Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय तेरावा

तेराव्या अध्यायाचे सार

श्रीनिवास पद्मावती हे दोघे विवाह झाल्यावर अगस्त्याश्रमात राहात असता नारायणपुराहून एक दूत आला. व त्याने आकाशराजा मरणोन्मुख असल्याचे वृत्त सांगितले असता लगेच पद्मावतीला घेऊन श्रीनिवास नारायणपुरास आले. त्यावेळी आकाशराजा शेवटच्या स्थितीत होता. श्रीनिवास आल्याबरोबर आपल्या मुलाचे व भावाचे रक्षण करण्यास सांगून राजाने देहत्याग केला. त्यावेळी सामान्य माणसाचे विडंबन करणार्‍या श्रीनिवासाने शोक केला. पद्मावतीस फार दुःख झाले राजपत्नी धरणी देवी ही आकाशराजाबरोबर सती गेली. मग राजाची उत्तरक्रिया आटोपल्यावर श्रीनिवास पद्मावतीसह अगस्त्याश्रमास परत आले.

यानंतर राज्यासाथी तोंडमान (आकाशराजाचा भाऊ) व वसुधान (आकाशराजाचा मुलगा) या दोघात कलह उत्पन्न होऊन युद्धाची पाळी आली. दोघांनीहि युद्धात साहाय्य करण्याविषयी श्रीनिवासास विनविले. त्यावेळी पद्मावतीच्या सूचनेप्रमाणे स्वतः श्रीनिवास वसुधानास साहाय्य करण्यास तयार झाले व तोंडमानास आपली दिव्य आयुधे शंख व चक्र हे दिले. दोघांना साहाय्य करण्याकरिता नानादेशाचे राजे साहाय्यासाठी आले एकूण दोन्ही बाजूने दोन अक्षौहिणी सैन्य जमले व त्या दोघांत भयंकर युद्ध चालू असता तोंडमानाच्या मुलाने श्रीनिवासावर चक्र सोडले. त्याबरोबर श्रीनिवास मूर्च्छित होऊन पडले असता, पद्मावती तात्काळ रणांगणावर आली व तिने श्रीनिवासास उपचार करून सावध केले. नंतर अगस्त्यमुनीनी व पद्मावतीने सांगितल्यावर हे भीषण युद्ध थांबविण्यासाठी तोंडमान वसुधान यांच्यामध्ये तडजोड केली. तोंड देशाचा भाग तोंडमानास व नारायणपुराचा भाग वसुधानास दिला. नंतर दोघांच्या घरी वास्तव्य करून भोजन केले. दोघात तडजोड केली. म्हणून तोंडमानाने व वसुधानाने बत्तीस गावे श्रीनिवासास अर्पण केली. पुनः त्यानंतर श्रीनिवास व पद्मावती अगस्त्याश्रमास येऊन आनंदाने राहू लागली.

तेराव्या अध्यायाचे सार समाप्त