडं टिटवी जोर जोरात वरडत होती. काय करावं ते काहीच सुचत नव्हतं नजर फक्त सुरेश ला शोधत होती...

      आता नजर गवत पार करून पुढे सरकली होती आणि दाजी पुढे पाहत राहिला होता . पाहतो तर.......

क्रमशः