A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessionjc9unrpslhroap02qp4kthurpmm892gh): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 316
Function: require_once

भवानी तलवारीचे रहस्य (धारावाहिक कादंबरी) | तलवारीचे आगमन | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तलवारीचे आगमन

अंधार पसरला होता. दूरवर कोल्हेकुहि ऐकू येत होती. आकाशांत तारे चमकत होते. काळ्या फरशीवर दुध सांडले असावे असे आकाशाकडे पाहून वाटत होते. आई साहेबांची चर्या गंभीर होती. भट्ट पर्णकुटीत आंत जमिनीवर पडले होते, घोडदौडीची त्यांना सवय नव्हती. त्याशिवाय एक तीर त्यांच्या पाठीत घुसला होता. सेविकाने सध्या मलम पट्टी करून रक्तस्त्राव थांबविला होता. आईसाहेबांकडे अफूच्या गोळ्या होत्या, गोळीने भट्ट वेदना सहन करू शकत होते पण त्यांचे मन भ्रमित झाले होते. तीन अश्व पर्णकुटी बाहेर बांधले गेले होते, त्यांच्या नाकपुड्यातून येणारे बाष्प हवेतील थंडीचा अंदाज देत होते.

"आम्ही कुठे आहोत आपल्याला ठावूक आहे का?" सेविकेने जवळ येवून आई साहेबाना प्रश्न केला. राज घराण्यांत स्त्रियांची नक्की किंमत काय असते हे एक गूढ असते. कधी कधी महाराणी असून सुद्धा राणीला एक पैसा खर्च करण्याची अनुमती नसते तर कधी कधी महाराणी च्या गारुडाने भारावून जावून राजा होत्याचे नव्हते करून टाकतो. अंतःपुर म्हणजे एक बुद्धिबळाचा पटच असतो, इथे सर्व प्रकारचे खेळ चालत असतात. अन्तःपुरातील राजकारण बाहेर कधी पडत नाही. आईसाहेबाना मान सन्मानाची पर्वा नव्हती, त्यांचे ध्येय वेगळे होते म्हणून त्यांनी आपल्या सेविका अतिशय काळजी पूर्वक निवडल्या होत्या. त्यांची सेविका रजपूत घराण्यातील होती. अनाथ पोरीला आयीसाहेबानी दया दाखवून आश्रय दिला पण त्याच क्षणी गुप्तपणे हेरगिरी, युद्धकला, शृंगार कला इत्यादी सर्व काळांत पारंगत केले. मान खाली घालून सर्वत्र संचार करणारी हि सेविका म्हणजे आयीसाहेबांचे त्रितीय नेत्रच होते. सेविका महाराणीशी कधीही बोलायची नाही. त्यांचा जो काही संवाद व्हायचा तो एकांतांत.

"हि पर्णकुटी एके काळी वज्रमुनीची होती. नावावर नको जावूस, ते काही प्रत्यक्षांत मुनी वगैरे नव्हते. " आईसाहेब

"मग" सेविकेने विचारले.

"अशी दंत कथा आहे कि अनेक वर्षांपूर्वी एका मुसलमान सुलतानाने अफगाणिस्तानातून भारतावर आक्रमण केले, त्याचा उद्देश लुटपाट माचवायचा होता. राजस्थानातील वाळवंटात त्या काळी एक लहान राजपूत राजा होता त्याने त्या सुलतानाला रोखण्याचा प्रयत्न केले पण सुलतानाच्या फौजेपुढे त्याचा पूर्ण प्रभाव झाला. सुलतानाने सर्व पुरुषांचे शिरकाण केले, स्त्रियांचा बलात्कार केला लहान मुलांना गुलाम बनवून पुन्हा अफगाण प्रदेशांत नेले. "

"आणि वज्रमुनी?" सेविकेने कुतूहलाने विचारले.

"असे म्हणतात कि त्या लहान गुलामा मध्ये एक लहान मुलगा होता. काही म्हणतात कि तो त्या राजपूत राजाचा पुत्र होता तर काही म्हणतात कि कून ब्राम्हणाचा मुलगा. त्या मुलाने परदेशांत सर्व प्रकारचे त्रास सहन केले, शेवटी एका वाळवंटी प्रदेशातील चाच्या बरोबर त्याने पलायन केले. तो पुन्हा परत आला तो एक फौज घेवूनच. त्याने सुलतानाच्या महालांत घुसून प्रत्येक व्यक्तीचे शिरकाण केले. "

"सुलतानाचे धड म्हणे कापून संपूर्ण राजधानीत फिरवले. सुलातांच्या बेगमा, मुले कुणालाही त्याने सोडले नाही. ह्या योध्याचा वेग इतका प्रचंड होता कि कुणीही त्याच्या समोर टिकाव धरू शकला नाही. हजारो लोकांची हत्या त्याने केली आणि अनेक आख्याहिका मध्ये साक्षात काळ म्हणून त्याने आपले नाव कोरले. इतकी कत्तल झाल्यानंतर कदाचित त्याचा राग शांत झाला आणि तो भारतांत परत आला. त्याच्या पराक्रमा साठी अनेक भारतीय राजांनी त्याला आपल्या सेवेंत घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक विदेशी मारेकर्यांनी मारण्यासाठी त्याचा शोध सुरु केला. काहींच्या मते वज्र्मुनी आणखीन कोणी नसून तोच निनावी कठोर हृदयी खड्गधारी होता"

"म्हणजे त्या योध्याने सन्यास घेतला ? “ सेविकेने विचारले.

"नाही वेडे. वाज्र्मुनी काही मुनी नव्हते उलट इथे ते दारूची भट्टी चालवायचे. विविध प्रकारची रसायने बनविण्यात त्यांचा हाथखंडा होता. विविध प्रकारची मादक द्रव्ये, चमत्कारिक रित्या जखमा बरून येणारी दिव्य औषधी इत्यादी गोष्टी ते आपल्या खास मित्रांना देत असत. चोर, दरोडेखोर, सैनिक, साधू, वेश्या अश्या लोकांचा ह्या पर्णकुटीत भरणा असायचा. "

"मग आपणाला हे कसे ठावूक ? " सेविकेने विचारले

"जिथे बढाईखोर पुरुष आणि विभ्रमात माहीर अश्या स्त्रिया असतात तेथे जगातील चारी कोपर्यातील गुप्त बातम्या कमळाप्रमाणे फुलत असतात. वज्रमुनी म्हणूनच राजकीय वर्तुळांत फार चर्चित होते. त्यांचे नक्की काय झाले कुणाला ठावूक नाही पण हि पर्णकुटी अनेक वर्षां मागे आमच्या हेरांनी शोधून काढली होती. मुलुखातील कुठल्याही नकाशावर ह्याची नोंद नाही आणि म्हणूनच आम्ही इथे सुरक्षित राहू.”

आई साहेब इतके बोलून थांबल्या, दूरवरून घुबडाचे रडणे ऐकू येत होते. भट्ट झोपून गेले होते. इतक्यांत दुरून काही तरी हालचाल ऐकू आली आईसाहेब तत्काळ पर्णकुटीत अंत घुसल्या तर सेविकेने कमरेतील खंजीर काढून एका झुडुपाच्या मागे दबा घेतला.

हालचाल मंदावली तरी अंधारातून एक मशालीचा उजेड स्पष्ट दिसत होता. सेविकेच्या छातीतील धडधड वाढत चालली होती, जीव घेण्याचा अनुभव तिला होता पण समोर समोरील युद्धांत तिचा निभाव लागेल कि नाही ह्याची तिला शंका होती.

"घाबरण्याचे कारण नाही" मशालीच्या उजेडातून एका स्त्रीचा चेहेरा स्पष्ट झाला. "अग्निशिखा" सेविकेने तत्काळ तिला ओळखले.

अग्निशिखाला पाहून आई साहेब सुद्धा बाहेर आल्या.

"नमस्कार आईसाहेब, तुम्हाला शोधायला बराच त्रास पडला. पण हरकत नाही तुमच्या मुलाने वचन राखले आहे." अग्निशिखा बोलली.

"म्हणजे ? " आईसाहेबांनी आश्चर्याने विचारले.

"तुम्हाला ठावूक असेल असे वाटले होते. तुमची सेना रत्नागिरीच्या दिशेने बाहेर पडली आहे. म्हणे भाडोत्री तक्षक सेना सुद्धा तुमच्या पोरा बरोबर युद्ध करण्यास सज्ज आहे. " अग्निशिखाने वार्ता दिली.

आईसाहेबांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते.  आपला मुलगा असे काही करेल असे त्यांना वाटले नव्हते म्हणून तर हंबीररावांच्या हातावर तुरी देवून त्या गायब झाल्या होत्या.

"आमचे वचन पूर्ण झाले तर. मग आपले इथे येण्याचे प्रयोजन काय ? " आयीसाहेबानी अग्निशिखाला विचारले.

त्या अंधारांत, घुबडांच्या रुदनाच्या पार्श्वभूमीवर मशालीच्या उजेडात गोर्यापान अग्निशिखचा चेहरा खरोखर तिच्या नावाला सार्थ ठरवीत होता. आईसाहेबांच्या प्रश्नावर अग्निशिखा निशब्द उभी होती, तिच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य काही तरी सांगत होते पण आई साहेबाना ते वाचणे अशक्य होते. पण सेविकेच्या लक्षांत एक गोष्ट गेली कि आधीच्या प्रमाणे अग्निशिखा आज काली प्रमाणे बीभत्स वाटत नव्हती तर ती साक्षांत गौरी वाटत होती. केसांच्या जटा जावून केस मोकळे वार्यावर उडत होते, त्वचा चंद्र प्रकाशाप्रमाणे चमकत होती आणि शुभ्र उत्तरीय तिच्या वक्षस्थळांना आवृत्त करत होते.

अग्निशिखा हळू चालत पुढे आली. "तुमचा मुलगा रात्नागीरीत गेला जरी आहे तरी तो अश्या प्रकारे घाई करेल असे मला वाटले नव्हते. आमच्या गुरूंचे समर्थाशी बोलणे झाले आणि त्यांचे तुमच्या मुलाशी. रत्नागिरीत मृत्यू त्याची वात पाहत आहे. "

"असे नको बोलूस, माझ्या मुलाच्या जीवाचा सौदा मी नव्हता केला."  आईसाहेबांच्या बोलण्यात मातेची करुणा होती.

"नाही माझीसुद्धा ती अपेक्षा नव्हती. रत्नागिरीतील देवराईत साक्षांत असुर प्रवृत्ती वास करत आहे, त्यांना हरवायचे असेल तर त्या साठी तसेच शस्त्र हवे." अग्निशिखा गांभीर्याने बोलत होती तिच्या बोलण्यात नेहमीचा हेकेखोर पणा नव्हता तर दोष भावना प्रतीत होत होती.

"चला माझ्या बरोबर" अग्निशिखाने दोघांना सांगितले.

"भट्ट आंत जखमी आहेत" आईसाहेबांनी सांगितले.

अग्निशिखा नाराजीनेच पर्णकुटीत गेली, तिने खाली बसून भट्टाच्या जखमेचे निरीक्षण केले.

"जखम मोठी नाही त्यांचा जीव नक्की वाचेल." अग्निशिखाने आपले नेत्र मिटले. आपल्या झोळीतून एक थैली बाहेर काढली

तिने काही मंत्र पुटपुटून थैलीतून राख काढून भट्टाच्या भोवताली एक वर्तुळ काढले. नंतर ती उठली.

"ह्या मुले जंगली श्वापदा पासून त्यांचे रक्षण होईल, इथे येण्यापूर्वी मी हंबीररावाना  संदेश पाठवला होता, ते काही तासांत इथे हजर होतील. " अग्निशिखाने सांगितले.

"आपण माझ्या बरोबर येणे जास्त आवश्यक आहे. " अग्निशिखा आईसाहेबांची मर्जी जाणून घेण्यासाठी थांबली सुद्धा नाही.

अग्निशिखाने भट्टाच्या घोड्यावर मांड ठोकली आणि मशालीच्या उजेडात तिने पर्णकुटीच्या मागे वाटचाल सुरु केली. जंगल घनदाट होते आणि घोडा पुढे जाण्यास कुचराई करत होता पण तिघी जन कश्या बश्या पुढे जात राहिल्या. काही अंतरावर एक लांडग्यांचा कळप एका मेलेल्या हरणावर ताव मारीत होता, त्यांना वळसा घालुन त्या पुढे जात राहिल्या. बऱ्याच वेळा नंतर त्यांना एक लाकडी कुंपण दिसले, त्याच्या वर वेळी चढलेल्या असल्याने ते स्पष्ट दिसत नव्हते कुंपणाच्या बाहेर अग्निशिखाने आपले घोडे थांबवले.

तिघी जणांनी आता पायी आंत प्रवेश केला कुंपणाच्या आंत मध्यवर्ती एक झोपडी दिसत होती.

झोपडीच्या बाहेर एक कंदील वार्यावर झोके खात होता. झोपडीच्या बाहेर आणि कुंपणा च्या अंत फक्त सपाट जमीन होती. एक साधे पान सुद्धा त्या जमिनीवर नव्हते.

तिघांनी झोपडीच्या आंत प्रवेश केला. एका कोपर्यांत शुभ्र वस्त्र परिधान करून एक प्रौढ व्यक्ती बसली होति. चेहेर्यावरून त्यांना हे अथिति अपेक्षित होते असे वाटत होते.

अग्निशिखाने त्या माणसाच्या बाजूला जे मृगजीन होते त्यावर असं ग्रहण केले. पद्मासना ऐवजी ती वीरासनात बसली होती. तिने आई साहेबाना त्या व्यक्ती पुढे बसण्याची खुण केली. सेविका मात्र दारा पुढेच उभी राहिली.

धीर गंभीर आवाजांत त्या शुभ्र वस्त्र धारी माणसाने बोलायला सुरुवात केली.

"किती वर्षे झाली मला स्मरण होत नाही पण मी शपथ घेतली होती कि कुठल्याही जीवाची हत्या मी करणार नाही आणि हत्या करणारी साधने सुद्धा बनविणार नाही. आज मी स्व-इच्छेने हि शपथ मोडत आहे. शपथ अश्या साठी मोडत आहे कि एके काळी एका लहान जीवाला ज्याने अनन्वित अत्याचार सहन केले होते, वेदना रहित जीवन ज्याला ठावूक सुद्धा नव्हते अश्या जीवाचे बोट धरून एक महात्मा त्याला दूर घेवून गेला. लहान मुलांना दूर घेवून काय करतात हे त्या लहान जीवाला ठावूक होते पण त्या महात्म्याने त्या जीवाचे अश्रू पुसले, जखमावर मलम लावले आणि काहीही अपेक्षा न ठेवता आपल्या जवळचे सर्व ज्ञान दिले. आज न मागता सुद्धा त्या महात्म्याची मदत करावी हे मी माझे कर्तव्य समजतो. त्या साठी कितीही काल नरकांत राहावे लागले तरी मला त्याचे दुखः नाही."

"आजवर मी अनेक द्रव्ये निर्मिली, मागील जीवनात अनेक शस्त्रे बनविली पण आज कुठलाही अहम न ठेवता मी तुम्हाला सांगत आहे के हे जे मी शस्त्र बनवले आहे ते माझे सर्वश्रेष्ठ शस्त्र आहे. संपूर्ण पृथ्वी पालथी घातली तरी तरी अशी धार सापडणार नाही जी ह्या शास्त्राचा सामना करेल."

"निशंक पणे आणि सर्व देवताना मी साक्षी ठेवून सांगतो कि ह्या शास्त्राला धारण करणारा योद्धा फक्त अजेयच नाही तर संपूर्ण समाजाचा उद्धार करता ठरेल. त्याच्या मार्गांत साक्षात परमेश्वर जरी अडथळा बनून राहिला तरी सुद्धा ह्या तलवारीच्या धारेने त्याचे सुद्धा तुकडे होतील"

अग्निशिखाने अतिशय काळजीपूर्वक समोर शुभ्र वस्त्रांत गुंडाळून ठेवलेली तलवार काळजीपूर्वक उचलली, त्या साधूने तलवारीच्या मुठीला पकडून तालावर म्यानेतून बाहेर काढली. धातूचा अतिशय सुरेख आवाज आला. काळजीपूर्वक त्याने सर्व दिशांतून तलवारीचे निरीक्षण केले.

"कैलास पर्वताच्या पायथ्यावरून ह्या तलवारीचा धातू आला आहे, नरककुंड ज्वालामुखीतून त्याला वितळवनारी आग आली आहे आणि मी ज्याने हजारो मानवांचा संहार केला आहे अश्या भयानक हातानी ह्या तलवारीवर घाव घालून त्याला तेज प्राप्त केले आहे. त्यांत शिवाची तटस्थता, अग्नीची पवित्रता आणि कालीची संहारकता प्रतिष्ठित झाली आहे. ह्या तलवारीच्या स्वामीला मी माझा शुभ आशीर्वाद देतो."

आता पर्यंत हि व्यक्ती म्हणजे वज्रमुनिच आहेत हे आईसाहेब समजून चुकल्या होत्या. त्यांनी अत्यंत आदरपूर्वक तालावर त्यांच्या हातून घेतली.

"मुनिवर तुमच्या कथना प्रमाणे तुम्ही वज्रमुनी आहात असे वाटते पण दंथकथा, अख्याहीकाप्रमाणे तुम्ही शेकडो वर्षें आधी जन्मला होता, तसेच तुम्ही संन्यासी होता असे सुद्धा ऐकले नव्हते." आई साहेबांनी नम्र पणे  विचारले.

"काळाच्या प्रवाहांत सत्य लोक विसरू लागतात आणि सत्याच्या आख्याहिका बनून राहतात. कोणे एके काळी लोक मला वज्रमुनी म्हणून संबोधत होते, मी संन्यासी नव्हतो कि होतो मला ठावूक नाही. पण होय मी जुना आहे, बाहेर जो प्रचंड वटवृक्ष पहिला ना तो तेथे नव्हता होता ते सुद्धां मला आठवत आहे. मी धरती फिरलोय आणि समुद्र पालथे घातले आहेत. अनेक नावानी मला लोकांनी संबोधले आणि काळाच्या ओघांत अनेक दिव्य ज्ञान मी संपादन केले. असे ज्ञान जे घेण्याचे सामर्थ्य असलेला माणूस सध्या प्रथ्वीतलावर नाही. पण शेवटी सगळ्या गोष्टींचा अंत आवश्यक असतो, मला अंत आवडत नाही पण नाईलाज आहे. कदाचित हि तलवर बनविण्यासाठीच परमेश्वराने मला ठेवले होते. जा उशीर नको करुस वेळ फार कमी आहे. " वज्रमुनीनी हाथ वर करून आई साहेबांना आशीर्वाद दिला.

आग्निशिखच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिने साष्टांग नमस्कार करून मुनीचे आशीर्वाद घेतले. वाज्र्मुनी अगम्य भाषेतून मंत्र म्हणत होते, जणू त्यांची समाधी लागली होती. अग्निशिखा आईसाहेबाना आणि सेविकेला घेवून पर्णकुटीच्या बाहेर आली. बाहेर लांडगे, वाघ, हरणे, साप आणि कित्येक जंगली श्वापदे एकत्र उभी होती. क्षणभर सेविका आणि आईसाहेब भांबाहून गेल्या. पण अग्निशिखाने त्यांना शांत राहण्याचा संकेत केला. अग्निशिखाने मंत्र म्हणत आपल्या झोळीतून एक काचेची कुपी काढली एक निळ्या रंगाचे द्रव्य तिने झोपडीच्या बाहेरील दरवाजावर टाकले. दरवाजाने तत्काळ पेट घेतला. संथ गतीने निळ्या रंगाच्या ज्योतीने संपूर्ण कुटी उजळून निघाली.

"त्यांचा अंत इथेच लिहिला होता. आता फक्त मी राहिले. " अग्निशिखाने वळून आईसाहेबाना म्हटले. तिच्या शब्दांत दुखः होत इतसेच समाधान सुद्धा होते. जंगली श्वापदे आता पुन्हा गायब झाली होती.

"ह्या उजेडाने कदाचित हंबीररावाना इथे येण्याचा संकेत मिळेल. आपण त्यांच्या सोबत आपल्या मुलाला शोधा मी त्याला रत्नागिरीत भेटेन. हि तालावर त्याच्या हातांत पोचणे आवश्यक आहे. " अग्निशिखाने घोड्याला टांच दिली आणि काळ्या ढगांत चंद्राने गडप व्हावे तशी ती गायब झाली.

"मी आज वर अनेक अजब गोष्टी आणि अनेक अजब लोक पहिले पण आजचा अनुभव मात्र सर्वांत विशेष होता. " सेविकेने आई साहेबाना म्हटले.  आई साहेबांनी प्रत्युत्तरा दाखल काहीही म्हटले नाही त्या निशब्द पणे हातातील तलवारीला पाहत राहिल्या.


A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_write_close(): Failed to write session data (user). Please verify that the current setting of session.save_path is correct (/tmp)

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: