Get it on Google Play
Download on the App Store

गरुड आणि चिमणी

एकदा एक गरुड एका लहान सशाला आपल्या चोचीत पकडून एका झाडावर जाऊन बसला. त्या सशाने गरुडाला बरीच विनवणी करून जीवदान मागितले. त्या झाडावरील एका चिमणीनेही त्याची विनवणी केली व सशाला सोडून देण्यास सांगितले, पण गरुडाने त्यांचे न ऐकता त्या बिचार्‍याला फाडून खाल्ले. चिमणीला या कृत्याबद्दल फार वाईट वाटले व त्या गरुडाचा सूड घेण्याचा तिने निश्चय केला. गरुडाच्या मागोमाग जाऊन त्याचे घरटे तिने पाहून ठेवले. एक वेळ तो घरी नसताना त्याची अंडी घरट्यातून तिने बाहेर ढकलून दिली. तेव्हा ती अंडी खाली पडून फुटली. दुसर्‍या वेळी गरुडाने खूप उंचावर घरटे बांधून तेथे आपली अंडी ठेवली. पण चिमणीने तेथूनही ती अंडी खाली पाडून फोडून टाकली. तेव्हा गरुडाने ही सर्व हकीगत वनदेवाच्या कानावर घालून त्याची मदत मागितली. तेव्हा आपल्या मांडीवर अंडी घालण्याविषयी वनदेवाने गरुडाला सांगितले. त्याप्रमाणे गरुडाने वनदेवाच्या मांडीवर अंडी घातली. एकदा वनदेवाचे लक्ष नाही असे पाहून त्या चिमणीने संधी साधून त्याच्या पायाला कडकडून चावा घेतला. तेव्हा वनदेव घाबरून उठला. त्यामुळे ती सर्व अंडी खाली पडून फुटली. नंतर वनदेवाने गरुडाला व चिमणीला आपल्यासमोर बोलावून सर्व हकीगत विचारली. तेव्हा प्रथम खोडी गरुडानेच केली असे त्याला समजले. तेव्हा त्याने चिमणीलाही सोडून दिले.

तात्पर्य

- जुलमाचे राज्य थोडे दिवस भरभराटीचे दिसले तरी त्याचा नाश व्हायला एखादे क्षुल्लक कारणही फुटते.