स्थल महात्म्य
चंद्रहास नावाच्या एका मुलाच्या मनात राजा व्हावे अशी महत्त्वाकांक्षा बालपणीच निर्माण झाली. त्यासाठी त्याने कसून विद्याभ्यास सुरू केला. त्याचबरोबर राजाला योग्य असलेल्या शस्त्रास्त्र विद्येचाही अभ्यास केला. त्याने काही तरुण मंडळींना आपला अनुयायी करून घेतले आणि एका निर्जन प्रदेशात आपली राजधानी स्थापन करण्याचे ठरविले. चंद्रहासला त्याच्या पुरोहिताने राजधानी स्थापन करण्यापूर्वी त्या जागेचे स्थल महात्म्य पाहून घ्यायचा सल्ला दिला.
चंद्रहासाने तशा एका जागेचा शोध सुरू केला व सुदैवाने त्याला एक उपयुक्त जागा मिळाली. त्या जागी त्याला एक नवीन अनुभव आला. काही शिकारी कुत्री सशांचा पाठलाग करीत त्या जागेपर्यंत आली. परंतु त्या जागेपर्यंत आल्यावर सर्व ससे थांबले व त्यांनी शिकारी कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना पळवून लावले. म्हणून तीच जागा राजधानी स्थापन करण्यायोग्य मानून चंद्रहासाने राजधानी स्थापन करून तिचे नाव शशांक नगर ठेवले. ते नगर लवंग देशाच्या सीमेवर होते. लवंगनरेशाने शशांक नगरावर स्वारी केली. शशांक नगराचे सैन्य मोठे नव्हते. परंतु कोट दुर्भेद्य होता आणि सैनिकांना ते स्थान अजिंक्य असल्याचा आत्मविश्वासही होता. परिणामी लवंग देशाचा पराभव झाला.
चंद्रहासाशी युद्धाला जो कोणी राजा आला त्याचा पराभवच होत गेला. हळूहळू चंद्रहासाच्या राज्याचा विस्तार झाला व तो एक चक्रवर्ती राजा म्हणून प्रसिद्ध झाला. चंद्रहासला एक मुलगा होता त्याचे नाव पद्मसेन होते. पद्मसेनाने बालपणी विद्याभ्यास केला नाही आणि लहानपणापासूनच तो दुर्व्यसनात पडला.
पद्मसेन ऐन तारुण्यात असता चंद्रहास मरण पावला आणि पद्मसेन राजा झाला. परंतु राज्यकारभार सांभाळण्याची लायकी त्याच्या अंगात नव्हती. म्हणून तो नेहमी भीतभीत राज्यकारभार पाही. तेव्हा प्रधानाच्या मुलाने त्याला धीर दिला. म्हणाला— "महाराज, शशांक नगराचे स्थल महात्म्यच असे आहे की भिण्याचे कारणच नाही."
हळूहळू सर्व सामंत राजांना आपला चक्रवर्ती राजा राज्यकारभारात अयोग्य असल्याचे कळले. लवंग नरेश पराभव झाल्यानंतर सामंत राजा झाला होता तरी त्याने बंडाचे निशाण उभारले व शशांक नगरावर चालून आला. त्या युद्धात पद्मसेनचा पराभव झाला. पद्मसेन प्रधानाच्या मुलाबरोबर जंगलात पळून गेला.
पद्मसेन विचार करू लागला— "स्थल महात्म्य असल्या कारणानेच तर माझ्या वडिलांना एवढे मोठे साम्राज्य स्थापन करता आले होते. परंतु ज्या जागेवरून सशांनी शिकारी कुत्र्यांना पळवून लावले होते ती जागा आपले रक्षण करू शकली नाही. याचा अर्थ असा की मी सशांहून जास्त भित्रा व नालायक ठरलो."
परंतु प्रधानाचा मुलगा त्याला समजावून सांगू लागला— "महाराज, आपण एवढे मनाला लावून घेण्याचे कारणच काय? आपल्या पराभवाचे कारणही स्थल महात्म्यच आहे; नाहीतर येथवर सशांना पळवून आणणारी शिकारी कुत्री येथे पोहोचताच परतली नसती. याचा अर्थ असा की सशांना धैर्य देणाऱ्या जागेने शिकारी कुत्र्यांच्या मनात भीती उत्पन्न केली असे म्हणायला हवे! आपण महापराक्रमीच आहात, परंतु स्थल महात्म्यच असे आहे की आपला पराक्रम क्षीण झाला आणि सशांसारखा भित्रा लवंग देशाचा राजा विजयी झाला."
स्थल महात्म्य हे दुधारी तलवारीसारखं आहे. म्हणून माणसाने स्वतःच्या बळावरच अवलंबून राहण्यात शहाणपण आहे हा ज्ञानबोध पद्मसेनाला झाला.