Get it on Google Play
Download on the App Store

संत नामदेव

‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक!

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांचा बहिश्र्चर प्राणहोता. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता. पंढरीच्या भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली.

दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सर, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे भूवैकुंठी, पंढरीमध्ये गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरोबांकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. (ह्या प्रसंगाचा उल्लेख तपशीलातील छोट्या-मोठ्या फरकांसह संतविषयक साहित्यात आढळतो.)

संत नामदेवांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वत:ला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे साठ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्र्वरांचे चरित्र सांगितले आहे.

संत ज्ञानेश्र्वरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. सर्व संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्गग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लध्धा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही यांची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये ( शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी ) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.