Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

अभिमन्युचे वय

हा प्रश्न विचारला असतां महाभारताशी कमीजास्त परिचय असलेल्या बहुतेकांचे उत्तर १७-१८ वर्षांचा नवतरुण होता असें येईल. पण हें बरोबर आहे का?
थोडासा विचार केला तर लक्षात येईल कीं हें शक्य नाहीं. पहा बरें! अभिमन्यूच्या जन्मानंतरच द्रौपदीच्या पांच पुत्रांचा जन्म झाला असें महाभारतच म्हणते. अर्थातच द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र (सहदेवाचा) अभिमन्यूपेक्षा ७-८ वर्षांनी तरी नक्कीच लहान होता. राजसूय यज्ञाचे वेळी द्रौपदी अगदीच लेकुरवाळी होती असें महाभारत म्हणत नाही, म्हणजे हा पुत्र २-३ वर्षांचा तरी झाला होता असे मानणे भाग आहे म्हणजे अभिमन्यु निदान १० वर्षांचा झालेला होता! राजसूय यज्ञानंतर काही महिन्यांचा काळ दुर्योधनाचे व शकुनीचे कुटिल बेत ठरून व धृतराष्ट्राची त्याला मान्यता मिळण्यात गेला. मग द्यूत झाले आणि त्यानंतर १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात गेले. अर्जुन प्रगट झाला तेव्हा ग्रीष्म ऋतु चालू होता असे भीष्माने स्पष्ट म्हटलेले आहे. त्यानंतर कार्तिक अमावास्येपर्यंतचा काळ - सहा महिने - कृष्णशिष्टाईपर्यंत व युद्धाला सुरवात होईपर्यंत गेला. तेव्हा युद्धाचे वेळी अभिमन्यु कमीतकमी २४ वर्षांचा नक्कीच झाला होता. द्रौपदीचे सर्व पुत्र युद्धात लढले होते व शेवटच्या दिवशी अश्वत्थाम्याकडून मारले गेले. त्या सर्वाना भीष्माने रथी ठरवले होते. द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र युद्धात सक्रीय भाग घेत होता तेव्हां तो १७-१८ वर्षांचा तरी असला पाहिजे हेहि अभिमन्यूच्या वयाशी व दोघांच्या वयातील फरकाशी जुळते. अज्ञातवासात विराटाची कन्या अर्जुनापाशी नृत्य शिकत होती व ती लहान होती असा उल्लेख असल्यामुळे (तिने आपला भाऊ उत्तर याला कौरवांची उची वस्त्रे मला बाहुल्या करण्यासाठी घेऊन ये असे म्हटले होते व अर्जुनाने कौरववीरांचा पराभव केल्यावर उत्तराकडून तसे करून घेतले)आणि तिचा अभिमन्युशी अज्ञातवास संपल्यावर लगेचच विवाह झाला तेव्हा तोही नवतरुण - १८ वर्षांचा - होता असा गैरसमज आपण करून घेतो! पण तो गैरसमजच! प्रत्यक्षात द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र १७-१८ वर्षांचा व अभिमन्यु २४-२५ वर्षांचा होता हे खरे!