All Marathi Stories

हरपलेलें अमरत्व

विक्रमाकानें हट्ट सोडला नाहीं. तो पुन्हा झाडाजवळ गेला. झाडावरचें प्रेत काढून तें खांद्यावर टाकलं व स्मशानाच्या दिशेनें चालू लागला. तेव्हां प्रेतांत बसलेला वेताळ त्याला म्हणाला— "या मध्यरात्रीच्या वेळीं तूं कोणत्या फळाची आशा ठेवून इतका कष्ट सहन करीत आहेस हैं मला समजत नाहीं. पण तुला माहीत असेलच, मिळालेलें अमरत्व सुद्धां चारुकेशी सारखा मनुष्य गमावून बसतो. तुझा चालण्याचा श्रम अल्प का होईना, कमी करण्यासाठी मी चारुकेशीची गोष्ट सांगतों." असें सांगून वेताळ गोष्ट सांगू लागला. गांधार देशावर बाळबंटांतल्या एका राज्याच्या लोकांनीं स्वारी केली तेव्हां गांधार देशांतील छोटेखानी राज्यें त्यांना अडवू शकली नाहींत. गांधार देशाच्या प्रजेचा कोणी वाली उरला नाहीं. तेव्हां गांधारिय नावाच्या एका शूर तरुणानें देशभर हिंडून देशाच्या तरुणांना देशरक्षणासाठीं आवाहन केलें व त्यांची संघटना करून एक सैन्य उभें केलें. या सैन्यानें शत्रूला देशाबाहेर हांकलून लावलें व गांधार देश स्वतंत्र केला. गांधारियच्या अनुयायांना देखील गांधारिय हेंच नांव पडलें. गांधारियंच्या प्रयत्नानें गांधार देश पुन्हां शस्यश्यामळ व सुखी झाला. गांधारियनां दुसऱ्याचें राज्य जिंकण्याची महत्त्वाकांक्षा कधींच नव्हती. म्हणून युद्ध संपल्यानंतर सर्वत्र शांतता नांदू लागली. आपल्या शक्तीचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांनीं शिकार करण्यास सुरवात केली. एकदां ते वसंत ऋतूंत शिकारीसाठीं हिंदुकुश पर्वतावर गेले. त्यांच्या बरोबर गांधारियचा मुलगा चारुकेशी पण होता. इतर लोक शिकार करीत हिंडत असतां तो एका उंच शिखरावर बसून एका खोल दरीचें दृश्य पाहू लागला. पाहतां पाहतां दरीच्या पायथ्याशीं असलेल्या एका सरोवरांतून ढगासारखें कांहींतरी वर आलें. तो ढग बसला होता तेथपर्यंत आला व एकदम फुटला व त्यांतून एक विमान प्रगत झालें. त्या विमानांत एक देवकन्या बसलेली होती. तिचें सौंदर्य पाहून चारुकेशी चकित झाला. विमान चारुकेशीसमोरच थांबलें. देवकन्या त्याला म्हणाली— "मी चक्रवर्ती विद्याधरयाची मुलगी आहें. आमच्या घराण्याच्या सर्व स्त्रियांना विद्याधरनी म्हणतात. कित्येक दिवसांपासून माझें मन तुझ्यावर बसलें आहे. मी आपल्या वडिलांच्या परवानगीनें तुझ्याशीं विवाह करण्याच्या हेतूने आलें आहें. तूं माझ्याशीं लग्न केलेंस तर तुला देखील अमरत्व लाभेल, तुला वार्धक्य येणार नाहीं व मरणाची भीतीपण उरणार नाहीं. रोगांचें भय नाहीं. आपण दोघें सुखांत वर्षानुवर्षे आयुष्य घालवू." चारुकेशीला तें सर्व स्वप्नासारखें वाटलें. त्याला त्या आकस्मिक प्रसंगी काय करावें हें सुचेना. तो यंत्रवत सरळ विमानांत जाऊन बसला. विमान उडूं लागलें. गांधारियंनीं तें पाहिलें व मोठमोठ्यानें ओरडूं लागले, परंतु त्यांचा आवाज त्याला ऐकू आला नाहीं. विमान पर्वत, नद्या, समुद्र ओलांडून विद्याधर लोकांत पोंचलें. चारुकेशीला इतक्या सुंदर देशाची कल्पना देखील नव्हती. तेथील प्रत्येक घर, वृक्ष, लता व लहान लहान रोपटें इतकीं सुंदर होतीं कीं जणूं कांहीं विश्वकर्म्यानें स्वतःच्या हातानेंच तीं घडवलीं होतीं. तेथें एक देखील कुरूप मनुष्य नव्हता. चक्रवर्ती विद्याधर स्वतः चारुकेशीच्या स्वागतासाठीं सामोरा आला. त्याच दिवशीं चारुकेशी व विद्याधरी या दोघांचें लग्न झालें. राज्यांतले सर्व मानकरी व दरबारी लग्नाला हजर होते. चारुकेशी स्वदेश व गांधारिय प्रजेला पार विसरून गेला. विद्याधरीच्या सहवासांत त्याला या सर्व गोष्टींची आठवण कोठून असणार? चिंता व काळजी नांवाच्या वस्तु त्याच्या मनाला कधीं शिवली देखील नाहीं. त्यानें इच्छिलेली वस्तु मनांत इच्छा उत्पन्न झाल्याबरोबर समोर हजर होत असे. कांहीं काळानंतर चारुकेशीचें मन पालटूं लागलें. त्याला स्वप्नें पडूं लागली. परंतु तीं स्वप्नें विद्याधर देशाची नसून गांधार देशाचीं होतीं. गांधारिय देशांतील लोक शिकारीला कसे जात, पक्ष्यांचे पंख कसे काढीत, रानटी डुकराला मारून कसे उचलून नेत? त्याचे मित्र व सवंगडी सर्व स्वप्नांत येऊं लागले. एक दिवशीं स्वप्नांतून तो जागा झाला तेव्हां आपण गांधार देशापासून फार दूर आहोंत व स्वदेशीं पोचणें आतां अशक्य झालें आहे याची त्याला जाणीव झाली व मन फार फार दुःखी झालें. त्याच दिवशीं त्याचा उतरलेला चेहरा पाहून विद्याधरीनें त्याला विचारलें कीं काय झालें तुम्हांला? तेव्हां तो म्हणाला— "स्वप्नांत मला हे हे मित्र भेटले. त्यांच्या बरोबर मी हरणांची शिकार करीत रानांत हिंडत आहें." रूप बदलतें. सहा ऋतूंचे एकामागून एक येणें व जाणें तूं प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहिलेंस तरच तुला त्याच्या आनंदाची कल्पना येईल, फक्त एकच दिवस गांधार देशांत जाऊन यावेंसें वाटतें मला." पण त्यानें मर्त्यलोकांत जाण्याचें नांव काढलेलें तिला बिलकूल आवडत नसे. परंतु त्यानें फारच आग्रह केल्यावर तिनें तें मान्य केलें. तिनें म्हणाली— "तुम्ही जा विमानांत बसून आणि जें जें पाहावयाचें आहे, पाहून या. पण चुकून सुद्धां जमिनीवर पाऊल ठेवूं नका. विमानांतून खाली उतरूं नका." तिनें त्याला बजावून सांगितलं. कांहीं काळ लोटला. चारुकेशीला स्वदेशाची स्वप्नें अधिकाधिक पडूं लागली. विद्याधरी त्याला म्हणे, "तुझ्या मनांत मर्त्यलोकाचे विचार नेहमीं येतात म्हणून तुला तीं स्वप्नें पडतात. तुला असें कोणतें सुख तेथें मिळेल असें वाटतें, तें तरी कळू दे. तेथें रोग, वार्धक्य व मरण यांच्या भयाबरोबर अनेक कष्ट सहन करावे लागतात. हिवाळ्यांत झाडें वाळून जातात व उन्हाळ्यांत तलाव व सरोवरें अटतात." तो म्हणे— "उन्हाळ्यानंतर पावसाळा आला व सरोवरें भरलीं कीं पृथ्वीचे आहेत कीं काय! चारुकेशीला पुन्हां स्वदेशाचें दर्शन होणार याबद्दल फार आनंद झाला. तो विमानांत बसून स्वदेशा गेला. गांधारिय जेथें जेथें शिकारीला जात, जेथें ते शास्त्रास्त्र शिकत त्या सर्व जागा त्यानें विमानांतच बसून पाहिल्या. परंतु त्याला त्याचा एक मित्रदेखील दिसला नाहीं कीं त्यांचा आवाज ऐकू आला नाहीं. सर्वत्र शुकशुकाट. तर मग गांधारिय स्वदेश सोडून कोठें निघून गेले व सरोवरें भरलीं कीं पृथ्वीचे आहेत कीं काय! एका जागीं एक शेतकरी शेतांत काम करीत होता त्याला हांक मारून त्यानें विचारलें— "या प्रदेशांत गांधारिय राहत असत ते कोठें दिसत नाहींत?" "गांधारिय लोक? त्यांचा काळ लोटून आज तीन शतकें लोटलीं. तूं कोण?" शेतकऱ्यानें चकित होऊन विचारलें. चारुकेशीला तें खरेंच वाटेना. तो विमानांतून परत निघाला. त्याला आणखी एक दृश्य दिसलें. चार जण डोंगरांत कांहीं तरी खणत होते. एक दगड बाजूला सारण्याचा प्रयत्न मोठ्या कष्टाने ते करीत होते. मनुष्य जात इतकी का अशक्त झाली आहे? गांधारिय असते तर दोघांनीं मिळून तो दगड बाजूला सारला असता." असें मनाशीं म्हणत आपल्या शक्तीचें प्रदर्शन करण्यासाठी तो विमानांतून उतरून चालू लागला. पण दोनच पावलें तो चालला असेल तो खालीं पडला, विमान आकाशांत उडून गेलें. दगड सारणाऱ्यांना त्याचा काळवंडलेला देह मात्र दिसला. वेताळानें येथवर गोष्ट सांगितली आणि विचारलें— "राजा मला एका गोष्टीची शंका वाटते. सामान्यपणे माणसाला अमरत्व दुर्लभ असतां चारुकेशी सारखा समजूतदार मनुष्य सर्व सुखांवर पाणी सोडून आपल्या सुंदर बायकोला सोडून मर्त्य लोकांत यायला कां आतुर झाला? तें देखील मरण आपल्याला निश्चितपणें मिळणार हें माहीत असून? या प्रश्नाचें उत्तर माहीत असून तूं दिलें नाहींस तर त्याचा परिणाम तुला माहीत आहे. तुझ्या डोक्यांची शंभर छकलें होऊन तुझ्याच पायांवर लोळू लागतील." "चारुकेशीला अमरत्व मिळालें असलें तरी त्याचें मानवत्व गेलेलें नव्हतें. स्वतःजवळ जें नसतें तेंच मिळावें असें माणसाला वाटतें व त्याची उणीव इतकी जास्त भासू लागते कीं त्यासाठी मनुष्य वाटेल तो त्याग करायला तयार होतो. म्हणूनच मनुष्य आजपर्यंत प्रगती करीत आलेला आहे. देवलोकांत चारुकेशीला कोणत्या गोष्टीची उणीव असणार? पण मर्त्यलोकांतलें बदलणारें नैसर्गिक सौंदर्य देवलोकांत कोठून मिळणार? म्हणून त्याच गोष्टी त्याला स्वप्नांत दिसत. फक्त स्वतः सुख उपभोगल्यानें माणसाच्या मनाचें समाधान होत नाहीं. दुसऱ्याला मदत करून त्याला सुखी करण्यांत देखील एक तऱ्हेचा आनंद वाटतो. त्याच आनंदाच्या शोधार्थ तो धांवला होता. याशिवाय जन्मभूमि ही स्वर्गाहून जास्त प्रिय वाटते मनाला. म्हणून मनुष्य स्वभावाला धरूनच तो जमिनीवर उतरला होता आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला" राजा म्हणाला. अशा तऱ्हेनें राजाचें मौन भंग होतांच वेताळ शवाबरोबर नाहींसा झाला आणि पुन्हां झाडाला जाऊन लोंबकळू लागला.