Bookstruck

स्वेच्छा वृत्ती

एका गावी दोन फुटक्या नशिबाचे व्यक्ती राहत असत. त्या दोघांवर निरनिराळ्या प्रकारचे प्रसंग येऊन गेले. त्यांना कधी कोणाकडून मदत म्हणून मिळाली नाही. म्हणून दोघे शेजारच्या देशाचा राजा महेंद्रवर्मा यांच्याकडून काही मदत मिळेल या आशेने त्याच्या राजधानीत गेले. वाटेत त्यांना एक वाटसरू भेटला. तो शुद्ध फार गरीब होता. परंतु त्याच्या चेहऱ्यावरून त्याला कधी कोणत्याही गोष्टीची गरज किंवा उणीव असेल असे दिसले नाही. त्याने या दोघांना विचारले— "कोठे हो निघालात?" "आम्ही आजपर्यंत चहूबाजूंनी फसवणूक सहन करीत आलो. आमचे भाग्यच फुटके होते. म्हणून आम्ही महेंद्रवर्माच्या दरबारी जाऊन त्याची मदत मिळेल या अपेक्षेने निघालो आहोत. महेंद्रवर्मा दानशूर राजा आहे असे आम्ही ऐकतो." दोघे म्हणाले. त्यानंतर त्या दोघांनी त्याला कोठे व कशासाठी जात असल्याचे विचारले. तेव्हा तो म्हणाला— "मी पण एक गरीब मनुष्य आहे. मी कोणाकडून दान घेत नाही. माझी स्थिती त्या परमेश्वराला चांगली माहीत आहे. 'ठेविले अनंते तैसेची रहावे' असे मी मानतो आणि एकाहुन दुसऱ्या गावी प्रवास करीत फिरत असतो." पुष्कळ दिवस प्रवास करीत करीत ते महेंद्रवर्माच्या राज्यात येऊन पोहोचले. एक दिवशी रात्री तिघे एका जुन्या घरात उतरले. मध्यरात्र उलटून गेली तरी ते गप्पागोष्टीत रंगून गेले होते. त्याच वेळी राजा महेंद्रवर्मा वेष पालटून फिरत फिरत त्या घरापर्यंत आला. त्याने आड उभा राहून तिघांचे बोलणे ऐकले. महेंद्रवर्माने तिघांना दुसऱ्या दिवशी आपल्या दरबारात बोलावून आणले. प्रत्येकाला त्याने एकच प्रश्न विचारला— "तू कोणी परदेशी दिसतोस. काय पाहिजे तुला?" तिघांपैकी एक म्हणाला— "महाराज! श्रीमंत घराण्यात मी जन्मलो. ऐश आरामात दिवस जात होते. परंतु हळूहळू आमचे सर्व ऐश्वर्य तळ्यातल्या पाण्यासारखे आटून गेले. पैसा अडका होता तोपर्यंत अक्कल आली असती तर मी व्यापार धंदा करून पैसा मिळविण्याचा मार्ग शोधून काढला असता. अजून देखील आपल्यासारख्या दानशूरांनी दहा-पाच हजार मोहोरा दिल्या तर आरामाने राहण्याची इच्छा आहे." दुसरा म्हणाला— "महाराज! काही वर्षांपूर्वी रंभेसारख्या एका रूपवती कन्येशी माझा विवाह झाला. संसारसुखात काही दिवस मजेत गेले. वाटले, दुनियेत माझ्यासारखा सुखी कोण असणार? परंतु एकाएकी माझी बायको मरण पावली. मला वाटले की मला वेडच लागणार. म्हणून मी आपले गाव सोडून परदेशी निघालो. मला पहिल्यासारखे संसारसुख सुंदर मुलीशी लग्न झाले तरच मिळेल. तशी एक सुंदर कन्या पाहून आपण माझे लग्न करून द्यावे." राजा महेंद्रवर्माने तिसऱ्या व्यक्तीला तोच प्रश्न विचारला— "तुला काय हवे आहे, बुवा?" "महाराज, प्रत्येक माणसाच्या अनेक इच्छा असतात. परंतु त्या पुऱ्या केल्याच पाहिजेत की नाही, हे ईश्वरच ठरवू शकतो. मी कोणासमोर हात पसरू इच्छित नाही की कोणाच्या उपकाराखाली दबून जाण्याची इच्छा पण माझ्या मनाला शिवत नाही." तिसरा म्हणाला. तिसरा मनुष्य म्हणाला ते ऐकून राजाला राग आला. कारण राजा दानी म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्याकडून दान घेण्यासाठी दुरून लोक येत असत. अशा स्थितीत त्याच्याकडून दान घेण्यास नकार देणारा हा उद्धट मनुष्य कोण? त्याला ती गोष्ट मान्य झाली नाही. त्याने पहिल्या प्रवाशाला दोन थैल्या भरून सोन्याच्या मोहोरा आणि दुसऱ्याला एक सुंदर कन्या दिली व म्हणाला— "ठीक, आता तुम्ही तुम्हाला वाटेल तिकडे खुशाल जा." त्याप्रमाणे तिघे दरबारातून निघाले. राजाने एका शिपायाला बोलावून आज्ञा केली की, "हे तिघे प्रवासी आमच्या राज्याबाहेर जाण्यासाठी निघाले आहेत. तू घोड्यावर बसून जा व त्यांना कोठे तरी गाठ. एकाजवळ मोहोरा भरून दोन पिशव्या आहेत, दुसऱ्याबरोबर एक सुंदर मुलगी आहे. त्या दोघांच्या अंगाला स्पर्श करू नकोस. तो जो तिसरा आहे, त्याचे मुंडके उडवून ते माझ्यासमोर हजर कर." मध्यंतरी ज्याला राजाने मोहोरांच्या दोन थैल्या दिल्या होत्या, त्याने ओझे फार वेळ सहन न झाल्यामुळे तिसऱ्या स्वतंत्र वृत्तीच्या प्रवाशाला "मदत करतोस का थोडी?" असे विचारले. त्याने थैल्या उचलून घेतल्या आणि तिघे पुढे निघाले. तेवढ्यात राजाने पाठवलेला शिपाई येऊन पोहोचला. एकाला रिकाम्या हाताने चालत असलेला पाहून त्याने त्याचे मुंडके कापून घेऊन निघून गेला. राजा महेंद्रवर्मा ते मुंडके पाहून चकित झाला आणि म्हणाला— "मी त्याचे डोके कापून आणायला सांगितले नव्हते. तू चुकलास. पुन्हा जा आणि त्या सुंदर कन्येला घेऊन जाणारा मनुष्य आहे ना त्याला सोड आणि दुसऱ्याचे मुंडके कापून घेऊन ये." शिपाई पोहोचला त्या वेळी कन्यादान ज्याला मिळाले होते तो लघुशंका करायला थांबला व कन्या त्या स्वतंत्रवृत्तीच्या माणसाबरोबर चार पावले पुढे गेली. म्हणून तो कन्यादान घेणारा मनुष्य एकटाच पाठीमागून निघाला. त्याच वेळी शिपायाने त्याला पाहिले व त्याचे मुंडके कापून परतला. अशा तऱ्हेने राजाचा तो प्रयत्न निष्फळ ठरला. त्याने दिलेल्या दानावर जगण्याची इच्छा असणारे दोघे राजाच्या प्रयत्नानेच मरण पावले. परंतु देवाच्या भरवशावर जो स्वतंत्र वृत्तीने राहू इच्छित होता, त्याला मोहोरा भरलेल्या दोन थैल्यांबरोबर एक सुंदर कन्याही लाभली. ही गोष्ट कळल्यावर राजा महेंद्रवर्माचा अहंकार खाली उतरला.