Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

महाभारतातील कर्णकथा - भाग १३

कर्णाबद्दलचे हे लेखन फार विस्तारले. या लेखनात कर्ण व अर्जुन यांची तुलना वेळोवेळी करणे आवश्यकच होते. अर्जुन हा महाभारताचा एक नायक तर कर्ण हा प्रतिनायक, भीम नायक तर दुर्योधन प्रतिनायक असे म्हणता येईल. मी खलनायक असा शब्दप्रयोग मुद्दामच केलेला नाही. कर्ण व दुर्योधन या दोघांमध्येहि अनेक उत्तम गुणहि महाभारतकारांनी मुक्तपणे वर्णिले आहेत. कर्णाचे शौर्य व दातृत्वगुण निर्विवाद आहेत. दुर्योधनाबद्दलहि तसेच म्हणावे लागते. मात्र अखेर, महाभारतकारांना कर्ण हे गुणांपेक्षां दोष जास्त असलेले व्यक्तिमत्त्व रंगवावयाचे आहे याबद्दल शंका नाहीं. कर्णातील उणेपणा हा त्याच्या (माझ्या तर्काप्रमाणे ) सूताचा पुत्र म्हणून झालेल्या जन्मामुळे वा सूतपुत्र म्हणून आयुष्य व्यतीत करावे लागल्यामुळे आला असें खरे तर म्हणतां येणार नाहीं. सूत सर्व प्रकारच्या मानसन्मानापासून वंचित होते असे दिसत नाही. सूतांचे स्वत:चे स्वतंत्र राज्य होते. त्या राज्यात गेलेले असताना अधिरथ व राधा यांना कर्ण मिळाला असे म्हटले आहे. विराटाची पत्नी सुदेष्णा ही सूतकुळातील होती व तिचा भाऊ कीचक हा विराटाच्या राज्यात सर्वेसर्वा होता. तेव्हा सूतांचे स्थान क्षत्रियाच्या किंचित खालचे मानले जात असावे. कर्णाचे सुरवातीचे (धनुर्विद्येचे ) शिक्षण कोठे झाले याचा काही उल्लेख नाही पण परशुरामाकडे जाण्यापूर्वी बरीच प्रगति झालीच असणार.
कर्णाला आपण कुंतीपुत्र आहोत हे कळण्याचा काही मार्ग नव्हता. (कृष्ण वा कुंती यांनी सांगेपर्यंत). त्याने कौरवदरबारात आपली धनुर्विद्या प्रगट केली तेव्हा लगेचच दुर्योधनाने त्याला आयुष्यभरासाठी जवळ केले. सर्व मानसन्मान व वैभव त्याला प्राप्त झाले होते. त्यापुढील त्याचे आयुष्य सुखाने जाण्यास काही हरकत नव्हती. पण दुर्योधनाची मैत्री त्याला तशी महागच पडली म्हणावे लागते कारण नंतर आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कुटिल बेतांमध्ये त्याला सामील व्हावे लागले. त्याने ते स्वखुषीनेच केले असे दिसते. घमेंडखोर व उद्धट स्वभावामुळे त्याला बढाया मारण्याची खोड जडली. परशुरामाकडून मिळवलेल्या विद्येवर तो संतुष्ट राहिला. उलट अर्जुनाने द्रोणापासून मिळवलेल्या विद्येवर संतुष्ट न राहातां अधिक कौशल्य मिळवण्यासाठी धडपड केली. अखेरच्या युद्धापूर्वी तो असे साधार म्हणू शकला की आज माझ्याकडे जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान द्रोणाला वा भीष्मालाहि नाही! सर्व दृष्टीने विचार करतां असे म्हणावे लागते कीं कर्णाच्या दोषांनी अखेर त्याच्यातल्या गुणांवर मात केली. हा विषय मी येथेच संपवीत आहे. या लेखनाला उदंड वाचक लाभले व प्रतिसाद मिळाला. मतभेद हे असणारच. तुमच्या सर्वांच्या मतांचा मी आदर करतो. धन्यवाद.