All Marathi Stories
हिंमत होईल का?
एका गावी नारायण व शिवराम नावाचे दोन शेतकरी राहत असत. एकदा शिवराम आठवड्याच्या बाजाराला निघाला, तेव्हा त्याला नारायणाने विचारले— "मित्रा, तू काय खरेदी करणार आहेस?" उत्तरादाखल शिवराम म्हणाला— "मी एक गाय विकत घ्यायला निघालो आहे." ते ऐकून नारायण म्हणाला— "तर मग आपणा दोघांना व्यर्थ त्रासातून वाचता येईल. कारण मी आपली गाय विकायला आज जाणार होतो. तू माझ्या घरी येऊन गाय पाहून जा." शिवरामने गाय पाहून तीनशे रुपयांना नारायणची गाय विकत घेतली आणि गाय घेऊन गेला. त्याच दिवशी रात्री ती गाय कोणत्यातरी आजाराने मेली. शिवरामने रात्री गाय मेल्याचे सांगून नारायणकडून आपले पैसे परत मागितले. परंतु नारायण त्या गोष्टीस कबूल झाला नाही. तेव्हा शिवराम त्या गावाच्या पोलीस पाटलाकडे गेला. पोलीस पाटलाने नारायणला बोलावून दोघे म्हणाले ते ऐकले व नारायणला म्हणाला— "रात्रभरात गाय मेली म्हणजे गाईला पहिल्यापासून काहीतरी आजार होता. तू शिवरामला तीनशे रुपये परत दे!" पण नारायण ते मानायला तयार होईना. तेव्हा पोलीस पाटील क्षणभर विचार करून म्हणाला— "नारायण, मी जर ही गाय खरेदी करून शिवरामसारख्या परिस्थितीत सापडलो असतो तर तू काय केले असतेस?" "अहो, तुमच्यासारख्या पोलीस पाटलाच्या हाती ती गाय विकायची हिंमत मला होईल का?" नारायण तत्क्षणी उत्तरला. नारायणची लबाडी सहजच प्रगट झाली. तेव्हा पोलीस पाटलाने नारायणकरवी शिवरामला गाईची किंमत तीनशे रुपयांबरोबर शंभर रुपये दंड म्हणून वसूल करून देववले.